आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविन : गैरसमज आणि वस्तुस्थिती


भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमासाठी डिजिटल आधारस्तंभ म्हणून कोविनची यशस्वी सेवा

कोविनवर 'तक्रार मांडा (Raise an Issu)' या वैशिष्ट्यासह बळकट तक्रार व्यवस्थापन प्रणाली

Posted On: 09 MAY 2022 7:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 मे 2022

 

कोविनमधील  तांत्रिक त्रुटींमुळे पुणे जिल्ह्यातील 2.5 लाख लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक  लसीची पहिली मात्रा घेतल्याची दोन प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत असा आरोप करणारी काही वृत्त प्रसारित झाली आहेत.

कोविनने भारताच्या कोविड -19प्रतिबंधक  लसीकरण कार्यक्रमासाठी डिजिटल आधारस्तंभ म्हणून यशस्वीपणे सेवा पुरवली आहे. या मंचावर नोंदणी केलेल्या भारतातील 100  कोटींहून अधिक नागरिकांना कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या 190 कोटी मात्रा देण्यासाठी कोविन मंचाने  सुविधा उपलब्ध केली आहे. या मंचाने एकही दिवस बंद न ठेवताही इतक्या मोठ्या प्रमाणातील लसीकरणाची संख्या साध्य केली आहे.

वापरण्यास  सहज आणि  सुलभ असलेल्या  या मंचाचे कार्य अभिमानास्पद  आहे. या मंचावर नोंदणीसाठी लाभार्थीला, प्रत्यक्ष स्थळी  (ऑफलाइन), ऑनलाइन पोर्टल आणि मदतक्रमांक  तसेच सीएससीच्या  (सामान्य सेवा केंद्रे) माध्यमातून  सहाय्य ही तीन माध्यमे प्रदान केली जातात. लसीकरणासाठी नियोजित वेळापत्रकासाठी  किंवा प्रत्यक्ष लस घेण्यासाठी, नाव, वय (जन्म वर्ष) आणि लिंग यासारख्या किमान माहितीसह  नोंदणीसाठी एखाद्या व्यक्तीने केवळ त्याचा  मोबाइल क्रमांक प्रदान करणे आवश्यक आहे. ओळखीचा पुरावा म्हणून, 9 छायाचित्र  ओळखपत्र  पुराव्यांमधून एक ओळखपत्र निवडून सादर करण्याचा  पर्याय देण्यात आला आहे.

तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की,  लसीकरणाची  पहिली मात्रा  प्राप्त केल्यानंतर, लाभार्थ्याने लसीकरणाची  पहिल्या मात्रा घेण्यासाठी  नोंदणी केलेला मोबाइल क्रमांक त्याच लसीची  दुसरी मात्रा घेण्यासाठी वापरणे अनिवार्य आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेचे  तपशील एकाच लाभार्थीला संलग्न करण्यासाठी ही एकमेव यंत्रणा आहे. जर एखाद्या लाभार्थ्याने दुसरी मात्रा घेण्यासाठी वेगळा  मोबाइल क्रमांक  वापरला आणि लसीकरण नियोजित केले तर  आपोआपच दुसऱ्या  मात्रेची नोंदणी  या लाभार्थीसाठी पहिल्या मात्रेची नोंदणी म्हणून ओळखली जाईल. शिवाय, ओळखीचा समान पुरावा दोन वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावर वापरण्याची परवानगी नाही.

जिथे एखाद्या व्यक्तीने नोंदणीकृत एकाच मोबाईल क्रमांकाखाली दोन भिन्न ओळखपत्र पुरावे दिले असतील तर अशा परिस्थितीसाठी तरतूद आहे. लाभार्थ्याने दाखल  केलेल्या छायाचित्र ओळखपत्र  पुराव्यांनुसार नाव, वय आणि लिंग जुळत असल्यास, कोविन दोन्ही मात्रांचे  संपूर्ण लसीकरण झाल्याचे एकच प्रमाणपत्र देण्यासाठी दोन प्रथम मात्रा  प्रमाणपत्रे एकत्र करण्यास सूचित करते.

लाभार्थ्याने दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून आणि वेगवेगळी छायाचित्र ओळखपत्रे वापरून नोंदणी केलेली पहिल्या मात्रेची दोन प्रमाणपत्रे या प्रणालीने ओळखली पाहिजेत ही अपेक्षा निरर्थक आहे. एक अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात एकच नाव, वय आणि लिंग असलेल्या शेकडो-हजारो व्यक्ती असू शकतील. जर अशी कोणती सेवा पुरविण्यात आली असती तर आपण आपल्याच जाळ्यात अडकलो असतो आणि प्रार्थना करत राहिलो असतो की एकच नाव, वय आणि लिंग असलेली दुसरी व्यक्ती देशात असूच नये.

म्हणूनच, मानवी पद्धतीने माहिती भरताना राहून गेलेल्या त्रुटीला तंत्रज्ञानविषयक बिघाड संबोधणे हा अगदी निराधार युक्तिवाद आहे. असेही असू शकते की एखाद्या लाभार्थ्याने लसीची पहिली मात्र त्याचा जोडीदार अथवा पालकांसोबत घेतली आहे आणि त्या वेळेस नोंदणीसाठी  वेगळ्याच व्यक्तीचा मोबाईल क्रमांक आणि त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना वापरण्यात आला. आणि याच लाभार्थ्याने एकट्याने जाऊन लसीची दुसरी मात्रा घेताना त्याचा स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि पॅन क्रमांक वापरून नोंदणी केली. अशा परिस्थितीत कोविन प्रणाली साहजिकच त्यांना दोन वेगवेगळ्या व्यक्ती मानते. त्यामुळे अशा लाभार्थ्याला लसीची पहिली मात्रा घेतल्याची दोन वेगवेगळी प्रमाणपत्रे मिळाली तर त्यात काहीच आश्चर्य नाही.

तसेच, जर प्रणालीमध्ये माहिती भरताना अशी मानवी चूक झाली असेल तर कोविन प्रणाली अशा शक्यतांकडे दुर्लक्ष करत नाही, तर मजबूत तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणालीची सुविधा देऊ करते. जनतेच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच खुल्या असणाऱ्या कोविन प्रणालीमध्ये ‘रेझ अॅन इश्यू’ अर्थात ‘तुमच्या समस्या मांडा’ अशा प्रकारची ऑनलाईन सोय समाविष्ट केलेली आहे. सामान्यपणे पाहण्यात येणाऱ्या आणि अधिक प्रमाणात नोंदल्या गेलेल्या आठ प्रकारच्या समस्या या प्रणालीत नोंदवलेल्या असून ग्राहक सेवा केंद्रांवर जाऊन डिजिटल पद्धतीने त्याचे निराकरण करण्यासाठीची सुविधा तसेच हेल्पलाईन क्रमांकाची सुविधा पुरविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, कोणत्याही व्यक्तीचे नाव, वय आणि लिंग तसेच दोन्ही वेळा ज्या नावांनी नोंदणी झाली त्याची व्यवस्थित माहिती त्या व्यक्तीला असेल तर अशी व्यक्ती त्यांच्या दोन्ही मात्रांची माहिती सहजपणे एकत्रित करू शकेल.     

कोविन हा अत्यंत विविधांगी मंच असून  देशातील संपूर्ण लोकसंख्येसाठी विक्रमी वेगाने त्याची रचना करण्यात आली आहे. मात्र या मंचासंदर्भातील मानवी त्रुटीला तांत्रिक बिघाडाचे नाव देऊन सार्वजनिक हितासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या आणि या मंचाचे परिचालन करणाऱ्या पथकाच्या क्षमतेबाबत संशय व्यक्त करणे खरोखरीच निराशाजनक आहे.

 

* * *

S.Patil/S.Chavan/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1823967) Visitor Counter : 194