नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
सौरऊर्जा प्रणाली उभारण्यासाठी भारतीय सौर ऊर्जा महामंडळाचा केंद्रीय गृह मंत्रालयासोबत सामंजस्य करार
सीएपीएफ आणि एनएसजीच्या परिसरांमधील छतावर सौर प्रणाली स्थापित केली जाईल
शाश्वत भविष्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी देण्याच्या दिशेने हे एक पाऊल
Posted On:
09 MAY 2022 3:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2022
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या (एनएसजी) परिसरांमधील छतावर, उपलब्ध सौरऊर्जेच्या क्षमतेचा उपयोग करण्यासाठी, भारतीय सौरऊर्जा महामंडळाने (एसईसीआय) केंद्रीय गृह मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे. केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला आणि नवीन आणि नवीकरणीय मंत्रालयाचे सचिव इंदू शेखर चतुर्वेदी यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव राकेश कुमार सिंह, आणि भारतीय सौरऊर्जा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक सुमन शर्मा यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भारताच्या हवामान वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दृष्टीने, भारत सरकारची सेवा करण्याचा भारतीय सौरऊर्जा महामंडळाला आनंद होत आहे आणि सौर प्रणालीच्या माध्यमातून छतावरील सौर ऊर्जा वापर क्षेत्राचा, देशाच्या दुर्गम भागात कानाकोपऱ्यात विस्तार करण्यासाठी महामंडळ उत्सुक आहे, असे सुमन शर्मा यांनी यावेळी बोलताना सांगितले.
हा सामंजस्य करार देशाच्या सुरक्षा दलांना हरित उर्जा उपलब्ध करून देण्याच्या आणि शाश्वत भविष्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी देण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. हा सामंजस्य करार नवीकरणीय ऊर्जा सेवा कंपनी मॉडेल अंतर्गत छतावरील सौर ऊर्जा प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी गृह मंत्रालयाला सहाय्य करेल.
भारतीय सौरऊर्जा महामंडळ (एसईसीआय) हे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. हे महामंडळ विशेषत: सौर ऊर्जा, ऊर्जा व्यापार, संशोधन आणि विकास इत्यादीसह विविध नवीकरणीय ऊर्जा संसाधनांचा प्रसार आणि विकासासाठी कार्यरत आहे. भारतीय सौरऊर्जा महामंडळ हे व्यवहार्यता अंतर निधी (व्हीजीएफ) योजना, आंतरराज्य पारेषण प्रणाली (आयएसटीएस) योजना, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (सीपीएसयू) योजना इत्यादी अनेक सरकारी नवीकरणीय ऊर्जा योजनांसाठी नियुक्त केलेली अंमलबजावणी संस्था देखील आहे.
* * *
S.Tupe/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1823873)
Visitor Counter : 274