युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2021मध्ये सहभागी क्रीडापटू आणि स्पर्धेच्या आयोजकांच्या प्रयत्नांची केंद्रीय गृह व्यवहार मंत्री अमित शाह यांनी केली प्रशंसा; जैन विद्यापीठाच्या विजेत्या खेळाडूंना केले सन्मानित


वर्ष 2047 मध्ये जेव्हा भारत स्वातंत्र्यप्राप्तीचे शतक साजरे करत असेल तेव्हा भारताने ऑलिम्पिक स्पर्धांमधील सर्वोत्कृष्ट पाच देशांमध्ये स्थान मिळविलेले असेल याची सुनिश्चिती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शक आराखडा विकसित केला आहे : केंद्रीय गृहमंत्री

ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये केलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांचा गौरव करण्यात आला

खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, फिट इंडिया आणि खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धा हे उपक्रम म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

Posted On: 03 MAY 2022 9:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली येथे काल झालेल्या दिमाखदार समारोप सोहळ्यामध्ये खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडास्पर्धा 2021 च्या आणखी एका अत्यंत अविस्मरणीय भागाची सांगता झाली. या स्पर्धांमध्ये देशातील युवा आणि महत्त्वाकांक्षी खेळाडूंनी आपापल्या विद्यापीठाला अधिकाधिक गौरव प्राप्त करून देण्यासाठी या क्रीडास्पर्धांच्या मंचाचा उत्तम वापर करून घेतला.

समारोप समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी यजमान जैन विद्यापीठाला या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरल्याबद्दल गौरविले. जैन विद्यापीठाच्या संघाने 20 सुवर्ण पदके, 7 रौप्य पदके आणि 5 कांस्य पदके मिळवत संपूर्ण स्पर्धेत आपला प्रभाव कायम राखला. पंजाबच्या लव्हली व्यावसायिक विद्यापीठाच्या स्पर्धकांनी 17 सुवर्ण, 15 रौप्य आणि 19 कांस्य पदकांची कमाई केली. गतविजेत्या पंजाब विद्यापीठाच्या संघाला 15 सुवर्ण, 9 रौप्य आणि 24 कांस्य पदकांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

या तारांकित समारोप सोहळ्यामध्ये केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंग ठाकूर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार आणि गृह व्यवहार राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक हे देखील उपस्थित होते.

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडास्पर्धांमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला तसेच पुरुष संघांची उपस्थिती हा या सायंकालीन सोहोळ्याचा आकर्षणबिंदू ठरला. केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते या दोन्ही संघांचा सन्मान करण्यात आला. सिनेअभिनेता कीचा सुदीप हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

भारतीय विद्यापीठांच्या संघटनेने तयार केलेल्या आणि खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडास्पर्धांबद्दल माहिती देणाऱ्या कॉफी टेबल पुस्तिकेचे अनावरण देखील केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केले. देशाच्या युवा वर्गाच्या कामगिरीला श्रेय देत ते म्हणाले, “खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडास्पर्धा 2021 मध्ये सहभागी झालेली सर्व विद्यापीठे आणि त्यांच्या संघांतील खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. या स्पर्धेत भाग घेणारे सर्व खेळाडू शाबासकी देण्यायोग्यच आहेत. हार-जीत हा प्रत्येक खेळाचा भाग असतो. मात्र क्रीडास्पर्धेत भाग घेणे अधिक महत्त्वाचे आहे. क्रीडाक्षेत्रासह प्रत्येक बाबतीत भारताला पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवणे हेच वर्ष 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याचे ध्येय झाले आहे. त्यांनी समस्यांची कधीच चिंता केली नाही तर त्यांनी नव्या योजना आखल्या, त्यावर मेहनत घेतली आणि परिणाम साधण्यासाठी मार्ग शोधून काढले. पंतप्रधान मोदी यांनी क्रीडा क्षेत्रात नव्या उपक्रमांची मालिकाच सुरु केली आणि आज आपण त्या उपक्रमांचे उत्कुष्ट परिणाम पाहत आहोत.

केंद्रीय मंत्री अमित शाह पुढे म्हणाले, “मला या क्रीडापटूंना असे सांगायचे आहे की खेळ हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा पैलू आहे. जी व्यक्ती खेळ खेळते तीच जीवनात यशस्वी होऊ शकते, कारण खेळ आपल्याला जीवनातील पराभव पचविण्याचे धैर्य देतात. आणि तेव्हाच तुम्ही विजयी होण्याची इच्छा तुमच्यामध्ये निर्माण करू शकता. सध्याच्या काळात आपले क्रीडापटू ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये अभिमानास्पद कामगिरी करत आहेत हे भारतीय संघांनी  टोक्यो ऑलिम्पिक 2020 आणि पॅरालिम्पिक्स मध्ये मिळविलेल्या पदकांच्या अभूतपूर्व संख्येवरून दिसून येते. आणि वर्ष 2047 मध्ये जेव्हा भारत स्वातंत्र्यप्राप्तीचे शतक साजरे करत असेल तेव्हा भारताने ऑलिम्पिक स्पर्धांमधील सर्वोत्कृष्ट पाच देशांमध्ये स्थान मिळविलेले असेल याची सुनिश्चिती करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शक आराखडा विकसित केला आहे.”

या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंच्या प्रयत्नांचे आणि यजमान जैन विद्यापीठाच्या संघाचे अभिनंदन करत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर म्हणाले, “खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, फिट इंडिया आणि खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धा हे उपक्रम म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. यावर्षी खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेच्या दुसऱ्या भागाचे आयोजन बेंगळूरू येथे करण्याचा निर्णय आम्ही घेतला याचा मला आनंद वाटतो. मी हे अत्यंत अभिमानाने सांगू शकतो की कोविड-19 महामारी असूनसुद्धा खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धा 2021 हा अत्यंत अप्रतिम आणि अतिशय यशस्वी कार्यक्रम ठरला. स्पर्धेदरम्यान या वर्षी खेळाडूंनी 2 राष्ट्रीय विक्रम मोडले तर विद्यापीठ क्रीडास्पर्धांमध्ये यापूर्वी नोंदले गेलेले 76 विक्रम मोडीत निघाले.”

***

JPS/SC/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1822864) Visitor Counter : 138