रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सोलापूर येथे 8,181 कोटी रुपयांच्या 292 किलोमीटर लांबीच्या 10 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन

Posted On: 25 APR 2022 4:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 एप्रिल 2022

दक्षिण-पूर्व महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या सोलापूरच्या समन्वित विकासासाठी आज सोलापूर येथे 8,181 कोटी रुपये किंमतीच्या आणि 292 किमी लांबीच्या 10 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी उद्‌घाटन केले त्यावेळी ते बोलत होते . खासदार रणजित नाईक निंबाळकर, डॉ. श्रीजयसिद्धेश्वर महास्वामी , रमेश जिगाजिनगी , सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे  तसेच  जिल्ह्यातील इतर आमदार आणि  अधिकारी  यावेळी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर 37 हजार 25 कोटी रुपये खर्चाची 32 कामे मंजूर करण्यात आली, त्यापैकी 12 पूर्ण झाली आहेत तर 9 प्रगतीपथावर आहेत असे गडकरी यांनी सांगितले. आणखी 20 हजार 400 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत , सोलापूर जिल्ह्यात गेल्या सात वर्षात एक हजार 771 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे झाली असून ही वाढ 173 % असून  महाराष्ट्रात रस्ते बांधणीचे सर्वाधिक काम सोलापुरात झाल्याचे ते म्हणाले.

सुरत-चेन्नई ग्रीन एक्स्प्रेस महामार्गाचे काम सुरु असून यामुळे सुरतहून मुंबई-पुण्यमार्गे होणारी वाहतूक नाशिक-नगर-सोलापूर मार्गे थेट येईल. यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच वेळ वाचेल. मुंबई-पुणे-बंगलोर मार्गाचे काम लवकरच हाती घेतले जाईल असे ते म्हणाले.

या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 17 हजार 200 कोटी रुपये दिल्याची माहिती त्यांनी दिली.जिल्ह्यातील साखर कारखान्यांना जास्तीत जास्त इथेनॉल तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ग्रीन हायड्रोजन हे आपलं भविष्य असून यात अधिक संशोधनाची गरज त्यांनी व्यक्त केली.

प्रकल्पाविषयी

सोलापूर जिल्हा व परिसराला देशाच्या मुख्य प्रवाहातआणण्याची क्षमता असलेले हे रस्ते प्रकल्प सोलापूरकरांचे जीवन सुखी-समृद्ध व विकसित करण्यासाठी महत्त्वाचे ठरतील. या प्रकल्पांमुळे शहरातील वाहतूक सुरळीत होऊनअपघातांचे प्रमाण व पर्यावरण प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील ग्रामीण भागांना शहराशी जोडणे सुलभ होईल.

सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोट, पंढरपूर यांसारखी महत्त्वाची देवस्थाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी रस्ते जाळे  मजबूतीचे महत्त्व मोठे आहे. या बाबी लक्षात घेऊन बांधण्यात आलेले हे महामार्ग प्रकल्प शहरातील व जिल्ह्यातील आध्यात्मिक स्थळांपर्यंत पोहोच सुलभ करतील. शेती मालाची वाहतूकही सुरळीत होण्यास या रस्त्यांमुळे मदत होईल.

सोलापूर जिल्ह्यात वारंवार मोठ्या प्रमाणावर होणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी साधारण 2016-17 पासून एनएचएआय अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या माध्यमातून बुलढाणा पॅटर्नच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यात अनेक तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. अनेक उपलब्ध जलाशयांचे खोलीकरण करून त्यातून मिळणारी माती, दगड यांचा रस्त्याच्या बांधकामासाठी वापर करण्यात आला. या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 73 गावांच्या  परिसरातील पाणी पातळीत 6,478 टीएमसी एवढी वाढ झाली असून 561 हेक्टरी क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. २ जलपूर्ती योजनांना या प्रकल्पाचा फायदा झाला असून परिसरातील 747 विहिरींचे पुनर्भरण झाले आहे.

तत्पूर्वी सोलापुरातल्या प्रिसिजन ग्रुपने तयार केलेल्या इलेक्ट्रिक बसची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. गडकरी यांनी बस बद्दल संपूर्ण माहिती यावेळी जाणून घेतली.

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1819846) Visitor Counter : 201