उपराष्ट्रपती कार्यालय
खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडापटूंना महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी आणि नोकरीसाठी अतिरिक्त गुण देण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
24 APR 2022 6:54PM by PIB Mumbai
भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडापटूंना महाविद्यालयामध्ये प्रवेश देताना आणि विविध विभागांमध्ये नोकरी मिळावी, यासाठी अतिरिक्त गुण देण्याचे आवाहन केले. अशा प्रकारे प्रोत्साहन दिल्यामुळे देशामध्ये क्रीडापटूंना खूप मदत मिळेल, असे ते म्हणाले.
बंगलुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स -2021’ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आज ते बोलत होते. आपल्या मुळांकडे परत जाण्याचे आवाहन करून नायडू म्हणाले, क्रीडा क्षेत्रातल्या सहभागीतांनी आपल्या देशी आणि ग्रामीण खेळांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. ‘खेलो इंडियाच्या या आवृत्तीमध्ये योगासन आणि मल्लखांब यासारख्या देशी खेळांसह विविध 20 क्रीडा प्रकारांचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. नायडू म्हणाले, ‘‘ भारतीय परंपरेत रूजलेल्या आणि आपल्या संस्कृतीचा वारसा असलेल्या ग्रामीण आणि देशी क्रीडा प्रकारांचे जतन आणि संवर्धन करणे, खूप आवश्यक आहे.’
गाव पातळीपर्यंत क्रीडा विषयक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर त्यांनी भर देवून केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत. तसेच तळागाळामध्ये आवश्यक क्रीडाविषयक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे आवाहन केले. सर्वांनी मिळून भारतीय क्रीडा क्षेत्राला नव्या उंचीवर नेणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.
राजकारणासह जीवनामध्ये सर्व क्षेत्रात ‘खिलाडू वृत्ती’ जोपासण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन करून उपराष्ट्रपती म्हणाले, खेळ आपल्याला संयम, चिकाटी आणि विजय -पराजय यांना समरसतेने हाताळण्यास शिकवतात. त्यामुळे कोणताही एक खेळ आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले.
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स -2021 हा पहिला ‘हरित क्रीडा महोत्सव’ म्हणून घोषित केल्याबद्दल नायडू यांनी आयोजकांचे कौतुक केले. या खेळांच्या आयोजनामध्ये कुठेही प्लास्टिकचा वापर करण्यात आला नाही. तसेच पुन्हा वापर करण्यायोग्य सामुग्रीचा उपयोगात आणण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. ही कृती अनुकरणीय असल्याचे सांगून नायडू यांनी इतर कार्यक्रमांच्या आयोजकांनी या चांगल्या पद्धतीचे पालन करावे अशी इच्छा व्यक्त केली.
***
S.Kane/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1819648)
आगंतुक पटल : 303