माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘हील इन इंडिया’ उपक्रमाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारताला उपचारासाठीचे जागतिक केंद्र होण्याचा दिला सल्ला
जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषद 2022 च्या समारोप सत्रामध्ये केंद्रीय मंत्री ठाकूर यांची उपस्थिती
Posted On:
22 APR 2022 8:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 22 एप्रिल 2022
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषद 2022 च्या समारोप सत्रामध्ये उपस्थित राहून उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की या तीन दिवसांच्या शिखर परिषदेत 90 हून अधिक प्रसिद्ध वक्त्यांनी विविध कार्यशाळांच्या माध्यमातून उपस्थितांचे ज्ञानवर्धन केले. या शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी केंद्रीय आयुष मंत्रालय आणि मंत्रालयाचे अधिकारी यांचे अभिनंदन केले.
आयुष क्षेत्रात असलेल्या गुंतवणूकीच्या आणि अभिनव संशोधनाच्या अमर्याद संधींबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले की,2014 मध्ये 3 अब्ज डॉलर्सचा असलेला व्यापार आज सहापटीने वाढून 18 अब्ज डॉलर्सहून अधिक मूल्याचा झाला आहे. 75%चा वैशिष्ट्यपूर्ण वार्षिक विकास दर या क्षेत्राला अधिक आकर्षकता देतो. लवकरच या क्षेत्रात गुंतवणूक करणारे अनेक स्टार्ट अप्स आणि उद्योग देशात सुरु होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री ठाकूर पुढे म्हणाले की, कोविद महामारीच्या काळात भारताने उत्तम कामगिरी केली आहे आणि कोविद पश्चात काळात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक होण्याचा मान भारताने प्राप्त केला असून या विकासात आयुष क्षेत्राने आघाडी घेण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय मंत्री म्हणाले की, यासाठी आपल्याकडे योग्य परिसंस्था असली पाहिजे आणि त्याच सोबत अभिनव संशोधन, चिंतन आणि या क्षेत्रात अधिक उपक्रम राबविण्यासाठी योग्य ठरेल अशी संस्कृती जोपासली गेली पाहिजे. संपूर्ण जग कोविड महामारीशी लढा देत असतानाच्या गेल्या दोन वर्षांच्या काळात 47 भारतीय स्टार्ट अप उद्योग युनिकॉर्नच्या पातळीला पोचले अशी टिप्पणी त्यांनी केली.
या क्षेत्रात स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला आपल्या उत्पादनाचे अधिक उत्तम पॅकेजिंग केले पाहिजे आणि त्यासोबत आक्रमक विपणन तसेच ब्रँडींग देखील केले पाहिजे असे ते म्हणाले. आयुष विभाग लवकरच ई-बाजार सुरु करत असून, सरकारी ई-बाजाराप्रमाणेच या ई-बाजारात देखील भविष्यात करोडो रुपयांचे व्यवहार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयुष क्षेत्राला अधिक मजबुती देण्याचे आवाहन करत केंद्रीय मंत्री म्हणाले की, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि योग हे भारताच्या सुप्त सामर्थ्याचे घटक आहेत तसेच विश्वगुरु होण्यासाठी भारताला त्याची ताकद दाखवणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी आपण आयुष क्षेत्राची जोपासना करायला हवी असे त्यांनी सांगितले.
पहिल्या जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे यजमानपद भारताने भूषवावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र यांनी केलेल्या प्रयत्नांना श्रेय देऊन ते म्हणाले की आता भारतातील उत्पादने संपूर्ण जगभरात पोहोचविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
या तीन दिवसांच्या परिषदेच्या माध्यमातून ‘हील इन इंडिया’ अर्थात “भारतात उपचार घेऊन बरे व्हा” ’ हा संदेश जगभरात दिला गेला पाहिजे असा सल्ला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिला. भारताला उपचारांसाठीचे जागतिक केंद्र बनविण्याची कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी सरकारच्या सर्व मंत्रालयांनी एकत्र येऊन नियोजन, अंमलबजावणी आणि विपणन केले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील गांधीनगर येथे 20 एप्रिल 2022 रोजी या तीन दिवसीय जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन झाले. या परिषदेत 5 समारोप सत्रे, 8 गोलमेज परिषदा, 6 कार्यशाळा आणि 2 परिसंवाद झाले. यामध्ये सुमारे 90 ख्यातनामवक्त्यांची भाषणे झाली आणि 100 प्रदर्शनकर्ते सहभागी झाले होते . आयुष क्षेत्रातील गुंतवणुकीच्या क्षमतांचे प्रदर्शन करणे, नवोन्मेष, संशोधन आणि विकासाला वेग देणे, स्टार्ट अप उद्योग परीसंस्थेला प्रोत्साहन देणे आणि स्वास्थ्य विषयक उद्योगांना बळ देऊन या क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक, शिक्षणतज्ञ आणि विचारवंतांना एकत्र आणून भविष्यातील सहकारी संबंधांसाठी योग्य असा मंच तयार करणे ही या शिखर परिषदेच्या आयोजनाची मुख्य उद्दिष्ट्ये होती.
S.Kulkarni/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1819116)
Visitor Counter : 200