दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेतर्फे ‘फिन्क्लूव्हेशन’उपक्रमाची सुरुवात
Posted On:
21 APR 2022 4:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2022
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा 75 वा वर्धापन दिन आणि सध्या देशभरात सुरु असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त टपाल विभागाच्या अखत्यारीतील आणि 100% सरकारी मालकीच्या आयपीपीबी अर्थात इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेने, आर्थिक समावेशकतेच्या संदर्भातील उपाययोजनांची सह-निर्मिती आणि संशोधन करण्याच्या उद्देशाने अर्थविषयक तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित स्टार्ट-अप समुदायातील फिनटेक कंपन्यांना एकत्र आणणाऱ्या ‘फिन्क्लूव्हेशन’ नावाच्या संयुक्त उपक्रमाची सुरुवात केली आहे.
या कार्यक्रमात बोलताना, केंद्रीय रेल्वे, संपर्क आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की देशाने जागतिक तंत्रज्ञान विश्वात फिनटेकच्या क्षेत्रात वेगाने प्रगती केली असून युपीआय अर्थात एकात्मिक भरणा प्रणाली तसेच आधार सारखे अत्यंत अभिनव उपक्रम सुरु केले आहेत. ‘फिन्क्लूव्हेशन’ हे याच दिशेने टाकलेले उद्योगाला प्राधान्य देणारे पुढचे पाउल असून त्यातून आर्थिक समावेशकता साधण्याच्या उद्देशाने अर्थपूर्ण आर्थिक सुविधा उभारण्यासाठी स्टार्ट-अप समुदायातील कंपन्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सक्षम मंचाची उभारणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आयपीपीबीची बँकिंग व्यवस्था, टपाल विभागाने सुरु केलेल्या ग्राहकांच्या दाराशी सेवा उपलब्ध करून देणारे विश्वसनीय जाळे आणि स्टार्ट-अप्सची तंत्रज्ञानाधारित कार्यप्रणाली यांच्या एकत्रीकरणातून देशाच्या नागरिकांना अतुलनीय दर्जाच्या सेवा देता येतील.
“फिन्क्लूव्हेशन हा सहभागी स्टार्ट-अप्सच्या सहकार्याने समावेशक आर्थिक उपाययोजनांची सहनिर्मिती करण्यासाठीचा आयपीपीबीचा कायमस्वरूपी मंच असेल. आयपीपीबी आणि टपाल विभाग त्यांच्या 4 लाखांहून अधिक विश्वसनीय आणि सक्षम कर्मचारी आणि ग्रामीण टपाल सेवकांच्या माध्यमातून ग्राहकांच्या परिसरातील टपाल कार्यालये आणि ग्राहकांच्या दाराशी प्रत्यक्ष सेवा देऊन सुमारे 430 दशलक्ष ग्राहकांना सेवा देत आहे, आणि यामुळे देशातील टपाल विभाग संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या आणि विश्वसनीय टपाल सेवांपैकी एक झाला आहे,” केंद्रीय संपर्क राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी सांगितले. फिन्क्लूव्हेशनच्या माध्यमातून स्टार्टअप्सना सहभागी होऊन, संकल्पना मांडून त्यांचे विकसन आणि विपणन प्रेरित आणि अनुरूप उत्पादने आणि सेवा निर्माण करून त्या ग्राहकांसाठी वापरता येतील अशा प्रकारे त्यांची आखणी करण्यासाठी आमंत्रित करण्यात येते.
“आपल्या नागरिकांच्या गरजा वैविध्यपूर्ण आणि गुंतागुंतीच्या स्वरूपाच्या असून त्या पूर्ण करण्यासाठी काळजीपूर्वक विचारमंथन, सहानुभूतीपूर्ण उत्पादन रचना आणि वापरकर्त्यांमध्ये वेगवान प्रसार यांची गरज असते. फिन्क्लूव्हेशनच्या माध्यमातून भारतासाठी तंत्रज्ञानाने प्रेरित आर्थिक उपाययोजना विकसित करण्याच्या उद्देशाने आम्ही या क्षेत्रातील सर्वोत्तम प्रतिभावंतांना एकत्र आणतआहोत,”टपाल सेवा मंडळाचे अध्यक्ष आणि टपाल विभागाचे सचिव विनीत पांडे म्हणाले.
फिन्क्लूव्हेशनविषयक मार्गदर्शक स्टार्टअप कंपन्यांसोबत सहकार्याने काम करतील आणि ग्राहकांच्या गरजांनुसार बाजारासाठी योग्य धोरणांना आयपीपीबी आणि टपाल विभागाच्या परिचालन नमुन्यांनुसार उत्पादने तयार करतील.
फिन्क्लूव्हेशनसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या स्टार्ट अप्स कंपन्यांना https://www.ippbonline.com/web/ippb/fincluvation या संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल.
फिन्क्लूव्हेशन उद्घाटन कार्यक्रम :
आयपीपीबीविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी कृपया पुढील संकेतस्थळाला भेट द्या: www.ippbonline.com
S.Kane/S.Chjtnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1818708)
Visitor Counter : 399