पंतप्रधान कार्यालय
गुजरातच्या दियोदार इथल्या बनास दुग्धव्यवसाय केंद्रातील विविध विकास कामांचे उद्घाटन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
19 APR 2022 5:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 एप्रिल 2022
नमस्कार!
आपण सगळे आनंदात आहात ना? आता जरा आपली क्षमा मागून मी थोडं भाषण हिंदीत करणार आहे. कारण या प्रसारमाध्यमातील मित्रांनी विनंती केली आहे की तुम्ही हिंदीत बोललात तर चांगला होईल, म्हणून मला वाटलं की सगळं तर नाही, पण थोडं त्याचं देखील ऐकायला हवं.
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री मृदू आणि तितकेच कर्तव्यकठोर श्री भूपेंद्रभाई पटेल, संसदेतील माझे वरिष्ठ सहकारी, गुजरात राज्य भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्रीमान सी आर पाटील, गुजरात सरकारचे मंत्री भाई जगदीश पांचाल, या भागातले भूमिपुत्र श्री किर्तीसिंग वाघेला, श्री गजेन्द्रसिंग परमार, खासदार गण श्री परबत भाई, श्री भरत सिंग डाभी, दिनेश भाई अनावाडीया, बनास डेयरीचे उर्जावन अध्यक्ष, माझे सहकारी भाई शंकर चौधरी, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो!
आई नरेश्वरी आणि आई अंबाजीच्या पावन धरतीला मी शत-शत नमन करतो! आपणा सर्वांना माझा प्रणाम! कदाचीत आयुष्यात पहिल्यांदाच असं होत असेल की एकावेळी दीड – दोन लाख माता भगिनी आज मला इथे आशीर्वाद देत आहेत, आपणा सर्वांना आशीर्वाद देत आहेत. आणि जेव्हा आपण दृष्ट काढत होता (बलैया घेत ) तेव्हा मी माझ्या मनातल्या भावनांना आवर घालू शकत नव्हतो. तुमचे आशीर्वाद आणि आणि जगदंबेच्या भूमीतल्या मातांचे आशीर्वाद, माझ्यासाठी सर्वात अनमोल आशीर्वाद आहेत, अनमोल उर्जेचं केंद्र आहेत. मी बनासच्या सर्व मत भगिनींना आदरपूर्वक नमन करतो.
बंधू आणि भगिनींनो,
गेल्या एक दोन तासात मी इथे वेगवेगळ्या ठिकाणी गेलो आहे. दुग्धव्यवसाय क्षेत्राशी संबंधित सरकारी योजनांच्या लाभार्थी पशुपालक भगिनींशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. हे जे नवे संकुल बनविण्यात आलं आहे, त्यात बटाटा प्रक्रिया केंद्र आहे, तिथे भेट देण्याची संधी देखील मला मिळाली. या संपूर्ण दौऱ्यात जे काही मी बघितलं, जी चर्चा झाली, जी माहिती मला देण्यात आली, त्याने मी खूप प्रभावित झालो आहे आणि मी डेयरीच्या सगळ्या सहकाऱ्यांचे आणि आपणा सर्वांचे मनापासून खूप - खूप अभिनंदन करतो.
भारतात खेड्यांच्या अर्थव्यवस्थेला, माता भगिनींच्या सक्षमीकरणाला चालना कशी दिली जाऊ शकते, सहकाराची चळवळ म्हणजे सहकार क्षेत्र आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळ कसे दिले जाऊ शकते, या सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव इथे घेता येऊ शकतो. काही महिन्यांपूर्वी माझ्या लोकसभा मतदारसंघात, म्हणजेच वाराणसी इथे बनास काशी संकुलाचा शिलान्यास करण्याची संधी मिळाली होती.
मी बनास डेयरीचे मनापासून आभार मानतो, कारण माझ्या काशी क्षेत्रात येऊन तिथल्या शेतकऱ्यांची सेवा करण्याचा, पशुपालाकांची सेवा करण्याचा, संकल्प गुजरातच्या धरतीत जन्माला आलेल्या बनास डेयरीने केला आणि आता त्याला मूर्त स्वरूप दिले जात आहे. मी यासाठी काशीचा खासदार म्हणून आपल्या सर्वांचा ऋणी आहे आणि म्हणूनच मी विशेषत्वाने बनास डेयरीला मनापासून धन्यवाद देतो. आज इथे बनास डेयरी संकुलाच्या लोकार्पण सोहळ्यात भागीदार बनता आल्याने माझा आनंद अनेक पटींनी वाढला आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आज इथे जे लोकार्पण आणि शिलान्यास करण्यात आले आहे, ते आपल्या पारंपारिक शक्तीच्या जोरावर भविष्य घडविण्याचे उत्तम उदाहरण आहे. बनास डेयरी संकुल, चीज आणि मठ्ठा प्लांट, हे सर्व तर दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या विकासात महत्वाचे आहेतच, बनास डेयरीने हे देखील सिद्ध केले आहे की स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी इतर स्रोतांचा देखील उपयोग केला जाऊ शकतो.
तुम्ही सांगा, बटाटा आणि दुध यांचा काही तरी संबंध आहे का, कुठली समानता आहे का? मात्र बनास डेयरीने हा संबंध सुद्धा जोडला. दुध, ताक, दही, पनीर, आइसक्रीम यासोबतच बटाटा वडा, बटाटा फ्रेंच फ्राईज, हॅश ब्राऊन, बर्गर, पॅटिस यासारख्या उत्पादनांतून देखील बनास डेयरीने शेतकऱ्यांना सक्षम केले आहे. भारताच्या लोकल उत्पादनाला ग्लोबल करण्याच्या दिशेने सुद्धा हे एक चांगले पाऊल आहे.
मित्रांनो,
बनासकांठा सारख्या कमी पावसाच्या जिल्ह्याची शक्ती ही कांकरेज गाय, मेह्सनी म्हैस आणि इथले बटाटे आहेत. यामुळे शेतकरी आपले नशीब बदलू शकतात, हे मॉडेल आज बनासकंठा इथं आपण बघू शकतो. बनास डेयरी तर शेतकऱ्यांना बटाट्याचे बी देखील उपलब्ध करून देते आणि बटाट्याला उत्तम किंमत देखील देते. यामुळे बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपये कमावण्याचे एक नवे क्षेत्र खुले झाले आहे. हे केवळ बटाट्यापुरतंच मर्यादित नाही. मी नेहमी मधुक्रांतीबद्दल बोलत आलो आहे, मध उत्पादनातून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळवण्याचे आवाहन केले आहे , हे देखील बनास डेयरीने पूर्ण गांभीर्यानं घेतलं आहे. बनासकांठाची आणखी एक शक्ती, इथला भुईमुग आणि मोहरी यासाठी देखील डेयरीने एक उत्तम योजना तयार केली आहे, हे ऐकून मला चांगलं वाटलं. खाद्य तेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी सरकार जी मोहीम राबवत आहे, त्या मोहिमेला बळ देण्यासाठी आपली संस्था तेल निर्मिती यंत्र देखील बसवत आहे. या तेलबिया देखील शेतकऱ्यांना फार मोठं प्रोत्साहन आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आज इथे एक बायो - सीएनजी प्लांटचे लोकार्पण आणि 4 गोबर गॅस प्लांटचे भूमिपूजन करण्यात आले आहे. असे अनेक प्लांट्स बनास डेयरी देशभरात उभे करणार आहे. हे कचऱ्यातून सोनं या सरकारच्या मोहिमेला मदत करणारं आहे. शेणधनाच्या माध्यमातून एकावेळी अनेक ध्येय गाठले जात आहेत. एक तर, यामुळे खेड्यांच्या स्वच्छतेला बळ मिळत आहे. आणि दुसरं म्हणजे यामुळे पशुपालकांना शेणातून देखील पैसे मिळत आहेत, तिसरं, शेणापासून बायो - सीएनजी आणि विजेसारखी उत्पादने तयार होत आहेत. आणि चौथं, या संपूर्ण प्रक्रियेतून जे जैविक खत मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोलाची मदत मिळेल आणि आपल्या धरती मातेचे रक्षण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे जात आहोत. अशा प्रकारचे प्रयत्न बनास डेयरीच्या माध्यमातून संपूर्ण देशात पोचतील, तेव्हा आपली ग्रामीण अर्थव्यवस्था नक्कीच सुदृढ होईल, खेडी सुदृढ होतील, आपल्या बहिणी - मुलींचे सक्षमीकरण होईल.
मित्रांनो,
गुजरात आज यशाच्या ज्या शिखरावर आहे, विकासाच्या ज्या उंचीवर आहे, ते प्रत्येक गुजराथ्यासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. हा अनुभव मी काल गांधीनगरच्या विद्या समीक्षा केंद्रात देखील घेतला आहे. गुजरातच्या मुलांचे भविष्य, आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुधारण्यासाठी, विद्या समीक्षा केंद्र एक मोठी ताकद बनत आहे. आमचे प्राधान्य प्राथमिक शाळा, त्यासाठी इतके मोठे तंत्रज्ञान वापरणे, हे जगासाठी एक आश्चर्य आहे.
खरं म्हणजे मी या क्षेत्राशी सुरवातीपासूनच जोडला गेलो आहे, पण गुजरात सरकारच्या निमंत्रणावरून काल मी खास करून गांधीनगरला हे बघायला गेलो होतो. विद्या समीक्षा केंद्राच्या कामाचा जो विस्तार आहे, यात तंत्रज्ञानाचा जो उत्तम वापर केला गेला आहे, ते बघून मला फार चांगलं वाटलं. आपले लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भूपेंद्र भाईंच्या नेतृत्वात हे विद्या समीक्षा केंद्र, पूर्ण देशाला दिशा दाखविणारे केंद्र बनले आहे.
आपण जरा विचार करा, आधी मला एक तासासाठीच तिथे जायचं होतं, मात्र मी तिथली सगळी व्यवस्था, सगळ्या गोष्टी बघण्यात समजून घेण्यात इतका गुंग झालो की एक तासाचा कार्यक्रम असूनही मी दोन अडीच तास तिथेच खिळून राहिलो. इतका मला त्यात रस वाटू लागला. मी शाळेच्या मुलांशी, शिक्षकांशी खूप सविस्तर बोललो देखील. अनेक मुलं दक्षिण गुजरात, उत्तर गुजरात, कच्छ सौराष्ट्र अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आले आहेत. आज हे विद्या समीक्षा केंद्र गुजरातच्या 54 हजार पेक्षा जास्त शाळांसाठी साडेचार लाखांहून जास्त शिक्षक आणि दीड करोड पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या जिवंत उर्जेचे, शक्तीचे केंद्र बनले आहे. हे केंद्र कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, बिग डेटा एनालिसिस अश्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहे. विद्या समीक्षा केंद्र दर वर्षी 500 कोटी डेटा संचांचे विश्लेषण करते. यात मुल्यांकन चाचण्या, सत्राच्या शेवटी परीक्षा, शाळेची मान्यता, मुलांना आणि शिक्षकांच्या उपस्थितीशी संबंधित कार्य केले जातात. संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये एकप्रकाचे वेळापत्रक, प्रश्न पत्रिका, तपासण्या, या सर्वात देखील विद्या समीक्षा केंद्राची मोठी भूमिका आहे. या केंद्रामुळे शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती 26 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
शिक्षणाच्या क्षेत्रात हे आधुनिक केंद्र, संपूर्ण देशात मोठे परिवर्तन घडवून आणू शकते. मी भारत सरकारची संबंधित मंत्रालये आणि अधिकाऱ्यांना देखील सांगेन की विद्या समीक्षा केंद्राचा अवश्य अभ्यास करा. विविध राज्यांच्या संबंधित मंत्रालयांनीही गांधीनगरला भेट द्यावी , इथली व्यवस्था जाणून घ्यावी. विद्या समीक्षा केंद्र सारख्या आधुनिक व्यवस्थाचा लाभ देशातील जितक्या जास्तीत जास्त मुलांना मिळेल, तेवढेच भारताचे भविष्य उज्ज्वल बनेल.
आता मला वाटते , मी तुमच्याशी बनास बद्दल बोलायला हवे. सर्वप्रथम तर जेव्हा बनास डेअरी बरोबर सहभागी होऊन बनासच्या भूमीवर येतो तेव्हा मी आदरपूर्वक नतमस्तक होतो, श्रीमान गलबा काका यांच्यासाठी. आणि 60 वर्षांपूर्वी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गलबा काका यांनी जे स्वप्न पाहिले होते, त्याचा आज विराट वटवृक्ष बनला आहे, गया आणि बनासकांठा येथील प्रत्येक घराने एक नवीन आर्थिक शक्ती निर्माण केली आहे, त्यासाठी सर्वप्रथम गलबा काका यांना मी आदरपूर्वक नमन करतो. दुसरे वंदन माझ्या बनासकांठा इथल्या माता -भगिनींना, पशुपालनाचे काम मी पाहिले आहे, माझ्या बनासकांठा इथल्या माता -भगिनी घरात जसे आपल्या लहान मुलांना सांभाळतात, त्याहून अधिक प्रेमाने त्या गुरांना सांभाळतात. गुरांना चारा मिळाला नसेल, पाणी मिळाले नसेल, तर माझ्या बनासकांठाच्या माता -भगिनीना स्वतः पाणी प्यायला संकोच वाटतो. कधी लग्नासाठी, कधी सणांसाठी घराबाहेर जायचे असेल तेव्हा बनासच्या माझ्या माता -भगिनी नातेवाईकांकडील लग्नाला एकवेळ जाणार नाहीत, मात्र गुरांना एकटे सोडत नाहीत. हा त्याग आणि तपस्या आहे, या माता-भगिनींच्या तपस्येचा परिणाम आहे की आज बनास समृद्ध झाले आहे. म्हणूनच माझे दुसरे वंदन माझ्या या माता-भगिनींना आहे, मी त्यांना आदरपूर्वक प्रणाम करतो. कोरोनाच्या काळात देखील बनास डेअरीने महत्वाचे काम केले, गलबा काका यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालय बांधण्यात आले, आणि आता ही माझी बनास डेअरी बटाट्याची चिंता करते, गुरांची चिंता करते, दुधाची , चिंता करते, गोबरची चिंता करते, मधाची चिंता करते, ऊर्जा केन्द्र चालवते आणि आता मुलांच्या शिक्षणाकडेही वळली आहे. एक प्रकारे बनास डेअरी बनासकांठाची सहकार चळवळ समग्र बनासकांठाच्या उज्ज्वल भविष्याचे केंद्र बनले आहे. त्यासाठी देखील एक दूरदृष्टी असायला हवी, आणि मागील सात-आठ वर्षांमध्ये ज्याप्रकारे डेअरीचा विस्तार झाला आहे, आणि माझी त्यावर श्रद्धा असल्यामुळे माझ्याकडून जे शक्य आहे ते मी करतो, जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हाही नेहमीच हजर असायचो आणि आता तुम्ही मला दिल्ल्लीला पाठवले आहे, तेव्हाही, तरीही मी तुम्हाला सोडून दिलेले नाही. तुमच्याबरोबर राहून तुमच्या सुख-दुःखात बरोबर होतो. आज बनास डेअरी उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि ओदिशामध्ये सोमनाथच्या भूमीपासून जगन्नाथाच्या भूमीपर्यंत , आंध्रप्रदेश, झारखंड इथल्या पशुपालकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचे काम करत आहे. आज जगातील सर्वात मोठ्या दुध उत्पादक देशांमध्ये आपला भारत जिथे कोट्यवधी शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह दुधावर चालतो, तिथे एका वर्षात कितीवेळा आकडे पाहून काही लोक , मोठमोठे अर्थतज्ञ त्याकडे लक्ष देत नाहीत. आपल्या देशात एका वर्षात साडे आठ लाख कोटी लिटर इतके दुधाचे उत्पादन होते. गावांमध्ये विकेंद्रित आर्थिक व्यवस्था हे त्याचे उदाहरण आहे. त्यातुलनेत गहू आणि तांदुळाचे उत्पादन देखील साडे आठ लाख कोटी नाही. त्याहून अधिक दुधाचे उत्पादन आहे. आणि डेअरी क्षेत्राचा सर्वधिक लाभ छोट्या शेतकऱ्यांना मिळतो, दोन, तीन, पाच बिघा जमीन असेल, पावसाचा ठावठिकाणा नसेल पाण्याची टंचाई असेल, तेव्हा आपल्या शेतकरी बांधवांचे जगणे कठीण होऊन बसते. तेव्हा पशुपालन करून कुटुंबाचे पोट भरतात , या डेअरीने छोट्या शेतकऱ्यांसाठी खूप काही केले आहे. आणि छोट्या शेतकऱ्यांची मोठी चिंता हे संस्कार घेऊन मी दिल्लीला गेलो . दिल्लीत देखील संपूर्ण देशभरातील छोट्या शेतकऱ्यांची मोठी जबाबदारी घेण्याचे काम केले आणि आज वर्षातून तीनदा दोन -दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करतो. यापूर्वीच्या पंतप्रधानांनी म्हटलं होतं की दिल्लीतून जेव्हा एक रुपया दिला जातो तेव्हा त्यातले 15 पैसे पोहोचतात . आणि हे पंतप्रधान म्हणतात दिल्लीतून जेव्हा एक रुपया दिला जातो तेव्हा शंभर पैकी शंभर पैसे ज्याच्या घरी पोहोचायला हवेत त्याच्याच घरी पोहोचतात आणि शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात . अशी अनेक कामे आज भारत सरकार , गुजरात सरकार, गुजरातची सहकार चळवळ हे सर्व एकत्रपणे करत आहेत. सर्व चळवळींचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा जय जयकार करतो. आत्ताच भूपेंद्रभाई यांनी भावनिक गोष्ट सांगितली, सेंद्रिय शेती बद्दल ते बोलले . बनासकाठामधील लोकांना जेव्हा एक गोष्ट समजते तेव्हा ते ती कधीही सोडून देत नाहीत हा माझा अनुभव आहे . सुरुवातीला मेहनत लागते. मला आठवत आहे , वीज सोडा , वीज सोडा सांगुन मी थकलो होतो. आणि बनासच्या लोकांना वाटत होतं की या मोदींना काही माहीत नाही आणि आम्हाला सांगतात की वीज सोडून बाहेर या आणि माझा विरोध करत होते . परंतु जेव्हा शेतकऱ्यांना समजलं की ते माझ्यापेक्षाही दहा पावलं पुढे गेलेत आणि पाणी वाचवण्यासाठी त्यांनी मोठे अभियान राबवले, ठिबक सिंचन पद्धती स्वीकारली आणि आज या क्षेत्रात क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणण्याचे काम हे बनासकांठा करत आहे . मला पूर्ण विश्वास आहे की नर्मदा नदी जेव्हा बनासला जाऊन मिळते , तेव्हा तिचे पाणी ईश्वराचा प्रसाद मानून, पाण्याला पारस मानतात आणि यावेळी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे, स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, तेव्हा मी या जिल्ह्याला विनंती करतो की 75 मोठे तलाव बांधा, जेणेकरुन कोरड्या जमिनीवर जिथे काहीही पिकत नाही आणि जेव्हा एकदा किंवा दोनदा पाऊस पडतो तेव्हा पाणी वाहून तिथे जाईल अशी व्यवस्था करा , पाण्याने हा तलाव भरायला सुरुवात होईल . मला खात्री आहे ही धरती माता देखील अमृतमय होईल. म्हणूनच माझी अपेक्षा आहे जून महिन्यापूर्वी पाऊस पडण्यापूर्वी पुढील दोन-तीन महिन्यात जोरदार अभियान राबवा. 2023 मध्ये 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात , या एका वर्षात केवळ बनास जिल्ह्यात किमान 75 मोठे तलाव बांधा जे पाण्याने काठोकाठ भरलेले असतील. तेव्हा आज जे छोटे मोठे त्रास होत आहे , त्यातून आपण बाहेर येऊ आणि त्यात मी तुमच्या बरोबर असेन. जसे शेतात तुमचा सहकारी काम करतो, तसाच मी देखील तुमचा सहकारी आहे आणि म्हणूनच तुमचा मित्र म्हणून तुमच्या बरोबर उभा राहून काम करू इच्छितो . आता तर नडाबेट हे पर्यटन केंद्र बनले आहे . भारताच्या सीमावर्ती जिल्ह्याचा विकास कसा असावा, भारताची सीमा कशी जिवंत असावी याचे उदाहरण गुजरातने दिले आहे. कच्छच्या सीमेवर रणोत्सवाने संपूर्ण कच्छच्या सीमेला, तिथल्या गावांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केले आहे. आता ऩडाबेटने सीमा दर्शनाचा कार्यक्रम सुरू केला आहे , त्यामुळे बनास आणि पाटण जिल्ह्याच्या सीमेलगतच्या गावांसाठी देखील या पर्यटनामुळे आर्थिक घडामोडींना वेग येईल. दूरदूरच्या गावातून उदरनिर्वाहाच्या संधी उपलब्ध होतील , विकासासाठी कितीतरी मार्ग खुले होतील . निसर्गाच्या कुशीत राहून कठीण परिस्थितीत परिवर्तन घडवून आणू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे . मी बनासच्या नागरिकांना, गुजरातच्या नागरिकांना आणि एक प्रकारे देशातल्या नागरिकांना हे अनमोल रत्न त्यांच्या चरणी अर्पण करत आहे आणि या प्रसंगी बनास डेअरीने मला ही संधी दिली, त्यासाठी मी बनास डेअरीचा देखील आभारी आहे . माझ्या बरोबर दोन्ही हात वर करून मोठ्याने बोला , भारत माता की जय, आवाज जोरात यायला हवा , भारत माता की जय, भारत माता की जय!
खूप खूप धन्यवाद !
Jaydevi PS/ R.Aghor/S.Kane/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1818375)
Visitor Counter : 258
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam