पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गांधीनगर मधील शाळांसाठीच्या विद्या समीक्षा केंद्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट


केंद्रातील विविध विभागांचे केले निरीक्षण तसेच सर्व संबंधितांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

विद्यार्थी आणि शिक्षकांशीही अनौपचारिक, उत्स्फूर्त संवाद

अधिकाधिक विद्यार्थ्यांनी दीक्षा पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन

व्यवस्थेमधील पोषणमूल्य देखरेखीसाठी नवनव्या उपाययोजना शोधण्याचे आवाहन

सत्य आणि आभासी जगातला समतोल कायम राखण्यासाठी मानवी स्पर्शाचे महत्त्व समजून घेण्यावर भर

नव्या व्यवस्थेवर आधारित निकोप स्पर्धेचे वातावरण कायम ठेवण्याचेही केले आवाहन

Posted On: 18 APR 2022 10:36PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या गांधीनगर इथे शाळांसाठी अधिकार आणि नियंत्रण करणाऱ्या विद्या समीक्षा केंद्र  या संस्थेला भेट दिली. यावेळी, पंतप्रधानांना देखरेख व्यवस्था, व्हिडिओ वॉल, आणि विविध विभागांचे थेट प्रात्यक्षिक  दाखवण्यात आले. पंतप्रधानांना  एका दृकश्राव्य सादरीकरणाद्वारे संस्थेच्या कार्याचीही माहिती देण्यात आली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधानांनी सर्व संबंधितांशी संवाद साधला.अंबाजी शाळेच्या राजश्री पटेल यांनी सर्वप्रथम पंतप्रधानांशी संवाद साधला. नव्या तंत्रज्ञानात, शिक्षिकांना किती रस आहे, अशी विचारणा मोदी यांनी केली. तसेच दीक्षा पोर्टलच्या वापराबद्दलही त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. अनुपालनचा भार वाढला आहे की सुलभ झाला आहे, असेही त्यांनी विचारले. तसेच, आता, चिटिंग करणे कठीण झाले आहे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. सातव्या इयत्तेतील एका विद्यार्थ्याशीही त्यांनी संवाद साधला. सकस आहार घ्या आणि मस्त खेळा, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्याना दिला. विद्यार्थ्याशी त्यांनी सहज गप्पा मारल्या. या जिल्ह्याच्या सीआरसी समन्वयकांनी शाळांमध्ये नव्या तंत्रज्ञानामुळे आलेल्या बदलांची माहिती दिली. त्यांनीच पंतप्रधानांना समन्वयक करत असलेली देखरेख आणि पडताळणीची प्रक्रिया दाखवली. पंतप्रधानांनी यावेळी अनेक प्रश्न विचारत, हीच पद्धत पोषण आहारावर देखरेख ठेवण्यासाठी वापरता येईल का, असे विचारले.शिक्षकांना ही प्रक्रिया वापरता येते का, उत्तम समतोल आहारविषयी विद्यार्थी आणि इतर हितसंबंधियाना त्याविषयी कशी माहिती देता येईल, असेही त्यांनी विचारले.

यावेळी पंतप्रधानांनी  अनेक वर्षांपूर्वीच्या कॅनडा भेटीतील आपला वैयक्तिक अनुभव सांगितला. तिथे त्यांनी एका विज्ञान संग्रहालयाला भेट दिली आणि कियोस्कवर त्यांच्या आहाराविषयी लिहिले. मोदी शाकाहारी असल्याने, त्यांच्या आहाराचे वर्णन बघून मशीनने उत्तर दिले, तुम्ही एक पक्षी आहात!!

हा मजेदार किस्सा सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले की, तंत्रज्ञान जरी आपल्याला सहज उपलब्ध असले, आणि त्यातून आपल्यासाठी अनेक अज्ञात मार्ग खुले होत असले, तरीही, आभासी जगापेक्षा वास्तविक जग वेगळे असते,याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असा सल्ला त्यांनी दिला.

कच्छच्या एसएमसी प्राथमिक शाळा समितीच्या कल्पना राठोड यांना पंतप्रधानांनी, प्राथमिक शिक्षकांना मिळणाऱ्या फायद्यांविषयी विचारले. नव्या व्यवस्थेमुळे अनुपालनात सुधारणा होत आहे, असे त्यांना सांगण्यात आले. आठव्या इयत्तेतील पूजाशी संवाद साधतांना, त्यांनी एक जुनी आठवण सांगितली की, मेहसाणा इथल्या शिक्षकांना स्थानिक कच्छी भाषेत शिकवता येत नसे. मात्र आता परिस्थिती सुधारली आहे, अशी माहिती त्यांना देण्यात आली.

कमकुवत, अभ्यासात कच्च्या विद्यार्थ्यांना कशी मदत केली जाते, असेही पंतप्रधानांनी  विचारले. त्यावर, शाळेच्या मुख्याध्यापकांनी कोरोनाच्या काळात शिक्षकांनी जी-शाला, दीक्षा ॲप इत्यादींचा वापर कसा केला आणि भटक्या विमुक्तांनाही कसे शिक्षण दिले याची माहिती दिली. अनेक विद्यार्थ्यांकडे नवीन प्रणालीसाठी आवश्यक उपकरणे असल्याचेही पंतप्रधानांना सांगण्यात आले. व्यायाम, शारीरिक हालचालींवर कमी भर दिल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची चिंता व्यक्त केली. तसंच खेळ आता अतिरिक्त अभ्यासक्रम नसून अभ्यासक्रमाचा भाग आहे, असे त्यांनी सांगितले.

तापी जिल्ह्यातील दर्शना बेन यांनी त्यांचा अनुभव विशद केला आणि सांगितले की नवीन प्रणालीमुळे विविध बाबी कशा सुधारल्या आहेत. कामाचा ताण कमी झाल्याचेही त्या म्हणाल्या. दीक्षा पोर्टलवर बहुतांश विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्याचेही त्यांनी सांगितले. दहावीत शिकणाऱ्या तन्वीने सांगितले की, तिला डॉक्टर व्हायचे आहे. पंतप्रधानांनी तिला सांगितले की, पूर्वी विज्ञान विषय दुर्गम भागात उपलब्ध नव्हता, परंतु त्याविषयीच्या मोहिमेनंतर परिस्थिती बदलली आणि आता त्याचे फायदे दिसत आहेत.

गुजरातने नेहमीच नवनवीन पद्धती वापरल्या आणि नंतर संपूर्ण देश त्यांचा अवलंब करतो. इतर राज्यांनी दाखवलेल्या स्वारस्याविषयी त्यांना माहिती देण्यात आली. आभासी शिक्षणामुळे, विद्यार्थी आणि शिक्षकातला बंध कमी होऊ नये, अशी चिंताही पंतप्रधानांनी व्यक्त केली. प्रकल्पाच्या समन्वयकांनी मानवी संपर्क जिवंत ठेवण्यासाठी, विशेष प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले..  ‘रीड अलॉन्ग’ फीचर आणि व्हॉट्सॲपवर आधारित उपायांबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. नवीन प्रणालीवर आधारित निकोप स्पर्धेचे वातावरण राखण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

हे केंद्र दरवर्षी 500 कोटींहून अधिक डेटा संच संकलित करते आणि विद्यार्थ्यांसाठी एकूण शिक्षणाचे परिणाम वाढवण्यासाठी, बिग डेटा ॲनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग वापरून त्यांचे अर्थपूर्ण विश्लेषण करते. केंद्र शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन ऑनलाइन उपस्थितीचा मागोवा घेण्यास मदत करते, केंद्रीकृत सारांश आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिणामांचे नियतकालिक मूल्यांकन इत्यादी प्रयोग करते.  हे केंद्र शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन ऑनलाइन उपस्थितीचा मागोवा घेण्यास मदत करते, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिणामांचे केंद्रीकृत सारांश आणि नियतकालिक मूल्यमापन करतात. विद्या समीक्षा केंद्राला जागतिक बँकेने जागतिक सर्वोत्तम पद्धती वापरणारी संस्था म्हणून मान्यता दिली आहे, तसेच इतर देशांना भेट देण्यासाठी आणि शिकण्यासाठी आमंत्रित केले  आहे.

 

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1817906) Visitor Counter : 216