उपराष्ट्रपती कार्यालय
मूल्याधारित आणि नैतिकतेवर आधारीत राजकारणाच्या गरजेवर उपराष्ट्रपतींनी दिला भर
सार्वजनिक जीवन आणि भाषणे यांतील घसरलेल्या दर्जाबाबत श्री नायडू यांनी व्यक्त केली चिंता
निवडणुकीदरम्यान आश्वासन दिलेल्या मोफत भेटवस्तूंबाबत व्यापक चर्चा करण्याचे उपराष्ट्रपतींनी केले आवाहन
कृष्णा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत श्री पिन्नमनेनी कोटेश्वर राव यांच्या पुतळ्याचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण
Posted On:
18 APR 2022 4:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2022
उपराष्ट्रपती, श्री एम. व्यंकय्या नायडू यांनी आज भारतीय लोकशाहीचे संरक्षण आणि सशक्तिकरण करण्यासाठी मूल्याधारित आणि नैतिकतेवर आधारित राजकारणाला प्रोत्साहन देण्याची गरज असल्यावर भर दिला.
सार्वजनिक जीवनातील घसरत्या दर्जाबाबत चिंता व्यक्त करताना नायडू यांनी लोकप्रतिनिधींना त्यांच्या राजकीय विरोधकांवर वैयक्तिक हल्ले करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. त्यांनी महत्त्वाच्या राष्ट्रीय बाबींवर सर्व पक्षांचे एकमत निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला आणि तरुण तसेच राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांना विविध मुद्द्यांवर तत्त्वनिष्ठ भूमिका घेण्याचा सल्ला दिला.
आंध्रप्रदेशातील मच्छलीपट्टणम येथे कृष्णा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत श्री पिन्नमनेनी कोटेश्वर राव यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना नायडू म्हणाले की, श्री कोटेश्वर राव यांनी दोन दशकांहून अधिक काळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून लोकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. विकेंद्रित लोकशाहीमुळे जनतेला विकासाचे फायदे मिळू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले, असे उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.
श्री कोटेश्वर राव यांचे अनुकरण करण्याचे आवाहन तरुण राजकारण्यांना करत, श्री नायडू म्हणाले की, लोकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी राजकीय पक्षांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये वाजवी आणि व्यावहारिक आश्वासने दिली पाहिजेत;अन्यथा लोकांचा निवडणूक लोकशाही पध्दतीवरील विश्वास उडेल. त्यांनी निवडणुकीदरम्यान आश्वासन दिलेल्या मोफत भेटवस्तू आणि निवडणूक जाहीरनामा कायदेशीररित्या बंधनकारक करण्यावर व्यापक चर्चा करण्याचे आवाहन केले.
उपराष्ट्रपतींनी सुचवले, की लोकांनी त्यांचा सहभाग फक्त दर पाच वर्षांनी एकदा मतदान करण्यापुरताच मर्यादित ठेवू नये, तर निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि सरकार यांना सतत प्रश्न विचारले पाहिजेत, तसेच त्यांचे उत्तरदायित्व कायम राखण्याची मागणी केली पाहिजे. ते म्हणाले की, लोकांनी त्यांचे प्रतिनिधी 4Cs- 'चारित्र्य, पात्रता, क्षमता आणि आचरण' (character,caliber, capacity and conduct,)या आधारांवर निवडले पाहिजेत, 'जात, समुदाय, रोकड आणि गुन्हेगारी' या चार 'सी' च्या (caste, community,cash and criminality) आधारांवर नव्हे, ज्याला काही लोक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
माध्यमांनी सनसनाटी वृत्ते टाळावीत आणि समाजातील घडामोडी वस्तुनिष्ठ पद्धतीने प्रतिबिंबित करण्याचे आवाहन नायडू यांनी केले.
आंध्र प्रदेशचे गृहनिर्माण मंत्री श्री जोगी रमेश, कृष्णा जिल्हा परिषद अध्यक्ष श्री उप्पला हरिकृष्ण, विजयवाडा खासदार श्री केसिनेनी श्रीनिवास, आमदार श्री पेरनी वेंकटरामय्या आणि श्री समिनेनी उदय भानू, मच्छलीपट्टणम महानगरपालिकेचे महापौर श्री मोका व्यंकटेश्वरम्मा, माजी मुख्य दक्षता आयुक्त श्री के.व्ही.चौधरी, आंध्र प्रदेशचे माजी मंत्री श्री पिन्नमनेनी व्यंकटेश्वर राव आणि इतर मान्यवर या समारंभाला उपस्थित होते.
S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1817781)
Visitor Counter : 221