आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्मान भारत - आरोग्य आणि कल्याण केंद्रांच्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्याचे डॉ. मनसुख मांडविया यांनी आभासी माध्यमातून भूषवले अध्यक्षपद; 1 लाखाहून अधिक एबी-एचडब्ल्यूसीचा आभासी माध्यमातून सहभाग
18 ते 22 एप्रिल दरम्यान 1 लाखाहून अधिक एबी-एचडब्ल्यूसी येथे विभाग पातळीवर (ब्लॉकस्तरीय) आरोग्य मेळाव्यांचे आयोजन, मेळाव्यात 17 एप्रिल रोजी योगासह; क्षयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यांचे लवकर निदान व्हावे यासाठी तपासणी तसेच मूलभूत आरोग्य सेवांसह, औषधे, निदान आणि दूरसंचार सेवा
डॉ. मनसुख मांडविया यांनी एबी-एचडब्ल्यूसी, आरोग्यासाठी मानवी संसाधनांवरील मार्गदर्शक तत्त्वे, अंमलबजावणी तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन केडरचे मार्गदर्शन आणि भारतीय सार्वजनिक आरोग्य मानक मार्गदर्शक तत्त्वे यावरील तिमाही अहवाल केला सादर;
देशभरात आज 1,17,440 हून अधिक एचडब्ल्यूसी सक्रियपणे सुविधाजनक, किफायतशीर आणि विस्तारित आरोग्य सेवा पुरवत आहेत- डॉ. भारती प्रवीण पवार
Posted On:
16 APR 2022 4:58PM by PIB Mumbai
आयुष्मान भारत - आरोग्य आणि कल्याण केंद्राच्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्याचे अध्यक्षपद केन्द्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज आभासी माध्यमातून (व्हीसी) भूषवले. यात 1 लाखाहून अधिक एबी-एचडब्ल्यूसी, राज्यांचे आरोग्यमंत्री, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारी, विविध रुग्णालयांमधील आरोग्यसेवा कर्मचारी आणि विकास भागीदार आभासी माध्यमातून सहभागी झाले.
दूरसंचार मार्गदर्शनाच्या (टेलि-कन्सल्टेशनच्या) डिजिटल मंचाद्वारे पुरवल्या जाणार्या आरोग्य सेवांवर जोर देत, “विकास क्षेत्रात आरोग्य हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी नमूद केले. माननीय पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, आपण आरोग्य सेवा क्षेत्रात, तात्पुरता उपाय ते संपूर्ण तोडगा(“टोकन सोल्यूशन टू टोटल सोल्यूशन”) असा प्रवास केला आहे. दूरसंचार सेवा हे त्याचे उदाहरण आहे. पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार ई-संजीवनी रास्त आणि सुलभ आरोग्य सेवा पुरवत आहे. बर्याच राज्यांतील लोकांनी ई-संजीवनीचे फायदे चटकन ओळखले. यामुळे आरोग्य सेवांच्या या डिजिटल पद्धतीचा व्यापक जलद अवलंब करण्याचा उत्साहवर्धक कल वाढला आहे.
आरोग्य सेवा मिळवण्यासाठी या अभिनव डिजिटल माध्यमाचा वापर करून रुग्ण दररोज डॉक्टर आणि तज्ञांचे मार्गदर्शन घेतात. तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि सर्व्हायकल कर्करोग यासारख्या काही गंभीर आजारांसाठी तपासणी सेवा देखील आज काही एचडब्लू्सी पुरवत आहेत. केवळ लवकर निदानातच नाही तर रुग्णाला लवकर उपचार देण्यासही ते मदत करत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना एबी-एचडब्ल्यूसी आरोग्य मेळ्यांबाबत तातडीने आणि सक्रियपणे जनजागृती करण्याचा सल्ला दिला. हे मेळावे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (एकेएएम) अंतर्गत 18-22 एप्रिल दरम्यान आयोजित केले जातील. तसेच 17 एप्रिल रोजी सर्व एचडब्ल्यूसी येथे योग सत्रे आयोजित केली जाणार आहेत. यामुळे नागरिक या आरोग्य मेळ्यांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकतील आणि त्यांच्या प्रदेशातील एचडब्ल्यूसी सेवांबद्दल जागरूक होऊ शकतील. आरोग्य मेळाव्यात क्षयरोग, गर्भाशयाचा कर्करोग, मधुमेह आणि तोंडाच्या कर्करोगासाठी मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवण्याचा सल्ला त्यांनी राज्यांना दिला. या आरोग्य मेळाव्यात सर्वांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
केन्द्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावेळी चार पुस्तिकांचे प्रकाशनही केले. एबी-एचडब्ल्यूसी, आरोग्यासाठी मानवी संसाधनांवरील मार्गदर्शक तत्त्वे, अंमलबजावणी तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन केडरचे मार्गदर्शन आणि भारतीय सार्वजनिक आरोग्य मानक मार्गदर्शक तत्त्वे यावरील तिमाही अहवालांचा यात समावेश आहे.
देशभरात आज 1,17,440 हून अधिक एचडब्ल्यूसी सक्रियपणे विस्तारित आरोग्य सेवा पुरवत आहेत, त्यामुळे आरोग्य केंद्रापासूनचे व्यक्तीचे अंतर 30 मिनिटांपर्यंत कमी होत असल्याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आनंद व्यक्त केला.
"माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आज देशवासियांना कोणत्याही आर्थिक ओझ्याशिवाय सर्व आवश्यक आरोग्य सेवा त्यांच्या घराजवळ उपलब्ध करून दिल्या जात आहेत ही आज आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे पवार म्हणाल्या.
गरोदर माता असोत, नवजात बालके असोत, किशोर, युवक किंवा आदरणीय वयस्क असोत, सर्वजण आरोग्य आणि कल्याण केंद्रातील आरोग्य सेवांचा लाभ घेत आहेत. इतकेच नाही तर आरोग्य आणि कल्याण केंद्राची पायाभूत सुविधा देखील दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. जेणेकरुन विशेष दिव्यांग रूग्णांना देखील प्राथमिक आरोग्य सेवा मिळू शकतील. ही आरोग्य केंद्रे समाज आणि राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 च्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी आरोग्य सुविधांचे वितरण सुनिश्चित करत आहेत.
केन्द्र सरकार डिसेंबर 2022 पर्यंत 1,50,000 आयुष्मान भारत- आरोग्य आणि कल्याण केंद्रे (एबी-एचडब्ल्यूसी) स्थापन करण्यासाठी वचनबद्ध आहे असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सहभागींना सांगितले.
आतापर्यंत 1,17,400 एबी-एचडब्ल्यूसी देशात कार्यरत असून आणखी 1 लाखाहून अधिक जणांनी ई-संजीवनी एचडब्ल्यूसी पोर्टलवर यशस्वीपणे नोंदणीही केली आहे.
एबी-एचडब्ल्यूसी येथे 17 एप्रिल 2022 रोजी योग सत्र होईल.
एबी-एचडब्ल्यूसी मधील सेवा सुविधांमधे आरोग्य आणि तंदुरुस्तीचा एकत्रित सहभाग अधोरेखित करण्यासाठी ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ अंतर्गत सर्व एबी-एचडब्ल्यूसी मध्ये योग सत्रांचे आयोजन केले जाणार आहे.
विभाग स्तरावरील आरोग्य मेळाव्यांचे आयोजन 18 एप्रिल 2022 ते 22 एप्रिल 2022 या कालावधीत होणार आहे. राज्य/केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यातील किमान एका ब्लॉकमधील एबी-एचडब्ल्यूसी येथे ब्लॉक आरोग्य मेळावे 18 एप्रिल 2022 पासून, देशभरात सुरू होतील. प्रत्येक ब्लॉक आरोग्य मेळावा एका दिवसासाठी असेल आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक ब्लॉकमधे तो केला जाईल.
***
S.Patil/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1817312)
Visitor Counter : 259