संरक्षण मंत्रालय
भारत-अमेरिका 2+2 मंत्रीस्तरीय संवादानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन
Posted On:
12 APR 2022 9:17AM by PIB Mumbai
"मंत्री ब्लिंकन, मंत्री ऑस्टिन, डॉ जयशंकर, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, बंधू आणि भगीनींनो,
मी सचिवांचे, त्यांच्या शिष्टमंडळांचे आणि त्यांच्या कर्मचार्यांचे, उत्कृष्ट संवाद आणि प्रेमळ आदरातिथ्याबद्दल आभार मानतो. आमच्या द्विपक्षीय संबंधांबद्दलच्या त्यांच्या वचनबद्धतेचे मी मनापासून कौतुक करतो.
आपण आज खूप अर्थपूर्ण आणि सखोल चर्चा केली. यामुळे भारत-अमेरिका संबंधांची गती कायम राखण्यात आणि ते पुढे नेण्यात मदत होईल. आपल्या दोन महान राष्ट्रांचे परस्पर हितसंबंध आहेत आणि परस्पर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सामायिक इच्छाशक्ती आहे.
आम्ही द्विपक्षीय, संरक्षण आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही या नात्याने, बहुतेक मुद्यांवर आमची मते समान आहेत हे लक्षात घेणे सुखावह आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांची मुक्त, खुल्या, सर्वसमावेशक आणि नियमांवर आधारित भारत-प्रशांत (इंडो-पॅसिफिक) आणि हिंद महासागर क्षेत्रासंदर्भात समान भूमिका आहे. भारत-प्रशांत आणि हिंद महासागर क्षेत्रातील शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी आमची भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे.
बैठकी दरम्यान, आम्ही आमच्या शेजारील देशांतील आणि हिंद महासागर क्षेत्रातील परिस्थितीचे आकलन परस्परांशी सामायिक केले. भारताविरुद्ध राजकारणाचे साधन म्हणून दहशतवादाचा होत असलेला
वापर यात ठळकपणे समोर आला.
आमच्या व्यापक सहभागामुळे महत्वाची फलनिष्पत्ती होताना दिसत आहे. उदाहरणच द्यायचे तर, भारताचा अवकाश विभाग आणि अमेरीकेचा संरक्षण विभाग यांच्यात अंतराळ परिस्थितीविषयक जागरूकता करार पूर्ण करणे; नजीकच्या भविष्यात संरक्षण विषयक तसेच संरक्षणा संदर्भात कृत्रिम बुद्धिमत्ता संवाद सुरू करणे; चर्चेतील इतर उपक्रम आणि करारांवर लक्षणीय प्रगती; आणि आमच्या लष्करी सरावांची व्याप्ती आणि तीव्रता वाढवण्याची सामायिक इच्छा यांचा यामधे समावेश आहे.
महामारीचे आव्हान असतानाही आमचे लष्कर-ते-लष्कर सहकार्य सुरूच आहे. भारत हा बहारीन इथल्या बहुपक्षीय संयुक्त सागरी दलात (सीएमएफ) सहयोगी भागीदार म्हणून सामील झाल्याचा आम्हाला आनंद आहे. यामुळे पश्चिम हिंद महासागरातील प्रादेशिक सुरक्षेतील सहकार्य अधिक मजबूत होईल. आम्ही COMCASA ची प्रभावी तर BECA ची पूर्ण अंमलबजावणी करत आहोत.
संरक्षण सायबर, विशेष दल, LEMOA अंतर्गत आणि संयुक्त सरावांदरम्यान दळणवळण (लॉजिस्टिक) सहकार्याची व्याप्ती वाढवण्याच्या क्षेत्रात सहकार्याचे आणखी मार्ग शोधण्यावर आमची सहमती झाली.
प्रगत, उदयोन्मुख आणि महत्वाच्या लष्करी तंत्रज्ञानावरील संयुक्त प्रकल्पांसह, संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार उपक्रमाचे (डीटीटीआय) पुनरुज्जीवन तसेच त्याच्या त्वरीत कार्यान्वयनाच्या आवश्यकतेवर उभय देशांनी सहमती दर्शविली आहे.
अमेरीकी कंपन्यांसोबत सह-विकास आणि सह-उत्पादनाच्या दिशेने ही भागीदारी नेण्याची भारताची इच्छा मी व्यक्त केली. आम्ही ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत अमेरिकेच्या संरक्षण कंपन्यांनी भारतात गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन केले. भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी औद्योगिक सहयोग तसेच संशोधन आणि विकासातील भागीदारीमध्ये अमेरीकी संस्थांचा सहभाग महत्त्वाचा असेल.
भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक संरक्षण प्रतिबद्धता मजबूत करण्यासाठी आजची 2+2 बैठक महत्त्वाची आहे आणि आम्हाला परस्पर हिताच्या अनेक क्षेत्रांमध्ये सोबत काम करण्यास ती सक्षम करेल. शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी आणि जागभरातील सर्वसामान्य यांना मुक्त प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी आमचे वाढलेले सहकार्य महत्त्वपूर्ण असेल. मी मंत्री ऑस्टिन आणि मंत्री ब्लिंकन यांचे आदरातिथ्य आणि भारत-अमेरिका भागीदारी पुढे नेण्यात त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल पुन्हा आभार मानतो. पुढील 2+2 मंत्रीस्तरीय बैठकीसाठी आम्ही दोन्ही मंत्र्यांना परस्पर सोयीच्या वेळेनुसार भारतात आमंत्रित केले आहे.”
***
Jaydevi PS/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1815921)
Visitor Counter : 283