महिला आणि बालविकास मंत्रालय

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग 11 एप्रिल ते 31 मे 2022  या कालावधीत परीक्षा पर्व 4.0 साजरे करणार

Posted On: 10 APR 2022 9:47PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "परीक्षा पे चर्चा" कडून प्रेरणा घेऊन आणि परीक्षांना आनंददायी उपक्रम बनवण्यासाठी सुरु असलेल्या आपल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) 11 एप्रिल ते 31 मे 2022  या कालावधीत परीक्षा पर्व 4.0 साजरे करणार आहे.  2019 पासून 'परीक्षा पर्व' या मोहिमेद्वारे  राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग परीक्षेचा आनंद साजरा करत आहे. परीक्षेच्या निकालापूर्वी एका व्यासपीठावरून  मुलांचा परीक्षेच्या ताणासंदर्भातील दृष्टिकोन बदलणे आणि त्यांना वाटणाऱ्या  चिंतेवर मात करणे हा  यामागचा उद्देश आहे.

परीक्षा पर्व 4.0 हे  विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना त्यांचे विचार मांडण्यासाठी आणि तज्ञांकडून मार्गदर्शन आणि महत्त्वाच्या सूचना  मिळविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.तणावाच्या काळात, अस्वस्थ आणि गोंधळात टाकणारे विचार बोलून दाखवल्यामुळे आणि सामायिक केल्यामुळे विद्यार्थ्यांचा तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होईल.

यंदा, मुलांबरोबरच शिक्षक आणि पालकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने बहुआयामी दृष्टिकोनाचा अवलंब केला जाणार आहे. परीक्षा पर्व 4.0 मध्ये खालील उपक्रमांचा समावेश असेल:

i) परीक्षेच्या निकालापूर्वी विद्यार्थ्यांना आलेला परीक्षेचा ताण आणि चिंता कमी करण्यासाठी तज्ञांशी संवाद साधता यावा या दृष्टीने 11 एप्रिल 2022 ते 31 मे 2022 या कालावधीत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या फेसबुक, ट्विटर , युट्युब  आणि दूरदर्शन नॅशनल आणि न्यू इंडिया जंक्शनच्या युट्युब वाहिनीवर थेट प्रसारण सत्र आयोजित करण्यात येणार आहेत.

ii) संवेदना- कोविड संबंधित तणाव दूर करण्यासाठी (1800-121-2830) ही राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या  प्रशिक्षित समुपदेशकांची विनामूल्य  टेली समुपदेशन सेवा आहे, या समुपदेशन सेवेचा विस्तार आता  विद्यार्थ्यांचे परीक्षा आणि निकालाशी संबंधित प्रश्न, तणाव आणि चिंता दूर  करण्यासाठी  मदत करण्याच्या उद्देशाने केला  जाईल.

   

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1815492) Visitor Counter : 269