अंतराळ विभाग

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले, EOS-02 उपग्रह 2022 सालच्या दुसऱ्या तिमाहीत प्रक्षेपित केला जाईल

Posted On: 07 APR 2022 4:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2022

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान (स्वतंत्र प्रभार) , कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अवकाश विभाग तसेच पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांनी सांगितले आहे की,  EOS-02 उपग्रह 2022 सालच्या दुसऱ्या तिमाहीत प्रक्षेपित करण्यात येईल.

राज्यसभेत आज दिलेल्या लिखित उत्तरामध्ये केंद्रीय मंत्री म्हणाले की, EOS-02 हा तंत्रज्ञान सादरीकरण उपग्रह, कृषी, वन, भूरचना शास्त्र, जल विज्ञान, लघुरूपी उर्जा इलेक्ट्रॉनिक्स, प्रतिसाद चक्रे इत्यादी क्षेत्रांसाठी उपयुक्त ठरणार असून एसएसएलव्ही-1 च्या मदतीने अवकाशात सोडला जाईल.

याआधी हा उपग्रह 2021 या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत प्रक्षेपित करण्याचे निश्चित झाले होते, मात्र महामारीचा उद्रेक झाल्यामुळे लागलेली टाळेबंदी आणि जागतिक तसेच देशांतर्गत पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेल्या घटकांची, मनुष्यबळाची आणि इतर सुविधांची  अनुपलब्धता निर्माण झाल्यामुळे या उपग्रहाच्या प्रक्षेपणाला विलंब झाला अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली.

EOS-3 या उपग्रहाच्या प्रक्षेपणात अपयश येण्याच्या कारणांचा उहापोह करताना डॉ.जितेंद्र सिंग म्हणाले की, त्या प्रक्षेपणानंतर लगेचच गोळा केलेल्या माहितीची प्राथमिक तपासणी केल्यानंतर असे निदर्शनास आले की क्रायोजेनिक अप्पर स्टेज मधल्या विसंगतीमुळे ते अभियान अयशस्वी ठरले होते. जीएसएलव्हीच्या क्रायोजेनिक अप्पर स्टेज मधली विसंगती, त्यामुळे ती मोहीम बंद पडणे आणि त्यावर पुढील अभियानाच्या दृष्टीने  सुधारात्मक उपाययोजना करण्यासाठी या अपयशाची कारणे शोधणे या उद्देशाने या क्षेत्रातील तज्ञ  तसेच इस्रोमधील तज्ञांची राष्ट्रीय पातळीवरील अपयश विश्लेषण समिती नेमण्यात आली. जीएसएलव्ही-एफ 10 उड्डाणाच्या संगणकीय नकलेच्या मदतीने मिळालेली माहिती तसेच या उड्डाणाच्या वेळच्या परिस्थितीशी मिळत्याजुळत्या जमिनीवर केलेल्या विविध निश्चितीविषयक चाचण्या यातून समितीच्या विश्लेषणाला वैधता मिळाली असे त्यांनी सांगितले.

भविष्यातील जीएसएलव्ही अभियानांसाठी क्रायोजेनिक अप्पर स्टेजची मजबुती वाढविण्यासाठी समितीने काही सुधारात्मक शिफारसी केल्या आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. क्रायोजेनिक अप्पर स्टेजमध्ये आवश्यक सुधारणांचा समावेश असलेले जीएसएलव्ही वाहन 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत सज्ज होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे, आगामी जीएसएलव्ही अभियानाचे उड्डाण 2022 च्या चौथ्या तिमाहीत करता येईल असा अंदाज आहे, त्यामुळे आधीच्या अपयशामुळे संबंधित प्रकल्पांना कोणताही विलंब होणार नाही अशी खात्री केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केली.

 

 

 

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1814469) Visitor Counter : 234