राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय समाज हा भारत-नेदरलॅंड्मधील वाढत्या द्विपक्षीय संबंधांमधला सर्वात महत्वाचा आधारस्तंभ असून तो केवळ भारत -नेदरलँड्समधीलच नव्हे तर भारत व युरोपमधील सेतू आहे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद


भारतीय समुदाय आणि फ्रेंड्स ऑफ इंडिया यांनी ॲमस्टरडॅम येथे आयोजित केलेल्या समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted On: 07 APR 2022 3:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2022

भारतीय समाज हा भारत-नेदरलॅंड्मधील वाढत्या द्विपक्षीय  संबंधांमधला सर्वात महत्वाचा आधारस्तंभ असून तो केवळ भारत -नेदरलँड्समधीलच नव्हे तर  भारत व युरोपमधील सेतू आहे असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. नेदरलँड्समधील भारताच्या  राजदूत रीनत संधू यांनी काल सायंकाळी आयोजित केलेल्या समारंभात फ्रेंड्स ऑफ इंडिया आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांना त्यांनी संबोधित केले. हिंदुस्तानी-सुरीनामी समुदायाचे 2 लाखांहून अधिक सदस्य  तसेच 60,000 व्यावसायिक आणि विद्यार्थी एवढी संख्या असलेला नेदरलँड्समधील भारतीय वंशाचा समुदाय हा युरोपच्या मुख्य भूमावरील  सर्वात मोठा भारतीय वंशाचा  समाज आहे,असे ते म्हणाले.

नेदरलँड्समधील भारतीय व्यावसायिकांनी उत्तम कामगिरी केली  आहे, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. भारताला त्यांच्या कामगिरीचा आणि  यशाचा अभिमान आहे असे कौतुक त्यांनी केले .

गेल्या वर्षांतील महामारीमध्ये भारतीय वंशाच्या समुदायाने  वस्तू वा आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर केली. त्याचे  कौतुक करत  वस्तुस्वरूपात केलेली वा आर्थिक मदत देशाच्या विविध भागात उत्तम प्रकारे वापरण्यात आली असे राष्ट्रपतींनी सांगितले.

भारतीय समुदायासोबतचे बंध अधिक दृढ व्हावेत यासाठी आणि त्यांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी  भारत कटीबद्ध आहे असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षात देशांतरीत भारतीयांशी आपले नाती बहुआयामी झाले आहे असं ते म्हणाले. Care, Connect, Celebrate and Contribute  (काळजी, बंध, उत्सव आणि सहभाग ) अशा  4 ‘C’ च्या  माध्यमातून अनेक महत्वाचे उपक्रम राबवले गेले आहेत,असे राष्ट्रपतींनी सांगितले.  अनेक क्षेत्रात प्रतिष्ठा आणि विशेषाधिकार यासाठी परदेशस्थ भारतीय अशी नोंद असलेली भारतीय ओळखपत्रे दिली गेली आहेत. दीर्घकालीन व्हिसा आणि ई-व्हिसा यामुळे त्यांचा भारतातील प्रवास सुकर करण्यात आला आहे. 

गेल्या साडेसात दशकांमध्ये भारत आणि नेदरलँड्समधील द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुक यात लक्षणीय वाढ झाली आहे. नेदरलँड्स आता भारतातील तिसरा  सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. त्याचप्रमाणे भारतही नेदरलँड्समधील आघाडीच्या गुंतवणूकदारांपैकी  एक देश म्हणून उदयाला येत आहे.

तुर्कमेनिस्तान आणि नेदरलँड्स दोन्ही देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती आज 7 एप्रिल 2022 रोजी  नवी दिल्लीकडे  प्रयाण करत आहेत.

राष्ट्रपतींच्या भाषणासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

 

S.Kulkarni/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1814448) Visitor Counter : 280