संरक्षण मंत्रालय
युद्धाभ्यास ‘वरूण 2022 ’चा समारोप
Posted On:
04 APR 2022 4:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल 2022
‘वरुण 2022’ हा भारत आणि फ्रान्स दरम्यानचा 20 वा द्विपक्षीय नौदल युद्ध अभ्यास 3 एप्रिल 22 रोजी पूर्ण झाला. यावर्षीच्या युद्धाभ्यासात सागरी युद्धाशी संबंधित अनेक बाबींचा समावेश होता. या युद्धाभ्यास प्रात्यक्षिकांमधील सागरी विभागात अत्याधुनिक पाणबुडीरोधक युद्धनीती, तोफांची प्रात्यक्षिके, दर्यावर्दी क्षेत्रातील सुधारणा, रणनीतीच्या विविध पद्धती आणि विमानहल्ल्यांचा समावेश होता. नौदलाच्या विविध जहाजांनी एका जहाजावरुन दुसऱ्या जहाजावर हेलिकॉप्टर उतरवण्याची प्रात्यक्षिके दाखवली, यातून त्यांच्यातील सामंजस्याचे उत्तम प्रदर्शन करण्यात आले. तोफांचा वापर व जहाजांमधील आपापसातील रसद आपूर्तिसाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचाही सराव करण्यात आला.
अंतिम टप्प्यात पाणबुडीरोधक रणनीतीवर (ASW) भर देण्यात आला होता. आय एन एस चेन्नई या जहाजासोबत सी किंग Mk 42B, सागरी गस्ती विमान P 8i , फ्रेंच नौदल फ्रिगेट एफ एस कुरबेट, मदतनीस जहाज एफ एस लॉयर, तसेच इतर जहाजांनी मिळून पाणबुडीरोधक रणनीतीचा पूर्ण सराव केला. यात नौदल सैनिकांची अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने खोल समुद्रातील वाहतूक करणे याचा सरावही समाविष्ट होता.
शेवटच्या दिवशी म्हणजेच 3 एप्रिल 22 रोजी या युद्धसरावात दोन्ही देशांच्या नौदल अधिकाऱ्यांच्या आपापसातील भेटी व नौदल सैनिकांच्या अत्याधुनिक वाहतूक उपकरणांमार्फत वाहतुकीचा सरावाचा, तसेच समारोप सत्राचा समावेश होता. सर्व सहभागी पथकांचे आय एन एस चेन्नई या जहाजावर एकत्रीकरण व माहिती संकलन करण्यात आले. सर्व सागरी प्रात्यक्षिकांमधील आधुनिक बाबींचे विश्लेषण करून यापुढील सरावांमध्ये त्यातील कोणकोणत्या उपकरणांचा अथवा पद्धतींचा समावेश करता येईल याबद्दल चर्चा झाली. या सत्रानंतर युद्धाभ्यासाच्या समारोपामध्ये पारंपरिक पद्धतीने दोन्ही देशांच्या नौदलाच्या जहाजांचा ‘स्टीम पास्ट’ घेण्यात आला. आय एन एस चेन्नई ने फ्रेंच जहाजांच्या अगदी जवळून मार्गक्रमण केली व त्यादरम्यान दोन्ही देशांच्या जहाजांवरील सैनिकांनी एकमेकांचा निरोप घेत पुढील प्रवासात उत्तम समुद्री वारे व शांत समुद्र मिळण्यासाठी एकमेकांचे अभिष्टचिंतन केले.
दोन्ही देशांच्या जहाजांनी दाखवलेला उत्तम प्रतीचा समन्वय, अचूक वेळेत सर्व प्रकारच्या हालचाली व सागरी रणनीतीची उत्कृष्ट प्रात्यक्षिके हि या ‘वरुण 22’ या युद्धाभ्यासाची वैशिष्ट्ये होती. या युद्धाभ्यासाची सर्व उद्दिष्टे सर्व सहभागिनीं पूर्णपणे प्राप्त केली . या प्रात्यक्षिकांमधून भारतीय व फ्रेंच नौदलाने उच्च प्रतीचा समन्वय व आपापसातील उत्तम सहकार्यभावना प्रदर्शित केली. यामुळे भविष्यात गरज पडल्यास या दोन्ही नौदलांना एकत्रितरित्या काम करणे सोपे जाईल.
भारत व फ्रांस मधील धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत होण्यासाठी ‘वरुण 2022’ या युद्धाभ्यासाचा नक्कीच उपयोग होईल.
* * *
S.Thakur/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1813207)
Visitor Counter : 433