राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गांधीनगरमध्ये गुजरात विधानसभेच्या सदस्यांना संबोधित केले
Posted On:
24 MAR 2022 3:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2022
लोकशाहीत लोकप्रतिनिधींची भूमिका सर्वात महत्त्वाची असते, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. त्यांनी आज गांधीनगरमध्ये गुजरात विधानसभेच्या सदस्यांना संबोधित केले. विधानसभेचे सदस्य हे त्यांच्या क्षेत्रातील आणि राज्यातील जनतेचे प्रतिनिधी असतात. मात्र, त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक त्यांना आपले भाग्यविधाते मानतात असे राष्ट्रपती म्हणाले. लोकांच्या आशा-आकांक्षा त्यांच्याशी निगडित आहेत. जनतेच्या या आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याला प्राधान्य असायला हवे, असे ते म्हणाले.
भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण गुजरात विधानसभेच्या सदस्यांना संबोधित करत आहोत, याकडे लक्ष वेधून राष्ट्रपती म्हणाले की स्वातंत्र्य आणि त्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी गुजरातपेक्षा चांगली दुसरी जागा नाही. गुजरात प्रदेशातील लोक स्वतंत्र भारताची कल्पना साकारण्यात अग्रेसर होते. 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकात दादाभाई नौरोजी आणि फिरोजशाह मेहता यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांनी भारतीयांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. तो संघर्ष गुजरातच्या जनतेने सातत्याने बळकट केला आणि अखेरीस महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या स्वातंत्र्यात त्याची परिणीती झाली.
राष्ट्रपती म्हणाले की, महात्मा गांधींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला केवळ नेतृत्वच दिले नाही, तर संपूर्ण जगाला नवा मार्ग, नवीन विचार आणि नवीन तत्त्वज्ञानही दिले. आज जेव्हा जगात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होतो तेव्हा बापूंच्या 'अहिंसा' या ब्रीदवाक्याचे महत्त्व लक्षात येते.
राष्ट्रपती म्हणाले की, गुजरातचा इतिहास अद्वितीय आहे. महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांची ही भूमी सत्याग्रहाची भूमी आहे असे म्हणता येईल. जगभरात वसाहतवादाच्या विरोधात विश्वासार्ह शस्त्र म्हणून सत्याग्रहाचा मंत्र प्रस्थापित झाला. बार्डोली सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह आणि दांडी यात्रेने आपल्या स्वातंत्र्यलढ्याला केवळ नवा आकार दिला नाही तर निषेध व्यक्त करण्याला आणि लोक चळवळीला देखील नवा आयाम दिला.
राष्ट्रपती म्हणाले की, सरदार पटेल यांनी स्वतंत्र भारताला त्याचे अखंड भारताचे स्वरूप दिले आणि प्रशासनाचा पाया मजबूत केला. नर्मदेच्या काठावरील त्यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वात उंच पुतळा ही त्यांच्या स्मरणार्थ कृतज्ञ राष्ट्राने दिलेली छोटीशी भेट आहे. भारतीयांच्या हृदयात त्यांची प्रतिष्ठा त्याहूनही उंच आहे.
राष्ट्रपती म्हणाले की, राजकारणाव्यतिरिक्त गुजरातने सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नरसिंह मेहता यांच्या या भूमीवर अध्यात्माचा मोठा प्रभाव आहे. त्यांचे "वैष्णव जन तो तेणे कहिये, जे पीड परायी जाने रे" हे गीत आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे गीत बनले. त्यातून भारतीय संस्कृतीच्या मानवतावादाचा प्रसारही झाला होता. गुजरातमधील लोकांचे औदार्य हे भारतीय संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. या प्रदेशात प्राचीन काळापासून सर्व पंथाचे आणि समाजाचे लोक बंधुभावाने नांदत आहेत.
आधुनिक युगात गुजरातने विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. डॉ. होमी जहांगीर भाभा यांना भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक मानले जाते, तर भौतिक संशोधन प्रयोगशाळेचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांना भारतीय विज्ञानाचे, विशेषत: भारताच्या अवकाश संशोधनाचे प्रणेते मानले जाते.
1960 मध्ये अस्तित्वात आल्यानंतर गुजरात उद्योग आणि नवोन्मेषच्या माध्यमातून विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. गुजरातच्या भूमीवर सुरू झालेल्या श्वेतक्रांतीने पोषण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणल्याचे ते म्हणाले. आज भारत दुधाच्या एकूण उत्पादनात आणि वापराच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातमधील दूध सहकारी संस्था या यशाच्या मानकरी आहेत. गुजरातमधील सहकार संस्कृतीच्या यशाचे फायदे देशभरात पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सहकार मंत्रालयाची स्थापना केल्याचे त्यांनी नमूद केले.
या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी गुजरात विधानसभेने अनेक क्रांतिकारी पावले उचलल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. गुजरात पंचायत विधेयक 1961 आणि गुजरात अनिवार्य प्राथमिक शिक्षण कायदा, 1961 द्वारे स्थानिक स्वराज्य आणि शिक्षण क्षेत्रात एक प्रगतीशील व्यवस्था स्थापित केली गेली. गुजरात हे एकमेव राज्य आहे जिथे पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विधानसभेने गुजरात पायाभूत सुविधा विकास कायदा, 1999 मंजूर केला. भविष्याभिमुख कायदा बनवण्याच्या दिशेने या विधानसभेने मंजूर केलेला गुजरात सेंद्रिय कृषी विद्यापीठ कायदा, 2017 देखील उल्लेखनीय आहे. गुजरातच्या बहुआयामी प्रगतीत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी गुजरातच्या विद्यमान आणि मागील सरकारांचे तसेच गुजरात विधानसभेच्या विद्यमान आणि माजी सदस्यांचे कौतुक केले.
राष्ट्रपती म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून गुजरात विकास मॉडेलकडे एक अनुकरणीय उदाहरण म्हणून पाहिले जात आहे जे देशातील कोणत्याही प्रदेशात आणि राज्यात लागू केले जाऊ शकते. साबरमती रिव्हरफ्रंट हे शहरी परिवर्तनाचे एक प्रभावी उदाहरण आहे. पर्यावरणाचे रक्षण करताना साबरमती आणि येथील रहिवाशांमधील नातेसंबंधाला नवा आयाम देण्यात आला आहे. नदीकाठावर वसलेल्या देशातील इतर सर्व शहरांसाठी हे उत्तम उदाहरण ठरू शकते.
राष्ट्रपती म्हणाले की, आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अर्थपूर्ण पावले उचलणे हे आपले कर्तव्य आहे, जेणेकरून 2047 साली, जेव्हा भारत स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करेल, तेव्हा त्यावेळच्या पिढीला आपल्या देशाचा अभिमान वाटेल. भारताच्या स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष सुवर्णकाळ बनवण्याच्या उद्देशाने भारत सरकार, राज्य सरकारे आणि देशातील नागरिक विकासाच्या मार्गावर पुढे वाटचाल करत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपतींच्या संपूर्ण भाषणासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
S.Thakur/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1809167)
Visitor Counter : 285