आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
“कोविड-19 च्या व्यवस्थापनात भारताचा सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद” या स्वयंसेवी संस्थांच्या वेबिनारमध्ये डॉ. मनसुख मांडवीय यांचे बीजभाषण
भारताचे महामारी व्यवस्थापन प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, सहयोग, आत्मनिर्भरता, नवोन्मेष आणि आमच्या प्रयत्नांमध्ये अभिमानाचे सामर्थ्य प्रदर्शित करते: डॉ मनसुख मांडवीय
प्रविष्टि तिथि:
17 MAR 2022 4:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मार्च 2022
“कोविड 19 महामारीच्या व्यवस्थापनाने आणि विशेषत: अलीकडील ओमायक्रॉन लाटेमुळे “संपूर्ण सरकार” आणि “संपूर्ण समाज” या दृष्टिकोनातून प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, आत्मनिर्भरतेद्वारे स्वावलंबन, तंत्रज्ञानाचे समर्थन असलेला नवोन्मेष, सामायिक उद्दिष्टे आणि सहयोगी प्रयत्नांचे सामर्थ्य जगाला दाखवून दिले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी नीती आयोग आणि महामारीच्या काळात तळागाळातील व्यक्तींपर्यंत काम केलेल्या 200 हून अधिक स्वयंसेवी संस्था आणि नागरी संस्था संघटनांसोबत एका वेबिनारमध्ये बीजभाषण देताना हे नमूद केले. वेबिनारचे शीर्षक होते “कोविड-19 च्या व्यवस्थापनात भारताचा सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद”.

नागरिकांच्या सामूहिक भावनेचे कौतुक करताना ते म्हणाले की, "भारताची लसीकरण मोहीम ही भारताच्या क्षमता आणि लोकांच्या सामर्थ्याचा पुरावा आहे, ज्यांच्याशिवाय हा प्रवास आणि लसीकरणाची ही उच्च पातळी गाठणे शक्य झाले नसते." भौगोलिक आणि समाजशास्त्रीय विविधतेसह मोठी लोकसंख्या असूनही, भारताने कोविड लसीकरणाचे जागतिक मानक प्रस्थापित केले आहेत, असेही ते म्हणाले.

माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली भारताने प्रतिबंध, व्यवस्थापन, उपचार आणि लसीकरणासाठी वेळेवर आणि तत्पर निर्णय घेतले आहेत, असे ते म्हणाले. "निर्णायक आणि शक्तिशाली राजकीय इच्छाशक्ती काय साध्य करू शकते हे आम्ही जगाला दाखवून दिले आहे", त्यांनी नमूद केले.
ईसंजीवनी, लसीकरणासाठी कोविन पोर्टल, आरोग्य सेतू अॅप इत्यादीद्वारे महामारीच्या काळात आरोग्य सेवांच्या वाढीव सुलभतेसाठी तंत्रज्ञानाद्वारे बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका आणि त्याचा कसा फायदा झाला यावर त्यांनी प्रकाश टाकला.
‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि ‘शुभ लाभ’ या भारतीय तत्त्वज्ञानावर भर देताना ते म्हणाले, “भारताने केवळ दर्जेदार आणि परवडणाऱ्या लसींचे उत्पादन केले नाही, तर मानवतावादी दृष्टिकोनातून 150 हून अधिक देशांमध्ये औषधे निर्यात केली आहेत. सरकारच्या लस मैत्री कार्यक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक झाले आहे.”
हार्वर्ड विद्यापीठाचे डॉ. मार्क एस्पोसिटो यांनी सांगितले की, भारत सरकारच्या प्रशंसनीय कामगिरीने रचलेला पाया तत्पर आणि विज्ञान-आधारित प्रतिसादासाठी वचनबद्ध असलेली सरकारी यंत्रणा विकसित करण्यात सक्षम होईल.
भारताच्या विज्ञानामध्ये अंतर्भूत असलेल्या यशाला दुजोरा देताना, बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. ख्रिस इलियास यांनी कोविड महामारीविरोधात भारताच्या अनुकरणीय प्रतिसादाचे कौतुक केले. त्यांनी स्पष्ट केले की, “तथापि, या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि लसीकरण मोहिमेचे यश सुनिश्चित करण्यासाठी, स्वदेशी लस निर्मितीसाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली विविध टप्प्यांवर, त्वरीत महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. महामारीविरोधात भारताचा प्रतिसाद आणि देशाने विकसित केलेली रणनीती आता भविष्यातील महामारीचा सामना करण्यासाठी धडे गिरवण्याचा दृष्टीकोन बनला आहे.”
कोविड व्यवस्थापनाच्या बाबतीत भारताला इतर अनेक देशांपेक्षा वेगळी ओळख देणाऱ्या विशिष्ट उपक्रमांची रूपरेषा सांगताना, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमिताभ कांत म्हणाले, “भारताचा दृष्टीकोन तंत्रज्ञानाधारित होता ज्यामुळे संपूर्ण समाजाचा दृष्टिकोन साध्य करण्यात मदत झाली. कोविन ॲप हे लसीकरण मोहिमेचा गाभा ठरले. नागरी संस्था संघटना, स्वयंसेवी संस्था यांनी प्रत्यक्ष काम करताना घेतलेल्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. राजकीय इच्छाशक्ती आणि वचनबद्धता, धोरणांची स्पष्टता आणि सर्व हितधारकांना आमच्या दृष्टीकोनात सामावून घेतल्याने आम्ही हे साध्य करू शकलो, जो भारताने स्वीकारलेला सुशासन आदर्श दर्शवतो यावरही त्यांनी भर दिला.

विविध कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स (CRS) आणि नागरी संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी महामारीच्या काळात प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव सामायिक केला. विविध कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सनी लोकांपर्यंत अधिकृत आणि अचूक माहिती पुरवून, स्थानिक बोलीभाषेत माहिती सोपी करून, टाळेबंदी दरम्यान समुदायांना विविध सेवा पुरवून गैरसमज दूर करण्यात मदत केली.
S.Bedekar/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1806955)
आगंतुक पटल : 393