युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
तिसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2022 च्या समारोप सोहोळ्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे संबोधन
तरुणांनी राष्ट्राप्रती असलेले त्यांचे कर्तव्य ओळखून भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिकपणे काम करावे: लोकसभा अध्यक्ष
तरुण सकारात्मक बदलांसाठी नवोन्मेष घेऊन पुढे येत आहेत, जे देशाच्या लोकशाही भविष्यासाठी एक उत्साहवर्धक लक्षण आहे: अनुराग सिंह ठाकूर
प्रविष्टि तिथि:
11 MAR 2022 5:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2022
लोकसभा अध्यक्ष, ओम बिर्ला यांनी आज नवी दिल्ली येथील संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात तिसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सव-2022 च्या समारोप सोहोळ्याला संबोधित केले.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंह ठाकूर आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री, निशिथ प्रामाणिक हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकसभा अध्यक्ष आणि इतर मान्यवरांनी महोत्सवातील तीन युवा राष्ट्रीय विजेत्यांचे विचार जाणून घेतले.

उपस्थितांना संबोधित करताना बिर्ला म्हणाले की, राष्ट्रीय युवा संसद हा तरुणांना संसदीय कार्यपद्धती आणि लोकशाही प्रक्रिया समजावून सुसज्ज करण्याचा अभिनव कार्यक्रम आहे. नवीन भारत घडवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी हे व्यासपीठ तरुणांना प्रोत्साहन देते, असे निरीक्षण बिर्ला यांनी नोंदवले.

जगभर वेगाने होत असलेल्या बदलांचा उल्लेख करून बिर्ला यांनी तरुणांना या बदलांशी जुळवून घेण्याचे आवाहन केले जेणेकरून ते स्वत:ला त्यानुसार तयार करू शकतील आणि देशाला पुढे नेऊ शकतील.

देश जसजसा पुढे जात आहे, तसतसे तरुणांनी आपल्या कलागुणांनी आणि उर्जेने विकास, लोकशाही आणि लोकशाही संस्थांच्या बळकटीकरणात योगदान दिले पाहिजे, यावर बिर्ला यांनी भर दिला. ‘नेशन फर्स्ट’ अर्थात ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात मार्गदर्शन केले पाहिजे, असे मत बिर्ला यांनी व्यक्त केले. तरुणांनी राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य ओळखून भारताला आत्मनिर्भर बनविण्याच्या मोठ्या ध्येयाच्या दिशेने वैयक्तिक तसेच सामूहिकरित्या काम करावे, यावरही अध्यक्षांनी भर दिला.

देशाच्या घडामोडींमध्ये, आपली लोकशाही आणि तिच्या व्यवस्थेत तरुणांचा सक्रिय सहभाग असल्याने भारतीय लोकशाहीचे भविष्य खरोखर उज्ज्वल असल्याचा विश्वास युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंह ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रीय युवा संसद 2022 राष्ट्रीय फेरी स्पर्धेत भोपाळ येथील रागेश्वरी अंजना हिने प्रथम, डुंगरपूर, राजस्थान येथील सिद्धार्थ जोशीने द्वितीय आणि भटिंडा येथील अमरप्रीत कौर हिने तृतीय क्रमांक पटकावला. ओम बिर्ला यांनी तिसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले आणि सर्व सहभागींना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय युवा संसद महोत्सव (NYPF) हा सार्वजनिक सेवांसह आगामी काळात विविध क्षेत्रांमध्ये भरारी घेणाऱ्या तरुणाईचे विचार जाणून घेण्यासाठी आयोजित केला जातो. राष्ट्रीय युवा संसद महोत्सव हा 31 डिसेंबर 2017 रोजी पंतप्रधानांनी त्यांच्या मन की बात द्वारे मांडलेल्या कल्पनेवर आधारित आहे.

सर्वोच्च तीन राष्ट्रीय विजेत्यांना आजच्या समारोप सोहोळ्यात लोकसभा अध्यक्षांसमोर विचार मांडण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय स्तरावर 3 अंतिम विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि पुरस्कार दिले जातात (रोख बक्षिसे 2,00,000 रुपये, 150,000 रुपये, 100,000 रुपये) आणि कोणी उत्तेजनार्थ विजेता असल्यास 50,000 रुपयांची 2 उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाऊ शकतात.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1805125)
आगंतुक पटल : 326