ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनएचपीसीने आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा 933 कोटी 61 लाख रुपयांचा अंतरिम लाभांश भारत सरकारकडे सुपूर्द केला

Posted On: 11 MAR 2022 5:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मार्च 2022

भारतातील महत्त्वाची जलविद्युत निर्मिती कंपनी आणि केंद्र सरकारच्या ‘मिनी रत्न’ श्रेणी-1 ची संस्था असलेल्या एनएचपीसी अर्थात राष्ट्रीय जलविद्युत उर्जा महामंडळाने आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा 933 कोटी 61 लाख रुपयांचा अंतरिम लाभांश 4 मार्च 2022 रोजी भारत सरकारकडे सुपूर्द केला. भारत सरकारचे उर्जा सचिव आलोक कुमार यांच्या उपस्थितीत, एनएचपीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ए.के.सिंग यांनी 10 मार्च 2022 रोजी लाभांश देयकाची संदर्भित बँक सूचना केंद्रीय नवीन आणि नूतनीकरणीय उर्जामंत्री आर.के.सिंग यांच्याकडे सोपविली.

आर्थिक वर्ष 2020-21 मधील अंतिम लाभांशापोटी एनएचपीसीने विद्यमान आर्थिक वर्षात 249 कोटी 44 लाख रुपये याआधीच केंद्र सरकारला दिले आहेत. म्हणजेच, एनएचपीसीने केंद्र सरकारला 2021-22 या आर्थिक वर्षात लाभांश म्हणून एकूण 1183 कोटी 5 लाख रुपये दिले आहेत.

एनएचपीसीच्या संचालक मंडळाच्या 11 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या बैठकीत प्रत्येक इक्विटी समभागाच्या प्रत्यक्ष मूल्याच्या 13.10% म्हणजेच 1.31 रुपये प्रती समभाग या दराने अंतरिम लाभांश जाहीर करण्यात आला होता. या कंपनीचे सध्या आठ लाखांहून अधिक भागधारक आहेत आणि

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनीचा एकूण देय अंतरिम लाभांश 1315 कोटी 90 लाख रुपये आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये सव्वा रुपया प्रती समभाग दराने जाहीर केलेल्या अंतरिम लाभांशापोटी 1255 कोटी 63 लाख रुपये अदा केले आहेत, त्याचबरोबर या वर्षासाठीचा प्रत्येक समभागामागे 35 पैसे या दराने एकंदर 315 कोटी 58 लाख रुपयांचा अंतिम लाभांश देखील दिला आहे. 

आर्थिक वर्ष 2021-22 च्या शेवटच्या 9 महिन्यांमध्ये एनएचपीसीला एकूण 2977 कोटी 62 लाख रुपये इतका निव्वळ नफा झाला तर गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत हा नफा 2829 कोटी 16 लाख रुपये होता. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एनएचपीसीने एकूण 3233 कोटी 37 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमविला होता.

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1805111) Visitor Counter : 215