सांस्कृतिक मंत्रालय

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षपूर्तीनिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाकडून ‘अमृत काल का पहला साल’ सोहोळ्याचे आयोजन


सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रांत विकास मंत्री जी. किशन रेड्डी करणार या सोहळ्याचे नेतृत्व

महिला नेतृत्वाला समर्पित अमर चित्र कथेची विशेष आवृत्ती होणार प्रकाशित

Posted On: 10 MAR 2022 5:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मार्च 2022

केंद्र सरकारचा पुढाकार असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षपूर्तीनिमित्त सांस्कृतिक मंत्रालय 12 मार्च 2022 रोजी “अमृत काल का पहला साल” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मार्च 2021 रोजी प्रगतशील स्वतंत्र भारत, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध वारसा आणि भारताची कामगिरी साजरी करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाची सुरवात केली होती. हा उपक्रम स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनाही एक अभिवादन आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारताच्या भावनेने मार्गदर्शित भारत 2.0 साजरा करण्याच्या दृष्टीकोनातून साजरा केला जात आहे.

अमृत महोत्सवाच्या वर्षपूर्तीनिमित्त सेंट्रल पार्क, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली येथे सांस्कृतिक सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे आणि पर्यटन, सांस्कृतिक आणि ईशान्य प्रांत विकास मंत्री जी. किशन रेड्डी आणि परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. या कार्यक्रमात महिला नेतृत्वाला (संविधान सभेसाठी निवडून आलेल्या) समर्पित ‘अमर चित्र कथा’ या विशेष आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक वर्षाचा प्रवास मल्टीमीडिया सादरीकरणाद्वारे कथन करण्यात येणार आहे. शहीदांना डिजिटल श्रद्धांजली - "डिजिटल ज्योत" देखील उत्सवाचा एक भाग म्हणून प्रज्वलित केली जाईल. संध्याकाळी प्रसिद्ध कवी आणि कलाकार कुमार विश्वास आणि सुनील ग्रोव्हर, ध्वनी भानुशाली, अरमान मलिक आणि आरजे मलिष्का या कलाकारांचे प्रत्यक्ष सादरीकरण असेल.

विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रम आणि उपक्रमांना, प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही माध्यमातून देशभरातील लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद आणि सहभाग मिळाला आहे. 12 मार्च 2021 रोजी सुरू झालेल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांची 75 आठवड्यांची उलट मोजणी 15 ऑगस्ट 2023 रोजी संपेल.

 

S.Patil/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1804804) Visitor Counter : 226