भारतीय स्पर्धा आयोग

भारतीय स्पर्धा आयोगाने ॲमेझॉन आशिया-पॅसिफिक रिसोर्सेस या खासगी मर्यादित कंपनीला प्रीओन बिझनेस सर्विसेस या खासगी मर्यादित कंपनीचे अधिग्रहण करण्याची दिली परवानगी

Posted On: 10 MAR 2022 3:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 10 मार्च 2022

भारतीय स्पर्धा आयोगाने ॲमेझॉन आशिया-पॅसिफिक रिसोर्सेस या खासगी मर्यादित कंपनीला प्रीओन बिझनेस सर्विसेस या खासगी मर्यादित कंपनीचे अधिग्रहण करण्याची परवानगी दिली आहे.

प्रस्तावित एकीकरणात प्रीओन बिझनेस सर्विसेस या (लक्ष्य ठरलेल्या) खासगी मर्यादित कंपनीचे 76 टक्के इक्विटी समभाग अॅमेझॉन आशिया-पॅसिफिक रिसोर्सेस या (अधिग्रहण कर्ता) खासगी मर्यादित कंपनीतर्फे अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव आहे.

अधिग्रहण कर्ता कंपनी अप्रत्यक्षपणे ॲमेझॉन .कॉम, आयएनसी (एसीआय) या कंपनीच्या मालकीची उपकंपनी आहे तर एसीआय ही कंपनी ॲमेझॉन गटातील सर्व कंपन्यांची अंतिम पालक संस्था आहे. अधिग्रहण कर्ता कंपनी भारतात कोणतेही व्यापारी व्यवहार करत नाही. मात्र, एसीआय या अधिग्रहण कर्ता कंपनीच्या अंतिम पालक संस्थेच्या काही अप्रत्यक्ष उपकंपन्या एकतर भारतात नोंदणीकृत आहेत किंवा भारतात व्यापारी व्यवहार करत आहेत.

लक्ष्य कंपनी भारतीय मालकीची आणि नियंत्रित कंपनी असून हॉबर मॅलो ट्रस्टद्वारे तिचे संचालन होते. या कंपनीतील 76 टक्के भाग भांडवल हॉबर मॅलोकडे आहे. लक्ष्य कंपनीचे 23 टक्के भाग भांडवल आधीच अधिग्रहण कर्ता कंपनीच्या मालकीचे आहेत. अॅमेझॉन युरेशिया होल्डिंग्ज एस.ए.आर.एल. कडे लक्ष्य कंपनीचे 1 टक्का भाग भांडवल आहे. लक्ष्य कंपनी सूक्ष्म आणि लघु उद्योगांना त्यांचा ऑनलाईन व्यापार अधिक कार्यक्षमतेने करता यावा यासाठी विविध सेवा पुरविते. यामध्ये इतर गोष्टींसोबत, डिजिटल कॅटलॉगमध्ये नोंद, जाहिरात, प्रशिक्षण आणि समुपदेशन, सल्लागार आणि मूल्यवर्धित सेवा, डिजिटल भरणा व्यवस्थेचा स्वीकार आणि सक्षमता प्रदान करणाऱ्या इतर सेवांचा समावेश आहे.

क्लाऊडटेल इंडिया खासगी मर्यादित ही लक्ष्य कंपनीच्या संपूर्ण मालकीची कंपनी भारतात बी2सी किरकोळ व्यापारात गुंतलेली आहे आणि सध्या www.amazon.in या अॅमेझॉन सेलर सर्विसेस या खासगी कंपनीद्वारे संचालित ऑनलाईन बाजाराच्या माध्यमातून ग्राहकांना विविध उत्पादनांची विक्री करत आहे. क्लाऊडटेल इंडिया ही कंपनी ऑनलाइन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमांतून विविध उत्पादनांच्या बी2बी अशा घाऊक व्यापारात देखील गुंतलेली आहे.

भारतीय स्पर्धा आयोगाचा यासंदर्भातील तपशीलवार आदेश लवकरच जारी होईल.

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1804736) Visitor Counter : 182