वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृषी उत्पादनांच्या निर्यातीला केंद्र सरकारने दिलेल्या प्रोत्साहनाचे चांगले परिणाम


एप्रिल ते जानेवारी 2021-22 मध्ये 19,709 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मूल्याची कृषी निर्यात

गव्हाची निर्यातीत सुमारे चौपट वाढ, तर तांदुळाच्या निर्यातीतून सर्वाधिक परकीय चलन प्राप्त

इतर तृणधान्याच्या निर्यातीत 66 टक्के वाढ

Posted On: 07 MAR 2022 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मार्च 2022

 

कोविड 19 महामारीमुळे  वाहतुकीसंदर्भात आव्हाने असूनही   भारतातील  कृषी उत्पादने व प्रक्रियाकृत अन्नउत्पादनाच्या निर्यातीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांतच (एप्रिल ते जानेवारी 2021-22) गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत अमेरिकन डॉलर्सच्या चलनानुसार 23 टक्के वाढ झाली.

कृषी व प्रक्रियाकृत उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या (APEDA) कक्षेत येणाऱ्या उत्पादनांची एप्रिल ते जानेवारी 2020-21 मधील  निर्यात 15,974 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती, ती चालू  आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 19,709 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स पर्यंत वाढली.

वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने अपेडाच्या कक्षेत येणाऱ्या उत्पादनांच्या निर्यातीचे 2021-22 मधील उद्दिष्ट 23,713 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ठेवले आहे.

एप्रिल ते जानेवारी २०२१-२२ या कालावधीतील तांदुळाच्या निर्यातीतून सर्वाधिक 7696 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मूल्याचे  परकीय चलन मिळाले असून 2020-21 मधील याच कालावधीत मिळालेल्या 6,793 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स च्या तुलनेत ते 13 टक्क्यांनी वाढले आहे.

एप्रिल ते जानेवारी 2021-22 या कालावधीतील गव्हाच्या निर्यातीत मोठी वाढ होऊन ती 1742  दशलक्ष अमेरिकन डॉलर्स पर्यंत पोचली. 2020-21 साली याच कालावधीतील 358 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मूल्याच्या निर्यातीच्या तुलनेत ही निर्यात 387 टक्के वाढली आहे. इतर तृणधान्यांच्या निर्यातीत एप्रिल ते जानेवारी 2021-22 दरम्यान  66 टक्के वाढ झाली असून 869 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे उत्पन्न मिळाले आहे. एप्रिल ते जानेवारी 2020-21 या कालावधीत हे उत्पन्न 527  दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होते.

मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीत एप्रिल ते जानेवारी 2021-22 दरम्यान  13 टक्के वाढ होऊन ती 3408 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स झाली. एप्रिल ते जानेवारी 2020-21 दरम्यान हि निर्यात 3005 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती. फळे व भाज्यांच्या निर्यातीत एप्रिल ते जानेवारी 2021-22 दरम्यान  16 टक्के वाढ होऊन ती 1207 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स झाली. एप्रिल ते जानेवारी 2020-21 दरम्यान हि निर्यात 1037  दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती . प्रक्रियाकृत फळे व भाज्यांच्या निर्यातीत एप्रिल ते जानेवारी 2021-22 दरम्यान  11 टक्के वाढ होऊन ती 1269  दशलक्ष अमेरिकन डॉलर्स झाली. एप्रिल ते जानेवारी 2020-21 दरम्यान हि निर्यात 1143 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती .

तृणधान्यापासून बनलेले खाद्यपदार्थ व प्रक्रियाकृत अन्नपदार्थांच्या निर्यातीत  एप्रिल ते जानेवारी 2021-22 दरम्यान  14 टक्के वाढ होऊन ती 2956  दशलक्ष अमेरिकन डॉलर्स झाली.. काजूची निर्यातही चालू आर्थिक वर्षातील पहिल्या 10 महिन्यांत गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढून 383 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स झाली.

कृषी व प्रक्रियाकृत उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळेच कृषि उत्पादनाच्या निर्यातीत महत्वपूर्ण वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

‘‘आम्ही कृषी निर्यात धोरण, 2018 चे उद्दिष्ट विचारात घेवून राज्य सरकारांच्या सहकार्याने क्लस्टर्सवर लक्ष केंद्रीत करून निर्यातीला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देत आहोत.’’ असे  अपेडाचे अध्यक्ष डॉ. एम अंगमुथू म्हणाले.

‘‘आम्ही भौगोलिक संकेतांक नोंदणीकृत उत्पादनांच्या निर्यातीलाही प्रोत्साहन देत आहोत आणि ईशान्येकडील आणि पर्वतीय राज्यांमध्ये होणा-या वैशिष्टपूर्ण उत्पादनांची निर्यात करीत आहोत, ’’ असे अंगमुथू म्हणाले.

कृषी निर्यात धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अपेडा राज्य सरकारांशी संलग्न आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, नागालँड, तमिळनाडू, आसाम, पंजाब, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मणिपूर, सिक्कीम, उत्तराखंड, मध्य प्रदेश, मिझोराम आणि मेघालय या राज्यांनी निर्यातीसाठी राज्याच्या विशेष कृती आराखड्याला अंतिम स्वरूप दिले आहे. त्याचबरोबर इतर उर्वरित राज्येही आपल्या धोरणाला अंतिम स्वरूप देत असून त्यांचे काम वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे.

विविध देशांमध्ये ‘बीटूबी’ कृषी प्रदर्शनांचे आयोजन करण्याचे काम भारतीय दूतावासांच्या सक्रिय सहभागाने केले जात आहे. त्यामुळे विशिष्ट उत्पादन आणि सामान्य विपणन मोहिमेच्या माध्यमातून नव्या संभाव्य बाजारपेठांचा शोध घेण्याचे काम ‘अपेडा’च्या विविध उपक्रमांमुळे होत आहे. परिणामी कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादनाच्या निर्यातीमध्ये वाढ झाली आहे.

‘अपेडा’ने भारतातल्या भौगोलिक संकेत (जीआय) नोंदणीकृत कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी जगभरातल्या प्रमुख आयातदार देशांबरोबर कृषी आणि खाद्यान्न उत्पादनांचे खरेदीदार आणि विक्रेते यांच्या आभासी मेळाव्यांचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

निर्यात करण्यासाठी उत्पादनांना निर्वेध गुणवत्ता प्रमाणपत्र सुनिश्चित करण्यासाठी ‘अपेडा’ने निर्यातदारांना उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीच्या चाचणीच्या सेवा पुरविण्यासाठी भारतामधील 220 प्रयोगशाळांना मान्यता दिली आहे.

निर्यात धान्याची चाचणी आणि राहिलेल्या अवशेषाचे निरीक्षण योजनेसाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळा अद्यतन करणे आणि त्यांना बळकट करण्यासाठीही अपेडा मदत करते. कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे, गुणवत्ता सुधारणा आणि बाजारपेठ विकसित करण्यासाठी आर्थिक योजनेअंतर्गत मदतही अपेडाकडून केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यांमध्ये निर्यातदारांच्या सहभाग व्हावा, यासाठी कार्यक्रमांचे आयोजन अपेडाकडून केले जाते. यामुळे निर्यातदारांना त्यांच्या खाद्य उत्पादनांची जागतिक बाजारपेठेमध्ये विक्री करण्यासाठी व्यासपीठ मिळते. अपेडा कृषी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एएएचएआर,   ऑर्गेनिक वर्ल्ड काँग्रेस, बायोफॅच इंडिया यांच्यासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजनही करते.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या गुणवत्तेच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी अपेडाच्यावतीने फलोत्पादन उत्पादनांसाठी पॅक-हाऊसची नोंदणीही सुरू करते. शेंगदाणाचे फोलपट आणि प्रतवारी तसेच प्रक्रिया केंद्रासाठी निर्यात घटकाची नोंदणी करणे. उदाहरणार्थ युरोपियन आणि युरोपियन नसलेल्या देशांसाठी उत्पादनाच्या गुणवत्तेच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अपेडा काम करते.

जागतिक अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता आवश्यकतांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अपेडा मांस प्रक्रिया प्रकल्प आणि कत्तलखाने यांची नोंदणी करते. अपेडाचा आणखी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे, कोणते खाद्यान्न कोठून आले आहे, याचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आलेली कार्यप्रणाली आहे. यामुळे कोणत्याही अन्नाविषयी आयात करणा-या देशांच्या दृष्टीने सुरक्षा आणि गुणवत्तेचे अनुपालन सुनिश्चित होते. निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडा विविध आंतरराष्ट्रीय व्यापाराची  विश्लेषणात्मक माहिती संकलित करते. तसेच या माहितीचा प्रसार संबंधित भागिदार, बाजारपेठेमध्ये कार्यरत असलेले घटक, व्यापारी यांच्यापर्यंत करते.

तक्ता:- Agricultural and processed food products exports (April-January), 2021-22 vs 2020-21

Products

Exports (April-January) 2021-22 in USD million

Exports (April-January) 2020-21 in USD million

Growth (%)

Rice

7696

6793

13

Meat, Dairy & Poultry Products

3408

3005

13

Cereal Preparations and Miscellaneous Processed Items

2956

2599

14

Other Cereals

869

527

65

Cashew

383

345

11

Wheat

1742

358

387

Fruits & Vegetables

1207

1037

16

Miscellaneous processed items

1448

1310

10

Total

19,709

15,974

23

         

Source: DGCIS


* * *

N.Chitale/S.Thakur/U.Raikar/S.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1803714) Visitor Counter : 349