संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते इंडो-पॅसिफिक मिलिटरी हेल्थ एक्सचेंज आभासी परिषदेचे उद्घाटन


सशस्त्र दलांमध्ये महिलांची भूमिका व्यापक करून महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपविण्याचे सरकारचे उद्दिष्ट - संरक्षण मंत्री

Posted On: 07 MAR 2022 4:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मार्च 2022

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 7 मार्च, 2022 रोजी ‘आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस (एएफएमएस) आणि यूएस इंडो- पॅसिफिक कमांड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय ‘इंडो पॅसिफिक मिलिटरी हेल्थ एक्सचेंज’ (आयचीएमएचई) आभासी परिषदेचे उद्घाटन केले. कोणत्याही लष्करासाठी वैद्यकीय सेवा हा महत्वाचा स्तंभ असतो, असे सांगून आपल्या लढाईसंबंधित कर्तव्याव्यतिरिक्त, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आणि संकटाच्या काळामध्ये सर्वात बहुमोल मदत करणारे दुसरे प्रतिसादकर्ते आहेत. विशेष म्हणजे लष्कर सदैव, कायमस्वरूपी अशा दक्ष, सज्ज स्थितीत असते. सैनिक/ नाविक/ वैमानिक आणि त्यांचे कुटुंबीय त्याचबरोबर अतिशय व्यावसायिकतेसह मान्यवरांना प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, पुनर्वसनात्मक वैद्यकीय सेवांचा प्रचार आणि त्यांचे वितरण करीत असल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी एएफएमएसचे कौतुक केले.

या परिषदेची संकल्पना ‘अस्थिर, अनिश्चित, गुंतागुंतीचे आणि अस्पष्ट (व्हीयूसीए) जगात लष्कारी आरोग्य सेवा’ अशी निश्चित करण्यात आली आहे. 10 मार्च, 2022 पर्यंत सुरू राहणाऱ्या या परिषदेचे उद्दिष्ट लष्करी वैद्यक क्षेत्रामध्ये सहकार्य आणि संयुक्तता वाढविणे आहे. यामध्ये ऑपरेशनल/ कॉम्बॅट वैद्यकीय दक्षता, ट्रॉपिकल मेडिसिन, फील्ड सर्जरी, फील्ड अॅनेस्थेशिया, एव्हिएशन आणि मरीन मेडिसिन इमर्जन्सी यांच्यासह अनेक महत्वांच्या विषयांचा या परिषदेत समावेश करण्यात आला आहे.

या परिषदेमध्ये 38 पेक्षा जास्त देशांतील 600 पेक्षा अधिक भारतीय आणि परदेशी प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यूएस-इंडोपॅसिओएमच्या आयोजन समितीचे 20 सदस्यांचे शिष्टमंडळ या परिषदेचे सह-यजमानपद भूषविण्यासाठी नवी दिल्ली येथे आले आहेत. या चार दिवसांमध्ये परिषदेला उपस्थित राहिलेले प्रतिनिधी आणि वक्ते विविध 110 विषयांवर संवाद साधून अनुभव सामायिक करतील.

कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एएफएमएस आणि यूएस-इंडोपॅसिओएमने बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केले. ते म्हणाले, अतिशय कमी कालावधी असताना आणि विद्यमान पायाभूत सुविधांवर दबाव आणि स्त्रोतांमध्ये असमानता यासारख्या मर्यादा असूनही गेल्या दोन वर्षांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातल्या बंधुभगिनींनीमध्ये असलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टी समोर आल्या आहेत.

जगातल्या सशस्त्र दलांमध्ये महिलांनी बजावलेल्या महत्वाच्या भूमिकेवर आपले मत नोंदवताना राजनाथ सिंह म्हणाले, ‘‘महिलांना त्यांच्या समकक्ष कार्यरत असलेल्या पुरूषांच्या बरोबरीने वाढीव जबाबदाऱ्या देण्यावर आम्ही विश्वास ठेवतो’’. वेगवेगळ्या देशांमध्ये गणवेशातल्या महिलांसाठी कटीबद्धता आणि रोजगाराच्या वेगवेगळ्या अटी आहेत. भारतामध्ये, महिलांनी केवळ आरोग्य सेवा प्रदाता म्हणून नाही तर त्यांच्या व्यवसायाच्या सर्वोच्च स्तरावर जावून नेतृत्वाव्दारे लढाऊ वैद्यकीय सेवा क्षेत्रामध्ये  स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.


* * *

S.Thakur/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1803590) Visitor Counter : 311