इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
बंगलुरू येथे 7 आणि 8 मार्चला होणा-या भारत वैश्विक फोरमला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर उपस्थित राहून 30 युनिकॉर्न्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिका-यांबरोबर साधणार संवाद
Posted On:
06 MAR 2022 3:56PM by PIB Mumbai
बंगलुरू येथे 7 आणि 8 मार्चला होणा-या आयजीएफ म्हणजेच भारत वैश्विक फोरमला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर उपस्थित राहणार आहेत. या फोरममध्ये सहभागी होणा-या विविध युनिकॉर्न्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर ते संवाद साधणार आहेत. आयजीएफ म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि जागतिक नेत्यांसाठी ‘अजेंडा सेटिंग’ अर्थात कार्यक्रम निश्चित करण्यासाठीचे व्यासपीठ मानले जाते. त्याचा लाभ आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेटस् आणि धोरणकर्ते यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये धोरणात्मक दृष्टीने महत्वाच्या भौगोलिक भागधारकांबरोबर संवाद साधण्यासाठी होतो. बंगलुरू येथे आयजीएफची ही पहिलीच परिषद होत आहे. याआधी अशा प्रकारच्या परिषदा दुबई आणि यू.के. मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यू.के. चे पंतप्रधान, प्रिन्स ऑफ वेल्स बोरिस जॉनसन यांनी मार्गदर्शन केले होते.
कोविड महामारीचा सामना करतानाच भारत आता विविध सुधारणांचा अवलंब करणारे, दृढ आणि आपत्तींना चिवटपणे तोंड देणारे राष्ट्र म्हणून उदयास येत आहे. तसेच जगामध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारताची आहे, या पार्श्वभूमीवर ‘आयजीएफ’चे मार्चमध्ये आयोजन करण्यात येत आहे. महामारीचे प्रचंड आव्हान असतानाही भारताने 2021 मध्ये 42 युनिकॉर्न तयार केले आहेत. दरमहा तीनपेक्षा जास्त युनिकॉर्न देशात तयार झाले असून त्यांचे मूल्य जवळपास 90 अब्ज डॉलर आहे.
या फोरममध्ये 30 युनिकॉर्न्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिका-यांबरोबर मंत्री मुक्त संवाद साधणार आहेत, या सत्राची सर्वात जास्त प्रतीक्षा आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मंत्री देशभरातल्या स्टार्टअपशी संबंधित लोकांबरोबर बैठका घेत आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधत आहेत. तसेच या सर्व व्यावसायिकांना सरकारकडून संपूर्ण पाठिंबा दिला जात आहे.
***
S.Patil/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1803343)
Visitor Counter : 196