माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या सुप्रसिद्ध चित्रपट निर्मात्या द्वयीचा विस्तृत चित्रपट संग्रह एनएफएआयकडे सुपूर्द


त्यांनी निर्माण केलेले चित्रपट म्हणजे एका युगाचे अनमोल सामाजिक दस्तावेजीकरण आहे आणि कलेच्या विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांसाठी हे चित्रपट म्हणजे शैक्षणिक स्रोत ठरेल : एनएफएआयचे संचालक

Posted On: 01 MAR 2022 5:20PM by PIB Mumbai

मुंबई, 1 मार्च 2022

 

सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या द्वयीद्वारे निर्मित चित्रपटांचा विस्तृत संग्रह एनएफएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. सुनील सुकथनकर आणि चिन्मय दामले यांनी हा अनमोल ठेवा एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सोपविला. हा संग्रह एनएफएआयसाठी महत्वाचा आहे. चित्रपट क्षेत्रातील समीक्षकांच्या प्रशंसेला पात्र ठरलेल्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या चित्रपट निर्मात्या जोडीने गेली अनेक वर्षे असंख्य चित्रपटांची निर्मिती केली असून त्यांच्या चित्रपटांना भारतात तसेच परदेशातही विविध पारितोषिके आणि सन्मान मिळाले आहेत. गेल्या वर्षी सुमित्रा भावे यांचे निधन झाले.

एनएफएआयप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सुनील सुकथनकर म्हणाले, “एनएफएआय ही संस्था सदैव आमच्या चित्रपट निर्मितीच्या प्रवासाचा भाग होती आणि आता या संस्थेतील सुविधेत आमच्या चित्रपटांचे जतन होत आहे याबद्दल मला आनंद आहे. नव्या पिढीला हे चित्रपट पाहायला आणि अभ्यासायला मिळणे या उद्देशाने या सर्व साहित्याचे डिजिटलीकरण करण्यात येईल अशी आशा मी व्यक्त करतो.”

एनएफएआयकडे आज सुपूर्द करण्यात आलेल्या संग्रहात दहावी फ(2002), बाधा(2006), हा भारत माझा (2012) या चित्रपटांच्या आणि जिद्द (2004) या लघुकथेच्या 35 मिमीच्या प्रतींचा समावेश आहे तसेच यात जिंदगी जिंदाबाद (1997) हा चित्रपट आणि बाई (1985) हा लघुपट यांच्या 16 मिमी च्या प्रती आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि फिल्म सोसायटीचे कार्यकर्ते विजय मुळ्ये यांनी तयार केलेल्या किशन का उडन खटोला या चित्रपटाची 16 मिमी प्रत यांचा समावेश आहे.   

एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी हा चित्रपटसंग्रह संस्थेच्या ताब्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या निर्माता द्वयीचा हा  फार मोठा संग्रह एनएफएआयकडे जतन करण्यात येईल. या विषयासंदर्भात मी गेल्याच वर्षी सुमित्रा भावे यांच्याशी चर्चा केली होती. मात्र दुर्दैवाने, त्यांचे निधन झाले. समाजातील अनेक अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी निर्माण केलेले चित्रपट हे खरेतर एका युगाचे अनमोल सामाजिक दस्तावेजीकरण आहे. हा संग्रह म्हणजे या कलेच्या विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांसाठी अमुल्य शैक्षणिक स्रोत ठरेल याबद्दल मला खात्री आहे.” चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांनी त्यांच्याकडील चित्रपट एनएफएआयकडे सुपूर्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या निर्मात्या जोडीने अनेक उत्तम लघुपट, माहितीपट, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम आणि चित्रपट यांची निर्मिती करून मराठी चित्रपट क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले आहे.

आज सुपूर्द करण्यात आलेल्या संग्रहातील बहुतेक चित्रपट डिजीबीटा, बीटाकॅम, यूमॅटीक, डीएलटी टेप्स, डीव्ही, मिनी डीव्ही आणि व्हीएचएस स्वरुपात मॅग्नेटिक माध्यम प्रकारातील कॅसेट्स आहेत. यातील नावांमध्ये प्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांच्या जीवनावर आधारित  चित्रपट, जिंदगी जिंदाबाद (1997), देवराई (2004), एक कप च्या (2009) आणि मोर देखने जंगल में (2010) हे चित्रपट, मुक्ती (1990), चाकोरी (1992), लहा (1994), जिद्द (2004), बेवक्त बारीश (2007), ममता की छांव में, एकलव्य, संवाद आणि सरशी हे लघुपट, पार्टींग विथ प्राईड, गौतमच्या आईची शाळा आणि पिल्ग्रिम्स ऑफ लाईट हे माहितीपट तसेच कथा सरिता (2011), अखेरची रात्र आणि भैस बराबर हे दूरचित्रवाणी कार्यक्रम यांचा समावेश आहे. भाषाविषयक शिक्षण देणाऱ्या नातीगोती, हाऊ शॅल आय अॅड्रेस यू आणि अडगुलं मडगुलं या लघुपटांच्या मालिका देखील यामध्ये समाविष्ट आहेत.

याआधी 2014-15 मध्ये या निर्माता द्वयीने त्यांच्या काही चित्रपटांच्या 35 मिमी प्रती एनएफएआयकडे दिल्या होत्या आणि सुमित्रा भावे यांनी त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त 2018 मध्ये त्यांनी लिहिलेल्या दहा चित्रपटांच्या हस्तलिखित पटकथा एनएफआयला देणगी स्वरुपात दिल्या. 
 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1802114) Visitor Counter : 301