अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

46वा नागरी लेखा दिवस उद्या 2 मार्च रोजी साजरा होणार


केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये घोषणा करण्यात आलेल्या ई-बिल प्रोसेसिंग प्रणालीचा होणार प्रारंभ

Posted On: 01 MAR 2022 3:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 मार्च 2022

 

46वा नागरी लेखा दिवस उद्या 2 मार्च 2022 रोजी नवी दिल्ली येथे जनपथावरील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील. अर्थसचिव डॉ. टी. व्ही सोमनाथन आणि संस्थेच्या प्रमुख सोनाली सिंग आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असतील.

व्यवसाय सुलभता आणि डिजिटल इंडिया व्यवस्थेचा एक भाग म्हणून इलेक्ट्रॉनिक बिल( ई-बिल) प्रक्रिया प्रणाली या सरकारच्या महत्त्वाच्या उपक्रमाचा प्रारंभ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते करण्यात येईल. 2022-23च्या अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार ई- बिल प्रणाली केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये लागू करण्यात येईल. पारदर्शकता, कार्यक्षमता यात वाढ करण्यासाठी आणि ओळखरहित- कागदरहित प्रणालीसाठी हे पुढचे पाऊल आहे. आता पुरवठादार आणि कंत्राटदार त्यांचे दावे ऑनलाईन जमा करू शकतील आणि त्याबाबतची प्रक्रिया रियल टाईम म्हणजेच त्याच क्षणी पाहता येईल.

या एक दिवसाच्या कार्यक्रमात दोन तांत्रिक विषयावरील सत्रे आहेत. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांचे सार्वजनिक अर्थसाहाय्यविषयक सुधारणा या विषयावर प्रमुख भाषण होईल  आणि प्रकल्प व्यवस्थापन आणि प्रकल्प खरेदी संदर्भात सामान्य मार्गदर्शक सूचना याबाबत अर्थमंत्रालयाच्या खरेदी धोरण विभागाचे सल्लागार संजय अग्रवाल यांच्याकडून सादरीकरण करण्यात येईल.

सीजीए संघटनेवरील एका लघुपटाद्वारे नागरी लेखा संघटनेकडून राबवल्या जात असलेल्या नागरिक केंद्रित उपक्रमांची माहिती दिली जाईल. विविध प्रकारच्या शुल्काचा भरणा करण्यासाठी, खरेदीसाठी सरकारकडून उपलब्ध करण्यात आलेले पेमेंट पर्याय, अलीकडेच केलेल्या सुधारणा आणि पीएफएमएस( पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम) चा विकास आणि व्यवस्थापन यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावरही यात भर असेल.

पीएमएमएस हा एक एकीकृत आयटी प्लॅटफॉर्म असून त्याच्या माध्यमातून डीबीटीसह, नॉन टॅक्स रिसिट आणि आणि लेखाविषयक कामे केली जातात.  

या प्रणालीच्या भक्कमपणामुळे भारतीय नागरी लेखा संघटना कोविड-19 च्या काळातही सरकारी व्यवहार सुरळीत ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकली. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, कायदा आणि सुव्यवस्था शाश्वत राखण्यासाठी आणि अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी आणि तिची वृद्धी करण्यासाठी पेमेंट आणि रिसीटचे कार्य सुलभतेने सुरू राहणे गरजेचे आहे.

या कार्यक्रमाचे दूरदर्शन आणि एनआयवरून आणि एनआयसीच्या (https://webcast.gov.in/finmin/cga) या वेबकास्ट प्लॅटफॉर्मवरून थेट प्रसारण होईल.

 


* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1802076) Visitor Counter : 262