रसायन आणि खते मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मंडवीया यांनी देशातील संशोधन आणि नवोन्मेष यांना चालना देण्यासाठी उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्याचे केले आवाहन
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मंडवीया यांच्या हस्ते “इंडस्ट्री कनेक्ट 2022: उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील एकत्रित ऊर्जा” या विषयावरील परिसंवादाचे उद्घाटन
Posted On:
25 FEB 2022 3:48PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मंडवीया यांनी आज “इंडस्ट्री कनेक्ट 2022: उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील एकत्रित ऊर्जा” या विषयावरील परिसंवादाचे उद्घाटन केले. केंद्रीय रसायने आणि खते तसेच केंद्रीय नवीन आणि नूतनीकरणीय उर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा हे देखील या वेळी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री मांडवीया म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कोविड-19 महामारीचे परिणामकारक व्यवस्थापन केले आहे. ते पुढे म्हणाले की पंतप्रधानांनी वैज्ञानिक आणि वैद्यकीय समुदायाला सर्व प्रकारचा पाठींबा दिला आहे त्यामुळे भारत आता लस संशोधनाच्या बाबतीत इतर विकसित देशांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे उभा राहील याची सुनिश्चिती झाली आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी बोलताना कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये अभिनव संशोधन आणि तंत्रज्ञानाचे असलेले महत्त्व अधोरेखित केले तसेच संशोधन, नवोन्मेष आणि शिक्षण यांना चालना देण्यासाठी उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
नाविन्यपूर्ण संशोधनाविषयी आस्था आणि दर्जेदार उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ चे स्वप्न साकार होण्यास मदत होईल असे देखील त्यांनी सांगितले. अत्यंत उत्तम दर्जाची भारतीय उत्पादने जगभरात सर्वदूर पोहोचतील आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तसेच भारताच्या आर्थिक भरभराटीसाठी मोठे योगदान देतील, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक आराखडा तयार करण्यावर या परिसंवादात चर्चा होईल असा विश्वासही केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
***
R.Aghor/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1801139)
Visitor Counter : 200