संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्रालयाने भारतातील चार लाखांहून अधिक सेवा केंद्रांवर (कॉमन सर्व्हिस सेंटर) 'स्पर्श' अंतर्गत निवृत्तीवेतन सेवा सुरु करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली
प्रविष्टि तिथि:
24 FEB 2022 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2022
संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण लेखा विभागाने (DAD) सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड, या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विशेष उद्देश उपक्रम (SPV) सोबत निवृत्तीवेतन प्रशासन प्रणाली (रक्षा) {स्पर्श} अंतर्गत देशभरातील चार लाखांहून अधिक सेवा केंद्रांवर (CSCs) निवृत्तीवेतन सेवा सुरू करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारावर संरक्षण लेखा विभागाचे नियंत्रक (CDA) शाम देव आणि सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार राकेश यांनी 24 फेब्रुवारी 2022 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली.
या सामंजस्य करारामुळे निवृत्तीवेतनधारकांना, विशेषत: जे लोक देशाच्या दुर्गम भागात राहतात आणि ज्यांच्याकडे ' स्पर्श ' वर लॉग इन करण्याचे साधन किंवा तांत्रिक ज्ञान नाही त्यांना लाभ मिळेल. या निवृत्तीवेतनधारकांसाठी, सेवा केंद्रे स्पर्श साठी एक इंटरफेस बनतील आणि निवृत्तीवेतन धारकांना प्रोफाइल अपडेट विनंत्या करण्यासाठी, तक्रारींची नोंद आणि निवारण, डिजिटल वार्षिक ओळख पडताळणी, पेन्शनर डेटा पडताळणी किंवा त्यांच्या मासिक पेन्शनसंबंधी तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी प्रभावी माध्यम पुरवेल.
कोटक महिंद्रा बँकेसोबत एक सामंजस्य करार देखील करण्यात आला, ज्या अंतर्गत ते मोठ्या संख्येने माजी सैनिक राहत असलेल्या भागातल्या 14 शाखांमध्ये सेवा केंद्रे स्थापन करतील.
स्पर्श उपक्रमाद्वारे पेन्शन प्रशासनात कार्यक्षमता, प्रतिसाद आणि पारदर्शकता सुनिश्चित केल्याबद्दल संरक्षण सचिवांनी संरक्षण लेख महानियंत्रकांची प्रशंसा केली आणि सामंजस्य करारामुळे राहणीमान सुधारण्यास चालना मिळेल आणि पेन्शनशी संबंधित समस्यांचे वेळेत निराकरण होईल.
स्पर्श हा संरक्षण मंत्रालयाचा एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश सरकारच्या 'डिजिटल इंडिया', 'थेट लाभ हस्तांतरण (DBT)' आणि 'किमान सरकार, अधिक प्रशासन'च्या धर्तीवर संरक्षण विभागातील निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तिवेतनाचा लाभ मिळण्यासाठी सर्वसमावेशक उपाय प्रदान करणे हा आहे. ही प्रणाली संरक्षण लेखा विभागाद्वारे संरक्षण लेखा प्रधान नियंत्रक (पेन्शन), प्रयागराजच्या माध्यमातून नियंत्रित केली जाते आणि तिन्ही सेवा आणि संबंधित संस्थेच्या गरजा पूर्ण करते.
स्पर्श'ची रचना संरक्षण क्षेत्रातील निवृत्तीवेतनधारकांना केंद्रस्थानी ठेवून केली असून त्यांना ऑनलाइन पोर्टलद्वारे (https://sparsh.defencepension.gov.in/) त्यांच्या पेन्शन खात्याबद्दल पूर्णपणे पारदर्शक माहिती दिली जाईल.
* * *
M.Iyengar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1800826)
आगंतुक पटल : 387