ग्रामीण विकास मंत्रालय
अर्थसंकल्पातील घोषणांवर आधारित “लिव्हिंग नो सिटीझन बिहाईन्ड” या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनारला पंतप्रधान करणार संबोधित
Posted On:
22 FEB 2022 9:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2022
नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील काही बाबींवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अर्थसंकल्प पश्चात वेबिनारला संबोधित करणार आहेत. ‘लिव्हिंग नो सिटीझन बिहाईंड’ या संकल्पनेवर आधारित या वेबिनारमध्ये उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती, धोरणकर्ते आणि सरकारी अधिकारी यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये अर्थसंकल्पाच्या सकारात्मक परिणामांबाबत चर्चा घडवून आणणे तसेच प्रत्येकाच्या उत्थानाचे सामायिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात पोहोचून कोणीही समाजाच्या प्रवाहात मागे राहणार नाही याची खात्री करून घेण्यासाठी सामायिक काम करण्याची कृतीयोग्य धोरणे निश्चित करणे हे या वेबिनारच्या आयोजनाचे उद्दिष्ट आहे.
वेबिनारच्या दरम्यान सर्व भागधारकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देता यावे म्हणून घरबांधणी, प्रत्येक घरात पिण्यायोग्य पाणी आणि स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी, रस्ते आणि माहिती मार्ग जोडणी पुरविणे, संपूर्ण डिजिटलीकरण करून जमिनीचे प्रशासन, दुर्गम आणि मागासलेल्या भागांमध्ये विकास योजनांचा उत्तम प्रसार, रोजगार संधींची उपलब्धता आणि सर्वांसाठी विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी आर्थिक सेवांचा पुरवठा अशा संकल्पनांवर आधारित विविध सत्रांचे वेबिनारमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
या वेबिनारमध्ये भारत सरकारच्या ग्रामविकास मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय, पेयजल आणि स्वच्छता विभाग, सीमा व्यवस्थापन विभाग, टपाल विभाग, दूरसंचार विभाग आणि भूसंपत्ती विभाग यांच्यातील अधिकाऱ्यांसह इतर सरकारी अधिकारी आणि विविध सरकारी संस्थांचे प्रतिनिधी या वेबिनारमध्ये सहभागी होऊन अर्थसंकल्पाच्या चष्म्यातून वर उल्लेख केलेल्या विषयांबद्दल तसेच उद्योग क्षेत्रावर अर्थसंकल्पाचा परिणाम आणि ग्रामीण पार्श्वभूमी असलेले अर्थसंकल्पाचे लाभार्थी याबाबत स्वतःचे विचार मांडतील. या वेबिनारमधील चर्चेतून हाती आलेले निष्कर्ष विविध मंत्रालयांना कळविण्यात येतील जेणेकरून या योजनांच्या अधिक उत्तम अंमलबजावणीसाठी मंत्रालयांना त्यांच्या धोरणात योग्य ते बदल करता येतील.
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1800411)