निती आयोग
azadi ka amrit mahotsav

भारतीय वाहतूक क्षेत्राला कार्बनमुक्त करण्यासाठी हरित वित्तपुरवठा महत्त्वाचा आहे


शाश्वत वाहतूक व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी सक्षम वित्त पुरवठा पर्याय निश्चित करण्याच्या उद्देशाने नीती आयोग आणि डब्ल्यूआरआय संस्था यांनी संयुक्तपणे सल्लागार कार्यशाळेचे केले आयोजन

Posted On: 22 FEB 2022 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 फेब्रुवारी 2022

 

आशियासाठीचा एनडीसी-वाहतूक उपक्रमाचा (एनडीसी-टीआयए) भाग म्हणून नीती आयोग आणि डब्ल्यूआरआय अर्थात जागतिक साधनसंपत्ती संस्था यांनी आभासी पद्धतीने आज ‘वाहतूक क्षेत्राला कार्बनमुक्त करण्यासाठी हरित वित्तपुरवठा’ या विषयावरील सल्लामसलत  कार्यशाळेचे आयोजन केले.

या कार्यशाळेला विविध केंद्रीय मंत्रालयांतील मान्यवर, एनडीसी-टीआयए प्रकल्पाचे भागीदार, भारतीय बँकांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा संस्था आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या तसेच वाहतूक आणि वित्तपुरवठा क्षेत्रातील अनेक भागधारक आणि तज्ञ या कार्यशाळेला उपस्थित होते.

नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी बीजभाषण केले तर जर्मनीच्या आर्थिक तसेच जागतिक व्यवहार विभागाचे प्रमुख आणि मंत्री स्टीफन कोच यांनी विशेष भाषण केले.

आपल्या बीजभाषणात नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत म्हणाले की, भारतात वाहतूक क्षेत्र अधिक पर्यावरणस्नेही करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी आपल्याला अशा वित्तीय साधनांची अधिकाधिक आवश्यकता आहे. म्हणूनच आपण राज्यांतील, देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था, उत्पादक आणि संचालक यांना एकाच मंचावर आणण्याची गरज आहे. सार्वत्रिकपणे लागू होणाऱ्या, स्वीकारार्ह आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे टिकाऊ अशा वित्तपुरवठा यंत्रणेचा आपण शोध घेणे आवश्यक आहे. आपण खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीचा लाभ घेऊन तसेच आपल्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या ई-बस सेवेसाठी अर्थपुरवठ्याचे पर्याय शोधून सामायिक वाहतूक व्यवस्थेची जोपासना केली पाहिजे. आपल्या नागरिकांच्या गरजा आणि आकांक्षा यांच्यात समतोल साधणे, संपर्कव्यवस्था सुधारून जीवनमान आणि उत्पादकता यांच्यात सुधारणा घडवून आणणे, माल वाहतुकीचा खर्च कमी करणे,स्वच्छ वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासोबतच हवामान केन्द्रीत आणि केवळ पर्यावरणाच्या दृष्टीकोनातूनच नव्हे तर आर्थिक दृष्टीकोनातून देखील शाश्वत असा मार्ग निवडणे हे आपले व्यापक उद्दिष्ट आहे. हरित वित्तपुरवठा इलेक्ट्रिक वाहनांसाठी कमी व्याजदरातील कर्जपुरवठा शक्य करेल.

डॉ.स्टीफन कोच म्हणाले, “वाहतूक व्यवस्थेच्या विद्युतीकरणासाठी भारताला एका मजबूत आराखड्याची गरज आहे. यामध्ये वित्तपुरवठ्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विविध भागधारकांच्या संयुक्त सहकार्यातून भांडवलाचे चलनीकरण शक्य आहे. एनडीसी-टीआयए हा उपक्रम ‘वाहतूक क्षेत्राला कार्बनमुक्त करण्यासाठी वित्तपुरवठा’ या संकल्पनेसह विविध संकल्पनांशी संबंधित ज्ञानाचे आणि माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी विस्तारित क्षेत्रांतील सहभागींना एकत्र आणतो.”

एनडीसी-टीआयए हा भारत, चीन आणि व्हिएतनाम यांच्या सात संस्थांचा सहभाग असलेला आणि संबंधित देशांतील वाहतूक क्षेत्राला कार्बनमुक्त करण्यासाठी समावेशक दृष्टीकोनाला प्रोत्साहन देणारा संयुक्त कार्यक्रम आहे. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय हवामानविषयक उपक्रमाचा भाग आहे. पर्यावरणविषयक फेडरल मंत्रालय, निसर्ग संवर्धन आणि अणुसंबंधी सुरक्षा  या संस्था जर्मनीच्या बुंडेस्टॅगने स्वीकारलेल्या निर्णयाच्या आधारावर या प्रकल्पाला पाठींबा देतात. 

या प्रकल्पाच्या भारतातील अंमलबजावणीसाठी नीती आयोग या संस्थेवर अंमलबजावणी भागीदाराची भूमिका निभावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.


* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1800363) Visitor Counter : 300