राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आपल्या देशाच्या विविध भागांमध्ये विविध धार्मिक परंपरा आणि प्रथा प्रचलित असल्या तरी विश्वास  एकच आहे आणि तो म्हणजे संपूर्ण मानवजातीला एक कुटुंब मानून सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करणे: राष्ट्रपती रामनाथ कोविंद

Posted On: 20 FEB 2022 6:07PM by PIB Mumbai

 

''आपल्या देशाच्या विविध भागांमध्ये विविध धार्मिक परंपरा आणि प्रथा प्रचलित आहेत. पण विश्वास एकच आहे आणि तो म्हणजे संपूर्ण मानवजातीला एक कुटुंब मानून सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करणे,'' असे  प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे. ते आज (20 फेब्रुवारी, 2022) ओडिशा येथील पुरी येथे गौडीया  मठ आणि मिशनचे संस्थापक श्रीमद भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी प्रभुपाद यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त  तीन वर्षांच्या प्रदीर्घ सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

परमात्म्याची पूजा सर्व रूपात  केली जाते. पण भक्तीभावाने देवाची पूजा करण्याची परंपरा भारतात वैशिष्ठयपूर्ण असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. येथे अनेक महान संतांनी निःस्वार्थ  उपासना केली आहे. अशा महान संतांमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंना विशेष स्थान आहे. त्यांच्या विलक्षण भक्तीने प्रेरित होऊन मोठ्या संख्येने लोकांनी भक्तीचा मार्ग निवडला.

लोकांनी स्वत:ला गवतापेक्षा लहान समजून नम्र वृत्तीने देवाचे स्मरण करावे, असे श्री चैतन्य महाप्रभू म्हणत असल्याची आठवण राष्ट्रपतींनी करून दिली.

श्री चैतन्य महाप्रभूंचे ईश्वरावरील अविरत  प्रेम आणि समाजाला समानतेच्या धाग्याने जोडण्याची त्यांची मोहीम,यामुळे  भारतीय संस्कृती आणि इतिहासात त्यांना एक अद्वितीय स्थान आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

भक्तिमार्गातील संत हे धर्म, जात, लिंग आणि कर्मकांडावर आधारित त्या काळातील प्रचलित भेदभावाच्या पलीकडचे होते. त्यामुळे सर्व वर्गातील लोकांनी त्यांच्यापासून प्रेरणा तर घेतलीच शिवाय या मार्गाचा आश्रय घेतला, असे राष्ट्रपती म्हणाले.

भगवंताप्रति पूर्ण समर्पण  हे भक्तीमार्गाचे वैशिष्ठय  केवळ जीवनाच्या अध्यात्मिक क्षेत्रातच नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातही दिसून येते .  आपल्या संस्कृतीत गरजूंची सेवा करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले आहे.  आमच्या डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड महामारीच्या काळात ही सेवाभावना दाखवली, असे कौतुक राष्ट्रपतींनी केले.

श्री चैतन्य महाप्रभूंव्यतिरिक्त, भक्ती चळवळीतील इतर महान व्यक्तिमत्त्वेदेखील आपल्या सांस्कृतिक विविधतेतील एकता दृढ  करतात, असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी केले.

राष्ट्रपतींच्या भाषणासाठी  येथे क्लिक करा

***

N.Chitale/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1799854) Visitor Counter : 298