संरक्षण मंत्रालय

डिफेन्स एक्स्पो (DefExpo)- 2022 च्या तयारीचा संरक्षणमंत्र्यांनी घेतला आढावा ;कोविड प्रतिबंधक नियमांमध्ये शिथिलता आणल्यामुळे अधिक स्वारस्य निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचा कालावधी एका दिवसाने वाढवला


हा भव्य कार्यक्रम आता 10-14 मार्च 2022 दरम्यान गुजरातमध्ये गांधीनगर येथे होणार

राजनाथ सिंह यांनी डिफेन्स एक्स्पो 2022 मोबाईल अॅपचा केला प्रारंभ

Posted On: 18 FEB 2022 2:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 फेब्रुवारी 2022

 

संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी 18 फेब्रुवारी 2022 रोजी नवी दिल्ली येथे ,गुजरातमधील गांधीनगर  येथे आयोजित करण्यात येणार्‍या जमिनीवरून संचालित ,नौदल तसेच भूभागाच्या रक्षणासाठीच्या सुरक्षा प्रणालींवर आयोजित आशियातील सर्वात मोठे प्रदर्शन डिफेन्स एक्स्पो 2022 च्या तयारीचा आढावा घेतला.जगातील सर्वात मोठ्या संरक्षण आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांपैकी एक म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. कोविड-19 रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे भारताने आपले आरोग्य नियम  शिथिल केल्यामुळे या संरक्षण प्रदर्शनाच्या  12 व्या आवृत्तीच्या अनुषंगाने  देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक स्वारस्य  निर्माण झाले आहे.या भव्य प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी  आतापर्यंत, 930 प्रदर्शकांनी  नोंदणी केली आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये ही संख्या 1,000 च्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. 

कोविड नियमांमधील शिथिलतेमुळे राजनाथ सिंह यांनी या कार्यक्रमाचा कालावधी आणखी   एक दिवस वाढवला आहे. हे  प्रदर्शन आता 10-14 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. 

डिफेन्सएक्स्पो -2022 हे प्रदर्शन प्रत्यक्ष आणि आभासी या दोन्ही माध्यमातील  स्टॉल्ससह हायब्रीड माध्यमातील प्रदर्शन म्हणून आयोजित केले जाणार आहे. या प्रदर्शनात आभासी माध्यमातून सहभाग घेतलेले सहभागी  चर्चसत्रांमध्ये भाग घेऊ शकतात, प्रदर्शक आणि प्रतिनिधींशी संवाद साधू शकतात; बिझनेस-टू-बिझनेस (B2B) बैठका घेऊ शकतात  तसेच  उत्पादन तपशील आणि समर्थन चित्रफीती पाहू शकतात, अशी माहिती संरक्षण मंत्र्यांना यावेळी देण्यात आली.

हेलिपॅड एक्झिबिशन सेंटर (एचईसी ) येथे प्रदर्शन;महात्मा मंदिर कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर (एमसीईसी ) येथे कार्यक्रम आणि चर्चासत्र आणि साबरमती नदीकिनारी  जनतेसाठी थेट प्रात्यक्षिके  अशा तीन ठिकाणी  हे भव्य प्रदर्शन  आयोजित केले जात आहे. या दरम्यान कोविड प्रतिबंधासाठी असलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी, 'पाथ टू प्राइड’ ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे. परदेशी मूळ उपकरण उत्पादकांशी (ओईएम )  जोडले जाण्याच्या दृष्टीने  ठोस भागीदारी बळकट  करण्यासाठी.हे प्रदर्शन ,आघाडीवर असलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानयुक्त आणि लॉजिस्टिक कौशल्यासह  संरक्षण उद्योग, स्टार्ट-अप्स आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना  प्रोत्साहन देईल.राजनाथ सिंह यांनी संरक्षण मंत्रालयाने गुजरात सरकारच्या सहकार्याने केलेल्या व्यवस्थेची प्रशंसा केली आणि डिफेन्सएक्स्पो-2022 सुरक्षित वातावरणात आणि यशस्वी होईल असा  विश्वास व्यक्त केला.

या आढाव्या  दरम्यान  संरक्षण मंत्र्यांनी  डिफेन्स एक्स्पो -2022 संबंधित मोबाईल अॅपचा  देखील प्रारंभ केला. हे मोबाईल अॅप प्रदर्शक, वेळापत्रक, वक्ते , कार्यक्रम स्थळांचे  नकाशे, वाहन चालवण्याच्या मार्गदर्शक सूचना , प्रकाशने तसेच अभ्यागतांना आणि प्रदर्शकांना सूचना प्रदान करते.

संरक्षण  राज्यमंत्री   अजय भट्ट, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल आर.  हरी कुमार, लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, आर्थिक सल्लागार (संरक्षण सेवा) ) संजीव मित्तल आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी यावेळी उपस्थित होते.


* * *

M.Iyengar/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1799257) Visitor Counter : 282