पंतप्रधान कार्यालय
द एनर्जी अँड रिसोर्सेस (TERI’s) या संस्थेच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेतील पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण
Posted On:
16 FEB 2022 9:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2022
एकविसाव्या जागतिक शाश्वत विकास परिषदेमध्ये सहभागी होताना मला आनंद होत आहे.माझ्या 20 वर्षांच्या कार्यकाळात, प्रथम गुजरातमध्ये आणि आता राष्ट्रीय स्तरावर पर्यावरण आणि शाश्वत विकास हे माझ्यासाठी मुख्य केंद्रीत क्षेत्र आहेत.
मित्रांनो, आपण ऐकले आहे की, लोक आपल्या पृथ्वीला तकलादू म्हणतात. पण पृथ्वी तकलादू आहे असे नाही, आपण आहोत. आपण तकलादू आहोत. पृथ्वीशी , निसर्गाप्रती आपली बांधिलकीही तकलादू आहे. 1972 च्या स्टॉकहोम परिषदेपासून गेल्या 50 वर्षांत बरेच काही सांगण्यात आले आहे. फार थोडे केले गेले आहे. पण भारतात आम्ही उक्तीनूसार कृती सुरु केली आहे.
गरिबांना समान ऊर्जा उपलब्ध होणे हा आपल्या पर्यावरण धोरणाचा पाया आहे.उज्ज्वला योजनेद्वारे, 90 दशलक्षाहून अधिक कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यात आले आहे. पीएम-कुसुम योजनेअंतर्गत आम्ही नवीकरणीय ऊर्जा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे.आम्ही शेतकऱ्यांना, सौर पॅनेल लावण्यासाठी, त्याचा वापर करण्यासाठी आणि अतिरिक्त वीज ग्रीडला विकण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. स्वतंत्र सौर पंप तसेच सध्याच्या पंपांचे सौर पंपात रूपांतर करण्याचे प्रयत्न वाढवले जात आहेत. ''रसायन -मुक्त नैसर्गिक शेती'' वर लक्ष केंद्रित केल्याने शाश्वतता आणि समानतेला प्रोत्साहन मिळेल.
मित्रांनो, आमची एलईडी बल्ब वितरण योजना सात वर्षांपासून सुरू आहे. यामुळे प्रतिवर्षी 220 अब्ज युनिट्सपेक्षा जास्त विजेची बचत करण्यात आणि 80 अब्ज टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन रोखण्यासाठी मदत झाली आहे. आम्ही राष्ट्रीय हायड्रोजन अभियानाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. आमच्या भविष्याला बळकट करण्यासाठी हरित हायड्रोजन उत्पादन या प्रेरक तंत्रज्ञानाचा वापर करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. मी द एनर्जी अँड रिसोर्सेस (TERI) यांसारख्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थांना हरित हायड्रोजनची क्षमता ओळखण्याच्या दृष्टीने प्रमाणबद्ध उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहित करतो.
मित्रांनो, भारत हा विशाल वैविध्यपूर्ण देश आहे. जगाच्या भूभागाच्या 2.4% क्षेत्रासह, भारतामध्ये जगातील सुमारे 8% प्रजाती आहेत. या पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. आम्ही आमचे संरक्षित क्षेत्राचे जाळे बळकट करत आहोत. आय.यू.सी.एन. ने आमच्या प्रयत्नांना मान्यता दिली आहे. जैवविविधतेच्या प्रभावी संवर्धनासाठी हरयाणातील अरवली जैवविविधता उद्यानाला, इतर प्रभावी क्षेत्र-आधारित संवर्धन उपाय ' (O.E.C.M) स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. अलीकडेच, भारतातील आणखी दोन पाणथळ भूभागांना रामसर स्थळे म्हणून मान्यता मिळाल्याचा मला आनंद आहे. भारतात सध्या 1 दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त भागात 49 रामसर स्थळे आहेत. ऱ्हास झालेली जमीन पुन्हा कसदार करणे हे आमचे मुख्य केंद्रित क्षेत्र आहे. 2015 पासून, आम्ही 11.5 दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त जमीन पुन्हा सुपीक केली आहे. आम्ही बॉन चॅलेंज अंतर्गत नापीक झालेली जमीन पुन्हा कसदार करण्याची राष्ट्रीय वचनबद्धता साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. यु. एन. एफ. सी. सी. सी अंतर्गत दर्शवलेल्या आमच्या सर्व वचनबद्धता पूर्ण करण्यावर आमचा ठाम विश्वास आहे. ग्लासगो येथे कॉप -26 (CoP-26) दरम्यान आम्ही आमच्या आकांक्षाची उद्दिष्टे वाढवली आहेत.
मित्रांनो, पर्यावरणीय शाश्वतता केवळ हवामान न्यायानेच साध्य होऊ शकते, यावर माझा ठाम विश्वास आहे, आणि मला खात्री आहे की तुम्ही हे मान्य कराल. येत्या वीस वर्षात भारतातील लोकांच्या ऊर्जेची गरज जवळपास दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. ही ऊर्जा नाकारणे म्हणजे लाखो लोकांचे जीवन नाकारणे होय. यशस्वी हवामानसंदर्भातील कृतींसाठी देखील पुरेसा वित्तपुरवठा गरजेचा आहे. यासाठी विकसित देशांनी वित्त आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत त्यांच्या वचनबद्धतेची पूर्तता करणे आवश्यक आहे.
मित्रांनो, शाश्वततेसाठी जागतिक कॉमन्स म्हणजेच नैसर्गीक संसाधनांसाठी समन्वित कृती आवश्यक आहे. आमच्या प्रयत्नांनी हे परस्परावलंबित्व ओळखले आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या माध्यमातून ''एक सूर्य, एक जग, एक ग्रीड'' हे आमचे उद्दिष्ट आहे. जगभरात सर्वत्र असलेल्या ग्रिडमधून कायम स्वच्छ ऊर्जेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आपण कार्य केले पाहिजे. हाच ''संपूर्ण जग '' दृष्टीकोन आहे ज्यावर भारताची मूल्ये आधारलेली आहेत.
मित्रांनो, वारंवार नैसर्गिक आपत्तींना बळी पडणाऱ्या भागात मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करणे हे आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीच्या आघाडीचे (सी.डी.आर.आय.), उद्दिष्ट आहे.कॉप -26 च्या अनुषंगाने आम्ही "‘द्वीप राज्यांसाठी प्रतिरोधक पायाभूत सुविधा" नावाचा उपक्रम देखील सुरू केला आहे. विकसनशील द्वीप राष्ट्रे सर्वात असुरक्षित आहेत आणि म्हणून त्यांना त्वरित संरक्षणाची आवश्यकता आहे.
मित्रांनो, या दोन उपक्रमांना आम्ही आता लाईफ (LIFE) - पर्यावरणासाठी जीवनशैली हा उपक्रम जोडतो आहोत. लाईफ (LIFE) म्हणजे आपल्या पृथ्वी उन्नतीसाठी त्याअनुरूप जीवनशैली निवडणे. लाईफ (LIFE) ही शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देणारी जगभरातील समविचारी लोकांची एक युती असेल. या तीन जागतिक आघाड्या जागतिक संसाधनांच्या प्रगतीसाठी आपल्या पर्यावरणाच्या प्रयत्नांचे तीन गट तयार करतील.
मित्रांनो, आपल्या परंपरा आणि संस्कृती हेच माझे प्रेरणास्रोत आहेत. लोक आणि पृथ्वी यांचे आरोग्य एकमेकांशी कसे जोडलेले आहे, याबद्दल मी 2021 मध्ये बोललो आहे. भारतीय नेहमीच निसर्गाच्या सानिध्यात राहतात. आपली संस्कृती, परंपरा, दैनंदिन व्यवहार आणि शेतीशी संबंधित अनेक सण हे निसर्गाशी असलेले आपले घट्ट नाते दर्शवतात. कमी करणे (रिड्यूस), पुनर्वापर करणे, पुन्हा उपयोगात आणणे, पुनर्प्राप्त करणे, पुनर्रचना करणे आणि पुन:निर्मिती करणे हा भारताच्या सांस्कृतिक आचाराचा भाग आहेत. हवामान लवचिक धोरणे आणि पद्धतींसाठी भारत नेहमीप्रमाणे कार्य करत राहील.
या शब्दांसह आणि या पवित्र वचनासह, मी द एनर्जी अँड रिसोर्सेस (TERI’s) संस्थेला आणि या शिखर परिषदेत जगभरातून सहभागी झालेल्या सर्व सहभागींना माझ्या शुभेच्छा देतो.
धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद!
* * *
S.Thakur/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798908)
Visitor Counter : 309
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam