जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

9 कोटी ग्रामीण घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करत जल जीवन अभियानाने गाठला महत्वाचा टप्पा


2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घराला नळाने पाणीपुरवठा करण्याचा सरकारचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने जलजीवन अभियानाची वाटचाल

गोवा तसेच अन्य 5 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रत्येक ग्रामीण घराला नळाद्वारे पाणीपुरवठा

16 महिन्यांच्या अल्प कालावधीत, देशभरातील 8.46 लाख शाळा (82%) आणि 8.67 लाख (78%) अंगणवाडी केंद्रांना पिण्यासाठी आणि माध्यान्ह भोजनाच्या स्वयंपाकासाठी , हात धुण्यासाठी आणि शौचालयात वापरासाठी नळाद्वारे पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा

Posted On: 16 FEB 2022 11:07AM by PIB Mumbai

2024 पर्यंत देशातील प्रत्येक घराला नळाद्वारे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन साकार  करण्याच्या अनुषंगाने, कोविड  -19 महामारीचे संकट आणि लॉकडाऊनचा  व्यत्यय असतानाही, अडीच वर्षांच्या अल्प कालावधीत ,जल जीवन अभियानाच्या माध्यमातून  5.79 कोटींहून अधिक ग्रामीण  घरांना नळाद्वारे  पाणी पुरवठा करण्यात आला आहे. परिणामी, आज देशातील 9 कोटी ग्रामीण घरे नळाद्वारे पुरवठा केल्या जाणाऱ्या  स्वच्छ पाण्याचा लाभ घेत आहेत.

 

15 ऑगस्ट 2019 रोजी या अभियानाची  घोषणा करताना , भारतातील 19.27 कोटी घरांपैकी केवळ 3.23 कोटी (17%) घरांमध्ये नळजोडणी होती.मात्र  अल्पावधीत 98  जिल्हे, 1,129 तालुके , 66,067  ग्रामपंचायती आणि 1,36,135  गावांना या  ‘हर घर जल’ मोहिमेच्या माध्यमातून नळाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध झाला आहे. गोवा, हरयाणा, तेलंगणा, अंदमान आणि निकोबार बेटे, पुदुच्चेरी , दादर आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवमध्ये प्रत्येक ग्रामीण घराला नळाने पाणीपुरवठा होतो आहे.

 

जल जीवन अभियानाअंतर्गत , गुणवत्ता प्रभावित गावे, आकांक्षी जिल्हे, अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती असलेली  बहुसंख्य गावे, पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेले क्षेत्र आणि सांसद आदर्श ग्राम योजनेतील  (एसएजीवाय ) गावांना नळाद्वारे  पाणीपुरवठा करण्यासाठी प्राधान्य दिले जाते.गेल्या 24 महिन्यांत, 117 आकांक्षी  जिल्ह्यांमधील घरांना नळाद्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठा 24 लाख (9.3%) घरांवरून  सुमारे 1.36 कोटी (40%) घरांपर्यंत पोहोचला असून  तो   चार पटीने वाढला आहे.त्याचप्रमाणे, जपानी एन्सेफलायटीस-अ‍ॅक्युट एन्सेफलायटीस सिंड्रोम (जेई -आयईएस ) या आजाराने बाधीत   61 जिल्ह्यांमध्ये 1.15 कोटींहून अधिक घरांना  (38%) नळाने पाणीपुरवठा करण्यात आला आहे.

 

देशातील शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळाद्वारे स्वछ पाण्याचा पुरवठा करून  मुलांचे आरोग्य आणि निरामयता  सुनिश्चित करण्यासाठी, देशभरातील 8.46 लाख शाळा (82%) आणि 8.67 लाख (78%) अंगणवाडी केंद्रांना, पिण्यासाठी आणि  माध्यान्ह भोजनाच्या स्वयंपाकासाठी , हात धुण्यासाठी तसेच शौचालयात वापरासाठी नळाद्वारे  पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करण्यात  आला आहे. देशभरातील शाळांमध्ये 93 हजार पर्जन्य जलसंचय (रेनवॉटर हार्वेस्टिंग) सुविधा आणि 1.08 लाख सांडपाणी पुनर्वापर संरचना विकसित करण्यात आल्या आहेत.

 

जल जीवन अभियान  हा एक ‘ तळागाळापासून वरपर्यंत (बॉटम अप’) दृष्टीकोन आहे ,ज्यात नियोजनापासून अंमलबजावणी, व्यवस्थापन, संचालन आणि देखभालीपर्यंत  समुदाय  महत्त्वाची भूमिका बजावतो. यात आतापर्यंत 4.69 लाखांहून अधिक ग्राम पाणी आणि स्वच्छता समित्या (पाणी समित्या) स्थापन करण्यात आल्या आहेत आणि भारतभर 3.81 लाखांहून  अधिक ग्राम कृती योजना विकसित करण्यात आल्या आहेत. क्षेत्रीय चाचणी संच (एफटीके ) वापरून कोणत्याही प्रकारच्या दूषित पाण्याचे नमुने तपासण्याचे प्रशिक्षण प्रत्येक गावातील पाच महिलांना दिले जात आहे.क्षेत्रीय चाचणी संचाद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी आतापर्यंत 9.13 लाखांहून अधिक महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

 

जल जीवन अभियानाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी,जल जीवन अभियानाची  सर्व माहिती सार्वजनिक मंचावर  आणि जेजेएम डॅशबोर्डवर उपलब्ध आहे. https://ejalshakti.gov.in/jjmreport/JJMIndia.aspx या दुव्यावर क्लिक करून ही माहिती जाणून घेता येईल.

***

Jaydevi PS/Sonal C/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1798707) Visitor Counter : 329