सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कलेच्या क्षेत्रात वावरणारे कलाकार आणि गुणवंत यांची आर्थिक तसेच सामाजिक-अर्थविषयक स्थिती सुधारण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ‘कलाकारांसाठी निवृत्तीवेतन आणि वैद्यकीय मदत’ योजना सुरु केली

Posted On: 03 FEB 2022 9:11PM by PIB Mumbai

 

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने कलाकारांसाठी निवृत्तीवेतन आणि वैद्यकीय मदतयोजना नावाची एक नवी योजना सुरु केली आहे. विशिष्ट कला आणि साहित्य क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या पण सध्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन कंठणाऱ्या वयोवृद्ध कलाकार आणि गुणवंतांच्या आर्थिक तसेच सामाजिक-अर्थविषयक परिस्थितीत सुधारणा करणे हा या योजनेचा उद्देश आहे. ज्या कलाकारांचे (व्यावसायिक तसेच बिगर-व्यावसायिक अथवा हौशी) वय 60 हून अधिक आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न 48,000/- रुपयांहून कमी आहे अशा पात्र लाभार्थ्यांना या योजनेतून निधी दिला जातो. त्याशिवाय संस्कृती मंत्रालय कला आणि संस्कृती संवर्धनासाठी शिष्यवृत्ती तसेच  फेलोशिपयोजना देखील राबवीत आहे. या योजनेचे खालील तीन मुख्य घटक आहेत:-

  1. विविध कला क्षेत्रातील युवा कलाकारांसाठी शिष्यवृत्ती  (एसवायए) :- वय वर्षे 18 ते 25 या गटातील तरुण कलाकार लाभार्थ्यांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी चार समान अर्धवार्षिक हप्त्यांमध्ये दर महिना 5000 रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी उमेदवाराने किमान पाच वर्षे गुरूंच्या अथवा एखाद्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेले असले पाहिजे. मंत्रालयाने सुरु केलेल्या या शिष्यवृत्तीसाठी तज्ञ समितीसमोर केलेले सादरीकरण, व्यक्तिगत मुलाखत आणि चर्चा यांच्या आधारावर गुणवंत उमेदवारांची निवड करण्यात येते.
  2. विविध कला क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ज्येष्ठ/ कनिष्ठ फेलोशिप- कला क्षेत्रातील संशोधनासाठी 40 वर्षे अथवा त्यापेक्षा मोठ्या वयाच्या कलाकारांना चार समान अर्धवार्षिक हप्त्यांमध्ये दर महिना 20,000 रुपये  अशी दोन वर्षांसाठी ज्येष्ठ फेलोशिप देण्यात येते. तर 25 ते 40 वर्षे या वयोगटातील निवडक कलाकारांना चार समान अर्धवार्षिक हप्त्यांमध्ये दोन वर्षांसाठी दर महिना 10,000 रुपयांची कनिष्ठ फेलोशिप देण्यात येते. प्रत्येक वर्षीच्या तुकडीत सुमारे 400 ज्येष्ठ आणि कनिष्ठ फेलोशिप देण्यात येतात.  ज्येष्ठ आणि कनिष्ठ फेलोशिपसाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने नेमलेल्या तज्ञ समितीकडून या फेलोशिप साठी पात्र कलाकारांची निवड करण्यात येते.
  3. कला क्षेत्रातील संशोधनासाठी टागोर राष्ट्रीय फेलोशिप या फेलोशिपसाठी दोन विभागांत कलाकारांची निवड करण्यात येते, टागोर राष्ट्रीय फेलोशिप आणि टागोर संशोधन शिष्यवृत्ती. यासाठी चार विविध गटांतील अनेक सहभागी संस्थांच्या संलग्नतेच्या माध्यमातून कलाविषयक संशोधनाचे कार्य करण्यात येते. मंत्रालयाने या कार्यासाठी विशेषत्वाने निवड केलेल्या राष्ट्रीय निवड समितीकडून या दोन योजनांसाठी कलाकारांची अंतिम निवड करण्यात येते.

वर उल्लेख केलेल्या शिष्यवृत्तींखेरीज रेपर्टरी अनुदान, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निर्मितीसाठीचे अनुदान अशा इतर योजनांच्या माध्यमातून व्यावसयिक आणि हौशी कलाकारांना आर्थिक मदत करण्यात येते.

केंद्रीय संस्कृती, पर्यटन तसेच ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी.किशन रेड्डी यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.

***

N.Chitale/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1795256) Visitor Counter : 390