पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या मुलांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 24 JAN 2022 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जानेवारी 2022

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी स्मृती इराणीजी, डॉक्टर महेंद्रभाई, सर्व अधिकारीवर्ग, सगळे पालक आणि शिक्षकवर्ग आणि भारताचे भविष्य असलेल्या माझ्या सर्व युवा सहकाऱ्यांनो,

तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटले. तुमच्याकडून तुमच्या अनुभवांबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. कला-संस्कृती पासून धैर्य, शिक्षणापासून अभिनव संशोधन, समाजसेवा आणि क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही केलेल्या अद्वितीय कामगिरीबद्दल तुम्हांला पुरस्कार मिळाले आहेत. आणि फार मोठ्या स्पर्धेला सामोरे गेल्यानंतर तुम्हांला हा पुरस्कार मिळाला आहे. या साठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मुले पुढे आली, त्यांच्यामधून तुमची निवड झाली आहे. म्हणजेच हा पुरस्कार मिळालेल्या मुलांची संख्या मर्यादित असली तरीही आपल्या देशात विविध क्षेत्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करून दाखविणाऱ्या होतकरू मुलांची संख्या अमर्यादित आहे. हा पुरस्कार मिळविल्याबद्दल तुम्हां सर्वांचे पुन्हा एकवार खूप खूप अभिनंदन. आज राष्ट्रीय बालिका दिन देखील आहे, त्याबद्दल देशातील सर्व सुकन्यांचे मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

तुम्हा सर्वांसह, मी तुमचे माता-पिता आणि शिक्षकांचे देखील अभिनंदन करू इच्छितो. आज तुम्ही ज्या यशाला गवसणी घातली आहे त्यामागे या सर्वांचे देखील फार मोठे योगदान आहे. म्हणूनच, तुमच्या प्रत्येक यशामध्ये तुमच्या जवळच्यांचे देखील यश आहे. या जवळच्या सर्व व्यक्तींचे प्रयत्न आणि त्यांच्या भावना त्यात गुंतलेल्या आहेत.

माझ्या नवतरुण सहकाऱ्यांनो,

तुम्हांला आज मिळालेला हा पुरस्कार आणखी एका कारणामुळे विशेष महत्त्वाचा पुरस्कार आहे. ते कारण म्हणजे या पुरस्कारांची वेळ. देश यावेळी स्वातंत्र्य प्राप्तीची 75 वर्षे साजरी करत आहे. ह्या अत्यंत महत्वाच्या कालखंडात तुम्हांला हा पुरस्कार मिळाला आहे. तुम्ही आयुष्यभर, अभिमानाने हे सांगू शकाल की माझा देश जेव्हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत होता त्या वेळेस मला हा पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्कारासोबतच तुमच्यावर एक मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. तुमच्या मित्रांना, कुटुंबाला, समाजाला, आणि प्रत्येकालाच तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. तुम्हांला या अपेक्षांचे ओझे घ्यायचे नाही तर त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायची आहे.

युवक मित्रांनो, आपल्या देशातील लहान लहान बालकांनी, मुला-मुलींनी प्रत्येक युगात इतिहास रचला आहे. आपल्या स्वातंत्र्य चळवळीत वीरबाला कनकलता बरुआ, खुदिराम बोस, राणी गाईडीनिल्यू यांच्यासारख्या वीरांचा असा इतिहास आहे जो आपल्याला अभिमानाने भारून टाकतो. या स्वातंत्र्यसैनिकांनी लहान वयातच देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीला स्वतःच्या जीवनाचे उद्दिष्ट मानले होते आणि त्यासाठी जीवाचे बलिदान दिले होते. 

गेल्या वर्षी दिवाळीच्या सणाला मी जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये गेलो होतो हे तुम्ही टीव्हीवर पाहिले असेलच. तिथे बलदेव सिंह आणि वसंत सिंह या वीरांशी माझी भेट झाली. आता तर ते दोघेही बऱ्याच मोठ्या वयाचे आहेत. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच काश्मीरच्या भूमीवर जे युध्द झाले त्या वेळी हे दोघेही खूप लहान होते. त्या युद्धात या दोघांनी बाल सैनिक म्हणून फार मोठी जबाबदारी पेलली होती. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कितीतरी कमी वयातच आपल्या सेनेला मदत केली.

याच प्रकारे, आपल्या भारतातील आणखीन एक उदाहरण आहे ते म्हणजे गुरु गोविंद सिंह जी यांच्या मुलांचे शौर्य आणि बलिदान! या साहिबजाद्यांनी जेव्हा अतुलनीय वीरता, धाडस आणि साहसाने संपूर्ण समर्पण भावनेसह आत्मबलिदान दिले तेव्हा त्यांचे वय खूपच कमी होते. भारतीय सभ्यता, संस्कृती, श्रद्धा आणि धर्म यांसाठी त्यांनी केलेले बलिदान अतुलनीय आहे. साहिबजाद्यांच्या आत्मार्पणाच्या स्मरणार्थ देशाने 26 डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याची सुरुवात केली आहे. तुम्ही सर्वांनी आणि देशातील सर्व मुलांनी वीर साहिबजाद्यांबद्द्ल माहिती मिळवून वाचली पाहिजे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो.

काल दिल्लीमध्ये इंडिया गेट जवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या डिजिटल प्रतिमेची स्थापना करण्यात आली हे देखील तुम्ही पाहिले असेल. नेताजींकडून आपल्याला कर्तव्यपालनाची, देशाला प्राधान्य देण्याची फार मोठी प्रेरणा मिळते. नेताजींकडून स्फूर्ती घेऊन आपणा सर्वांना, खासकरून तरुण पिढीला देशासाठी स्वतःच्या कर्तव्यांच्या मार्गावरून पुढे जायचे आहे.

मित्रांनो,

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची 75 वर्षे आपल्याकरिता यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत कारण आज आपल्यासमोर आपल्या भूतकाळाबद्दल अभिमान बाळगण्यासाठीचात्यापासून प्रेरणा घेण्याचा क्षण आहे. हा काळ वर्तमानातील उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याचा आणि भविष्यासाठी नवी स्वप्ने बघण्याचा काळ आहे, नवनवी लक्ष्ये निश्चित करून त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करण्याचा काळ आहे. ही उद्दिष्ट्ये येत्या 25 वर्षांसाठी आहेत, जेव्हा आपला देश स्वातंत्र्य प्राप्तीची 100 वर्षे पूर्ण करत असेल त्या काळासाठी आहेत.

आता तुम्ही कल्पना करा, तुमच्यापैकी बहुतांश जण 10 ते 20 वर्षे या वयोगटातील आहेत. जेव्हा आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होत असतील तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर असाल जेव्हा आपला हा देश भव्य, दिव्य प्रगतीशील उंचीवर पोहोचलेला असेल. त्या वेळेस तुमचे जीवन अत्यंत सुख, शांतीने परिपूर्ण असेल. म्हणजेच आम्ही निश्चित केलेले हे लक्ष्य आपल्या तरुण वर्गासाठी आहे, आमच्या तरुण पिढीसाठी आहे. येत्या 25 वर्षांत देश ज्या उंचीवर पोहोचलेला असेल, देशाचे सामर्थ्य ज्या प्रमाणात वाढलेले असेल त्यात आपल्या तरुण पिढीची फार महत्त्वाची भूमिका आहे.

मित्रांनो,

आपल्या पूर्वजांनी ज्याची रुजवात केली, जी तपश्चर्या केली, त्याग केला, त्याची फळे आपल्या सगळ्यांना मिळाली आहेत. मात्र तुम्ही सर्वजण आता अशा काळात आहात, जिथे तुम्ही जे पेराल त्याची फळे तुम्हालाच खायला मिळतील, इतक्या वेगाने परिवर्तन होणार आहे. म्हणूनच, तुम्ही बारकाईने पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की आज देशात जी धोरणे आखली जात आहेत, जे प्रयत्न सुरु आहेत, त्या सर्वांच्या केंद्रस्थानी आपली तरुण पिढी आहे, तुम्ही सर्वजण आहात.

तुम्ही यासाठी कोणतेही क्षेत्र डोळ्यासमोर आणा, आज देशासमोर स्टार्ट अप इंडिया सारखी अभियाने आहेत, स्टँड अप इंडिया सारखे कार्यक्रम सुरु आहेत, डिजिटल इंडियाची एवढी मोठी मोहीम आपण हाती घेतली आहे, ‘मेक इन इंडिया’ ला वेगवान करण्यात येत आहे, देशात आत्मनिर्भर भारताची लोकचळवळ सुरु झाली आहे, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आधुनिक सुविधांचा जलदगतीने विस्तार होतो आहे, महामार्ग तसेच द्रुतगती महामार्ग निर्माण होत आहेत. ही प्रगती, हा वेग इतर कुठल्याही देशाच्या प्रगतीशी जुळतो आहे का?

आपण सगळे देखील या सगळ्या परिवर्तनाशी स्वतःला जोडून बघता, सर्व बदलांबाबत इतके उत्सुक असता. आपली ही पिढी भारतच नाही,तर भारताबाहेर देखील या युगातल्या नव्या प्रवाहाचे नेतृत्व करत आहे. आज आपण जेव्हा बघतो, की जगातील सर्वच मोठ्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आपल्या देशाचे सुपुत्र आहेत आणि त्याविषयी सगळे लोक चर्चा करत असतात. देशातली हीच युवा पिढी आज जगभरात आपली कीर्ती निर्माण करते आहे. आपल्या देशातले युवक जेव्हा स्टार्ट अप च्या जगात आपले झेंडे उंच फडकवत असल्याचं आपल्याला दिसतं तेव्हा आपला ऊर अभिमानाने भरुन येतो. भारतातले युवक नवनवे अभिनव प्रयोग करतांना आपण बघतो, तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो. आता काही काळानंतर भारत आपल्या हिमतीवर पाहिल्यांदाच भारतीयांना अंतराळात पाठवणार आहे. या गगनयान अभियानाची संपूर्ण जबाबदारी देखील आपल्या युवकांवरच आहे. ज्या युवकांची या अभियानासाठी निवड झाली आहे, ते आत्ता यासाठी कठोर मेहनत घेत आहेत.

मित्रांनो,

आज आपल्याला मिळालेले हे पुरस्कार देखील, आपल्या युवा पिढीचे साहस आणि शौर्याचा देखील उत्सव साजरा करणारे आहेत. हे धैर्य आणि शौर्य नव्या भारताची ओळख आहे. कोरोनाच्या विरोधातील देशाची लढाई आपण पहिली आहे. आमच्या वैज्ञानिकांनी आपल्या लस निर्मात्यांनी जगभरात आघाडी घेत देशाला लस दिली. आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी अत्यंत कठीण काळात, खडतर परिस्थितीत न थांबता, न घाबरता आपल्या परिचारिका गावागावात, अत्यंत दुर्गम भागात जाऊन लोकांना लस देत आहेत. हे देखील एक देश म्हणून साहस आणि हिमतीचेच एक मोठे उदाहरण आहे.

त्याचप्रमाणे, सीमेवर उभे असलेल्या आपल्या सैनिकांचे शौर्य बघा. देशाच्या रक्षणासाठी त्यांचा पराक्रम आपली ओळख ठरली आहे. आपले खेळाडू आज ज्या उंचीवर पोहोचले आहेत, जे यश ते आज मिळवत आहेत, ते मिळवणं भारताला कधीही शक्य नाही, असं समजलं जातं होतं. त्याचप्रमाणे ज्या क्षेत्रात जाण्याची आपल्या मुलींना आधी परवानगी देखील मिळत नसे, त्या मुली आज या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. हाच तर तो नवा भारत आहे, जो नवं काही करण्यास कचरत नहीं. हिंमत आणि धैर्य ही आज नव्या भारताची ओळख बनली आहे.

मित्रांनो,

आज भारत, आपल्या सध्याच्या आणि येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने पावले उचलत आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषेतील शिक्षणावर भर दिला जात आहे. यामुळे आपल्याला शिक्षण घेणे, विषय समजून घेणे अधिक सोपे जाईल. तुम्हाला तुमच्या आवडीचे विषय शिकता यावेत, यासाठी देखील शिक्षण धोरणात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. देशभरातल्या हजारो शाळांमध्ये तयार होत असलेल्या अटल टिंकरिंग प्रयोगशाळा, शिक्षणाच्या सुरुवातीच्या काळातच, मुलांमध्ये नवोन्मेषी प्रवृत्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. 

मित्रांनो,

भारताच्या मुलांनी, युवा पिढीने कायमच हे सिद्ध केले आहे की एकविसाव्या शतकात भारताला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठीचे किती प्रचंड सामर्थ्य त्यांच्यात आहे. मला आठवतं, चांद्रयानाच्या काळात मी देशभरातील मुलांना बोलावले होते. त्यांचा उत्साह, त्यांची ऊर्जा मी कधीही विसरू शकत नाही. किशोरवयीन मुलांसाठी सुरु झालेल्या लसीकरण अभियानातही, भारतातल्या मुलांनी आपल्या आधुनिक आणि वैज्ञानिक विचारसरणीचा परिचय दिला आहे. तीन जानेवरीनंतर केवळ 20 दिवसातच चार कोटींपेक्षा अधिक मुलांनी कोरोना लस घेतली आहे. आपल्या देशातील मुले किती जागृत आहेत, त्यांना आपल्या जबाबदारीची किती योग्य जाणीव आहे, हेच यावरुन सिद्ध होते.

मित्रांनो,

स्वच्छ भारत अभियानाच्या यशाचे खूप मोठे श्रेय देखील मी भारताच्या मुलांनाच देईन. तुम्ही सगळ्यांनी घरोघरी बाल सैनिक बनून, स्वच्छाग्रही बनून आपल्या कुटुंबाला स्वच्छता अभियानासाठी प्रेरणा दिली आहे. घरातल्या सर्वांनी स्वच्छता राखावी, घराच्या आत आणि बाहेर कचरा होऊ नये याचा विडाच मुलांनी स्वतः उचलला होता.

आज मी देशातल्या मुलांना आणखी एका गोष्टीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करतो आहे. आणि मुलांनी मला साथ दिली, तर प्रत्येक कुटुंबात निश्चित परिवर्तन होऊ शकेल. मला पूर्ण विश्वास आहे, की माझे हे लहानगे मित्र, ही माझी बाल सेना मला या कामात खूप मदत करेल.

ज्याप्रकारे, स्वच्छता अभियान राबवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला, त्याचप्रमाणे, 'व्होकल फॉर लोकल' अभियानासाठी देखील तुम्ही पुढे यावे. आपण घरीच बसून, सगळी भावंडं एकत्र येऊन एक यादी बनवा, त्यांची मोजणी करा, हातात कागद घेऊन करा. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत आपण ज्या गोष्टींचा वापर करतो, घरात जे सामान आहे, त्यात अशी कितीतरी उत्पादने आहेत, जी भारतात तयार झाली नाहीत, विदेशी आहेत. त्यानंतर घरातल्या लोकांना हा आग्रह करा की भविष्यात जेव्हा असे कोणते उत्पादन खरेदी करायचे असेल, तर ते भारतात तयार झालेलं असावं. त्यात भारताच्या मातीचा गंध असेल, ज्यात भारतातील युवकांच्या घामाचा सुगंध असेल. जेव्हा आपण भारतात तयार झालेल्या वस्तू खरेदी कराल, तर काय होत असेल? त्यामुळे आपल्या देशातली उत्पादने वाढत जातील. प्रत्येक गोष्टीत उत्पादने वाढत जातील, तेव्हा रोजगाराच्या संधीही वाढतील, जेव्हा रोजगार वाढतील तेव्हा आपले आयुष्यच आत्मनिर्भर होईल. म्हणूनच, आत्मनिर्भर भारताच्या या अभियानातआपली युवा पिढी, आपल्या सर्वांचा सहभाग आवश्यक आहे.

मित्रांनो,

आजपासून दोन दिवसांनी देश आपला प्रजासत्ताक दिवस देखील साजरा करणार आहे. आपल्याला प्रजासत्ताक दिनी आपल्या देशासाठी काही नवे संकल्प करायचे आहेत. आपले हे संकल्प समाजासाठी, देशासाठी, एवढेच काय, तर संपूर्ण विश्वाच्या भविष्यासाठी असू शकतात. जसे की पर्यावरणाचे उदाहरण आपल्यासमोर आहे. भारत पर्यावरणाच्या दिशेने आज इतके काही करत आहे, आणि त्याचा लाभ संपूर्ण जगाला मिळणार आहे.

माझी अशी इच्छा आहे की आपण अशा संकल्पाचा  विचार करावा जे भारताच्या अस्तित्वाशी जोडलेले आहेत. जे भारताला आधुनिक आणि विकसित बनवण्यात मदत करणारे संकल्प आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की आपली स्वप्ने देशाच्या संकल्पाशी जोडले जातील, आणि आगामी काळात आपण देशासाठी कित्येक विक्रम स्थापन कराल. याच विश्वासासह, आपण सगळयांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन !!

माझ्या सगळ्या बालमित्रांना खूप खूप स्नेह आणि खूप खूप अभिनंदन !!

खूप खूप धन्यवाद !!

 

 

 

 

M.Chopade/S.Chitnis/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1792497) Visitor Counter : 341