महिला आणि बालविकास मंत्रालय

देशभरात आज राष्ट्रीय बालिका दिन साजरा होत आहे


मुलींचे हक्क, त्यांचे शिक्षण, आरोग्य आणि पोषण याविषयी जागरुकता वाढवण्यासाठी देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन

Posted On: 24 JAN 2022 3:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जानेवारी 2022

 

देशातील मुलींना सहाय्य आणि संधी प्रदान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस  राष्ट्रीय बालिका दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.  लिंगभाव विषयक भेदभाव ही एक अशी समस्या आहे, ज्याला मुली किंवा स्त्रिया यांना आयुष्यभर सामोरे जावे लागते.  या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 2008 मध्ये प्रथम राष्ट्रीय बालिका दिनाचा आरंभ  केला.

राष्ट्रीय बालिका दिनाची उद्दिष्टे:

राष्ट्रीय बालिका दिनाचा उद्देश हा मुलींमधे  त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता  निर्माण करणे आणि मुलींना इतर सर्वांप्रमाणे समान संधी मिळवून देणे, तसेच देशातील मुलींना सहाय्य करत , लिंग-आधारित पूर्वग्रह दूर करणे हा आहे.

यासाठी  शासनाने उचललेली पावले:

मुलींची परिस्थिती सुधारण्यासाठी भारत सरकारने गेल्या काही वर्षांत अनेक पावले उचलली आहेत. 

सरकारने अनेक मोहिमा आणि उपक्रम सुरू केले आहेत त्यापैकी काही पुढीलप्रमाणे आहेत.

  1. मुलगी वाचवा,
  2. बेटी बचाओ, बेटी पढाओ,
  3. सुकन्या समृद्धी योजना
  4. सीबीएसई उडान योजना
  5. मुलींसाठी मोफत किंवा अनुदानित शिक्षण,
  6. महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये महिलांसाठी आरक्षण
  7. माध्यमिक शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय योजना

Year

1961

1971

1981

1991

2001

2011

Child Sex Ratio

976

964

962

945

927

918

 

उद्दिष्टे आणि लक्ष्य गट :

ही योजना मुलीचा जन्म  साजरा करत, तिला शिक्षण देऊन  सक्षम करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. या योजनेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.

  1. लिंगभाव आधारीत पक्षपाती लिंग निवड निर्मूलन रोखणे
  2. मुलीचे अस्तित्व आणि तिचे संरक्षण सुनिश्चित करणे
  3. मुलींचे शिक्षण आणि त्यातील सहभाग सुनिश्चित करणे

अंमलबजावणीची स्थिती आणि यश:

या योजनेने मुलींचे हक्क मान्य करण्यासाठी आणि लोकांची मानसिकता बदलण्यासाठी मोठी सामूहिक जागृती निर्माण केली आहे. या योजनेमुळे जनसामान्यांमध्ये जागरूकता आणि संवेदनशीलता वाढली आहे.  भारतातील घटत्या  लिंग गुणोत्तराच्या (CSR) मुद्द्यावर यामुळे चिंता निर्माण झाली आहे. यामुळे बेटी बचाव, बेटी पढाओ, (BBBP) या मोहिमेला पाठिंबा देणाऱ्या लोकांच्या सामूहिक जाणीवेमुळे या मोहिमेचा  सार्वजनिक प्रसार उत्तमप्रकारे होण्यास  मदत झाली आहे.

  • राष्ट्रीय स्तरावर जन्माच्या वेळच्या  लिंग गुणोत्तरामध्ये 918 (वर्ष 2014-15 ) वरून 937 (2020-21) पर्यंत 19 ची  वाढ.  (स्रोत: HMIS डेटा,महिला आणि बाल विकास मंत्रालय ,एप्रिल-मार्च, 2014-15 आणि 2020-21)
  • सकल नोंदणी प्रमाण (GER): माध्यमिक शिक्षणात मुलींची नोंदणी 2014-15 मधील 77.45% वरून 2018-19 मध्ये 81.32%इतकी झाली.  (स्रोत: U-DISE, शिक्षण मंत्रालय (2018-19 ,हा डेटा तात्पुरता आहे)
  • पाच वर्षांखालील बालमृत्यूंचे प्रमाण (मुलगी) 2014 मध्ये 45 होते त्यावरून 2018 मध्ये 36 पर्यंत इतके खाली आले आहे. (स्रोत: SRS census india.gov.in)
  • गरोदरपणातील पहिल्या तिमाहीतील अर्भकांच्या  काळजी घेण्याच्या नोंदणीच्या टक्केवारीत 2014-15 मधील 61% वरून 2020-21 मध्ये 73.9% पर्यंत सुधारणा झाली आहे. (स्रोत: HMIS डेटा, MoHFW (एप्रिल-मार्च, 2014-15 आणि 2020-21)
  • संस्थात्मक (रुग्णालयातील )प्रसूतीच्या टक्केवारीत देखील 2014-15 मधील 87% वरून 2020-21 मध्ये 94.8% पर्यंत इतकी सुधारणा दिसून आली आहे.  (स्रोत: HMIS डेटा, MoHFW (एप्रिल-मार्च, 2014-15 आणि 2020-21)

 

राष्ट्रीय बालिका दिन-2022

देशातील कोविड 19 ची परिस्थिती पाहता, सर्व कार्यक्रम दृकश्राव्य/ऑनलाइन पद्धतीने आयोजित केले जावेत आणि कोणत्याही प्रकाराचा  प्रत्यक्ष सहभाग टाळावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2022

24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तसेच आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, 2022 वर्षीच्या  प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार (PMRBP) योजनेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन मुलांच्या अनुकरणीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी एक दृकश्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

बेटी बचाव, बेटी पढाओ (BBBP) अंतर्गत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि 405 विविध -विभागातील  जिल्ह्यांतून कॉर्पोरेट सामाजिक दायित्व यांच्या सहाय्याने  ग्रामसभा/महिला मंडळे, शाळांमध्ये मुलींच्या जन्माच्या महत्वावर कार्यक्रम, पोस्टर्स/स्लोगन-लेखन/चित्र/चित्रकला स्पर्धा यासारखे ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करावेत, संबंधित विषय, आणि स्थानिक स्तरावर  उत्तम कामगिरी केलेल्या  बेटी पढाओ बेटी बचाओ, (BBBP) बद्दल स्थानिक माध्यमांतून माहिती देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 

* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1792151) Visitor Counter : 394