सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

एमएसएमई उद्योग एकत्रितपणे संपूर्ण पुरवठा साखळी उभारण्यास समर्थ आहेत: एमएसएमई सचिव

Posted On: 20 JAN 2022 10:31AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 20 जानेवारी 2022

भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रातील एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कमी उत्पादन खर्चाचा लाभ मिळत असल्यामुळे या उद्योगांकडे जागतिक मूल्य साखळीच्या रुपात एकत्रित होण्याची अमर्याद क्षमता आहे आहे असे केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाचे सचिव बी.बी.स्वेन यांनी म्हटले आहे. ईईपीसी इंडिया अर्थात भारतीय  अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन मंडळाने आयोजित केलेल्या एमएसएमई बैठकीच्या उद्घाटनपर सत्रात ते काल बोलत होते. स्वेन म्हणाले की एमएसएमईना मोठ्या प्रमाणात विकास साधायचा असेल तर ज्या दोन सर्वात महत्त्वाच्या हस्तक्षेपांची गरज आहे ते कर्जविषयक पाठबळ आणि तंत्रज्ञानाचे अद्ययावतीकरण यांच्याशी संबंधित आहेत. केंद्रीय एमएसएमई मंत्रालय इतर संबंधित मंत्रालये तसेच विभागांशी समन्वय साधून एमएसएमईंना व्यापार करण्यातील सुलभता प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

एमएसएमइचे नोंदणीकरण सुलभतेने होण्यावर, त्यांना सहजपणे कर्ज पुरवठा उपलब्ध होण्यावर तसेच जागतिक पातळीवरील व्यवसायाचा विचार करून त्यांना आवश्यक असलेले संरक्षण पुरविणे यावर आत्मनिर्भर भारत विषयक घोषणांमध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते असे स्वेन यांनी सांगितले. अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्मितीमध्ये  सहभागी होणाऱ्या एमएसएमई, 1 जुलै 2020 पासून उद्यम नोंदणीकरण पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेल्या 67 लाख एमएसएमईच्या 29 % आहेत अशी माहिती त्यांनी दिली. “एमएसएमई उद्योग एकत्रितपणे संपूर्ण पुरवठा साखळी उभारण्यास सक्षम आहेत आणि पुरवठा साखळीतील मधल्या टप्प्याची उत्पादने ते अंतिम उत्पादन या श्रेणीतील वैविध्यपूर्ण उत्पादनांमुळे जागतिक पातळीवरील स्पर्धेत टिकून राहतील असे आहेत असे स्वेन यांनी सांगितले.   

 

स्वागतपर भाषणात ईईपीसी इंडिया चे अध्यक्ष महेश देसाई म्हणाले की एमएसएमई उद्योगांना तंत्रज्ञानविषयक आघाडीवर बऱ्याच गोष्टी आत्मसात करण्याची गरज आहे कारण जागतिक मूल्य साखळीमधील भारताचा वाटा वाढविण्यासाठी हे आवश्यक आहे. “मेक इन इंडिया” उपक्रमाने भारतीय एमएसएमइजना मोठ्या प्रमाणात जागतिक उत्पादन कंपन्यांसोबत काम करण्याचा तसेच या कंपन्यांच्या अद्ययावत तंत्रज्ञानाची तसेच परिणामकारक विपणन तंत्रांची माहिती करून घेण्यास भरपूर वाव उपलब्ध करून दिला आहे. महामारीची सुरुवात झाल्यापासून विकसित जगातील मोठे उद्योग भारताकडे उत्पादनाचे पर्यायी ठिकाण म्हणून आशेने पाहू लागले आहेत,” देसाई म्हणाले. एमएसएमई क्षेत्राचा  भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 30% वाटा असून देशाच्या निर्यातीत या क्षेत्राचा 50% वाटा आहे असे सांगत त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत एमएसएमई उद्योगांच्या महत्त्वाच्या भूमिकेकडे निर्देश केला. “बऱ्याच काळापासून भारतातील एमएसएमई क्षेत्राचे महत्त्व ठळकपणे लक्षात आले असून त्याची क्षमता देखील समजली आहे. राष्ट्रीय उत्पादन धोरणामध्ये, कारखानदारीचे प्रमाण  स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या 25% पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,” ते म्हणाले.

 

ईईपीसी इंडियाचे सुमारे 60% सदस्य एमएसएमई क्षेत्राशी संबंधित आहेत आणि ईईपीसी देशाच्या अभियांत्रिकी क्षेत्राचा विकास करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित उत्पादने तयार करणाऱ्या एमएसएमईना प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था  सरकारसोबत सतत संपर्कात आहे. या संस्थेने वाणिज्य तसेच तंत्रज्ञानविषयक अद्ययावतीकरण विभागाच्या उपक्रमांना अनुसरून, अभियांत्रिकी क्षेत्रातील एमएसएमइंच्या तंत्रज्ञानविषयक मागासलेपणाची समस्या सोडविण्यासाठी ईईपीसी ने बेंगलुरू आणि कोलकाता येथे दोन तंत्रज्ञान केंद्रे स्थापन केली आहेत.

***

MC/Sanjana/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1791165) Visitor Counter : 207