पंतप्रधान कार्यालय
दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘जागतिक परिस्थिती’ या विषयावरील भाषण
Posted On:
17 JAN 2022 10:12PM by PIB Mumbai
नमस्कार!
जागतिक आर्थिक मंचाच्या शिखर परिषदेनिमित्त एकत्र आलेल्या जगभरातील मान्यवरांचे 130 कोटी भारतीयांच्या वतीनं मी स्वागत करतो. आज मी आपल्याशी बोलत आहे, तेव्हा भारत कोरोनाच्या आणखी एका लाटेचा जागरूकतेने आणि सावधपणे सामना करत आहे. त्यासोबतच आर्थिक क्षेत्रातील अनेक आशादायी परिणाम मिळवत पुढे वाटचाल करत आहे. भारतात स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत असल्याचा उत्साह देखील आहे आणि भारताला आज केवळ एका वर्षात 160 कोटी कोरोना लसी देण्याचा आत्मविश्वास देखील मिळाला आहे.
मित्रांनो,
भारतासारख्या सशक्त लोकशाहीने जगाला एक सुंदर भेट दिली आहे, एक आशेचा पुष्पगुच्छ दिला आहे. या पुष्पगुच्छात आहे, आम्हा भारतीयांचा लोकशाहीवरचा अतूट विश्वास, या पुष्पगुच्छात आहे, 21 व्या शतकाला सक्षम करणारे तंत्रज्ञान, या पुष्पगुच्छात आहे, आम्हा भारतीयांची मानसिकता, आम्हा भारतीयांची प्रतिभा. ज्या बहु-भाषक, बहु-सांस्कृतिक वातावरणात आम्ही भारतीय राहतो, ती केवळ भारताचीच नाही तर संपूर्ण जगाची खूप मोठी शक्ती आहे. ही शक्ती संकटकाळी फक्त स्वतःचाच नाही तर संपूर्ण मानवजातीच्या हिताचा विचार करायला शिकवते. कोरोनाच्या या काळात आपण बघितलं आहे की भारत ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ हा दृष्टीकोन ठेवत अनेक देशांना आवश्यक औषधे देऊन, लसी देऊन, कोट्यवधी लोकांचे जीव वाचवतो आहे. आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा औषध निर्माता देश आहे, जगाच्या औषध निर्मितीचे केंद्र आहे. आज भारत त्या देशांपैकी एक आहे, जिथले आरोग्य कर्मचारी, जिथले डॉक्टर्स आपली संवेदनशीलता, अनुभव आणि ज्ञानाच्या बळावर सर्वांचा विश्वास जिंकत आहेत.
मित्रांनो,
संकटाच्या काळातच संवेदनशीलतेची खरी पारख होते, मात्र, भारताचे सामर्थ्य या वेळी संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. याच संकटकाळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने 24 तास काम करून जगाच्या सर्व देशांना एका खूप मोठ्या संकटातून वाचवलं आहे. आज भारत, जगभरात विक्रमी संख्येत सॉफ्टवेअर अभियंते पाठवत आहे. भारतात 50 लाखांहून जास्त सॉफ्टवेअर डेव्हलपर्स भारतात काम करत आहेत. आज भारतात जगात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त युनिकॉर्न आहेत. गेल्या सहा महिन्यात 10 हजार पेक्षा जास्त स्टार्ट अप्सची नोंदणी झाली आहे. आज भारताकडे जगातली सर्वात मोठी, सुरक्षित आणि यशस्वी डिजिटल पेमेंट व्यवस्था आहे. जर केवळ मागच्या महिन्याबद्दल बोलायचं झालं तर, युनिफाईड पेमेंट इंटरफेसच्या माध्यमातून, भारतात 4.4 अब्ज व्यवहार झाले आहेत.
मित्रांनो,
गेल्या काही वर्षांमध्ये भारताने ज्या डिजिटल पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत, त्या आज भारताची खूप मोठी शक्ती बनल्या आहेत. कोरोना संक्रमणाचा माग काढण्यासाठी आरोग्य सेतू अॅप आणि लसीकरणासाठी कोविन पोर्टल या सारखे तंत्रज्ञान, भारतासाठी अभिमानाचा विषय आहे. भारताच्या कोविन पोर्टलवर पूर्वनोंदणी पासून प्रमाणपत्र मिळविण्याची जी ऑनलाईन व्यवस्था आहे, त्याकडे मोठमोठे देश आकर्षित झाले आहेत.
मित्रांनो,
एक काळ असा होता, जेव्हा भारताची ओळख लायसन्स राज मुळे होती, बहुतांश क्षेत्रांवर सरकारी नियंत्रण होतं. भारतात व्यवसाय करण्यासाठी जी आव्हानं होती, ती मला माहित आहेत. ती आव्हाने दूर करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. आज भारतात व्यवसाय सुलभतेवर भर दिला जात आहे. भारताने आपले कॉर्पोरेट कर सुलभ करून, कमी करून, ते जगात सर्वात स्पर्धात्मक केले आहेत. गेल्या वर्षी आम्ही 25 हजारापेक्षा जास्त अनुपालन रद्द केले आहेत. भारताने पूर्वलक्षी कर या सारख्या सुधारणा करून, व्यावसायिकांमध्ये पुन्हा विश्वास जागृत केला आहे. भारताने, ड्रोन, अवकाश, भू-अवकाशीय नकाशे यांसारखी क्षेत्रे देखील नियंत्रणमुक्त केले आहेत. भारताने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र आणि बीपीओशी संबंधित दूरसंचार क्षेत्रातील कालबाह्य नियमनात मोठ्या सुधारणा केल्या आहेत.
मित्रांनो,
जागतिक पुरवठा साखळीत भारत जगाचा विश्वसनीय भागीदार बनण्यास कटिबद्ध आहे. आम्ही अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार करण्याचे मार्ग तयार करत आहोत. भारतीयांमध्ये नवोन्मेषाची, नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची जी क्षमता आहे, उद्योजकतेची जी भावना आहे, ती आमच्या जागतिक भागीदारीला नवी उर्जा देऊ शकते. म्हणूनच भारतात गुंतवणुकीसाठी हा सर्वात उत्तम काळ आहे. भारतीय युवकांची उद्योजकता एका नव्या उंचीवर आहे. 2014 मध्ये, जिथे भारतात काही शे नोंदणीकृत स्टार्टअप्स होते, तिथे आज ही संख्या 60 हजारांच्या पुढे गेली आहे. यापैकी 80 पेक्षा जास्त युनिकॉर्न्स आहेत, ज्यात 40 पेक्षा जास्त तर 2021 मध्येच सुरु झाले आहेत. ज्याप्रकारे परदेशी भारतीयांनी जागतिक मंचावर आपले कौशल्य दाखवले आहे, त्याच प्रमाणे भारतीय युवक देखील आपले व्यवसाय भारतात नव्या उंचीवर नेण्यास पूर्णपणे तयार आहेत, तत्पर आहेत.
मित्रांनो,
आमूलाग्र आर्थिक सुधारणांसाठी भारताची कटिबद्धता हे भारताला गुंतवणुकीसाठीचे सर्वात आकर्षक केंद्र बनविण्यामागचे मुख्य कारण आहे. कोरोना काळात जेव्हा जग महामारीमुळे आलेल्या आर्थिक मंदीचे परिणाम कमी करण्यासाठी हस्तक्षेप करत होते, तेव्हा भारताने सुधारणांचा मार्ग प्रशस्त केला. डिजिटल आणि प्रत्यक्ष पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाच्या सर्वात मोठ्या प्रकल्पांना कोरोना काळातच गती देण्यात आली. देशातल्या 6 लाखांपेक्षा जास्त गावांना ऑप्टिकल फायबरने जोडले जात आहे. खासकरून जोडणीशी संबंधित पायाभूत सुविधांवर 1.3 ट्रीलीयन डॉलरची गुंतवणूक केली जात आहे. संपत्तीच्या चलनीकरणासारख्या नाविन्यपूर्ण वित्तीय साधनांमुळे 80 अब्ज डॉलर उभारण्याचे ध्येय ठरवण्यात आले आहे. विकासासाठी प्रत्येक हितसंबंधियांना एकाच मंचावर आणण्यासाठी भारताने गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा देखील तयार केला आहे. या राष्ट्रीय बृहद आराखड्याअंतर्गत एकात्मिक पद्धतीने पायाभूत सुविधांचे नियोजन, विकास आणि अंमलबजावणीवर काम होणार आहे. यात वस्तू, लोक आणि सेवा यांची सुलभ जोडणी आणि चलनवलनाला एक वेग मिळेल.
मित्रांनो,
आत्मनिर्भरतेच्या मार्गावर चालत असताना, केवळ प्रक्रिया सोप्या करण्यावरच भारताचा भर नाही, तर गुंतवणूक आणि उत्पादनाला प्रोत्साहन देण्यावर देखील आहे. हाच दृष्टीकोन ठेवून आज 14 क्षेत्रात 26 अब्ज डॉलरची उत्पादन-संलग्न-प्रोत्साहन योजना लागू करण्यात आली आहे. फॅब, चिप आणि डिस्प्ले उद्योगासाठी 10 अब्ज डॉलरची प्रोत्साहन योजना, जागतिक पुरवठा साखळी सुरळीत करण्यासाठी भारताच्या कटिबद्धतेचे उदाहरण आहे. आम्ही मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड या विचाराने मार्गक्रमण करत आहोत. दूरसंचार, विमा, संरक्षण, हवाई क्षेत्र या सोबतच आता सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रात देखील भारतात विपुल संधी उपलब्ध आहेत.
मित्रांनो,
आज भारत वर्तमानासोबतच, पुढच्या 25 वर्षांची उद्दिष्टे निश्चित करुन, त्यासाठी धोरणे तयार करत आहे, निर्णय घेत आहे. या कालखंडात, भारताने, उच्च वृद्धीदारांचे, लोककल्याणाचे आणि निरामयता संपूर्णत: साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विकासाचा हा कालखंड, हरित असेल, स्वच्छही असेल, शाश्वत असेल आणि विश्वासार्हही असेल. जागतिक कल्याणासाठी मोठमोठी वचने देऊन ती खरी करुन दाखवण्याची परंपरा कायम ठेवत, आम्ही 2070 पर्यंत, शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्यही ठेवले आहे. जगातील एकूण लोकसंख्येपैकी 17 टक्के लोकसंख्या असलेल्या भारताचा जरी जागतिक कार्बन उत्सर्जनात केवळ पाच टक्के वाटा असला, तरीही, हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्याची आमची कटीबद्धता 100 टक्के आहे. आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य आणि हवामानाच्या बदलत्या स्थितीत, आपत्ती-प्रतिरोधक पायाभूत सुविधा सहकार्य, असे आमचे उपक्रम, आमच्या याच कटिबद्धतेचा दाखला देणारे आहेत. गेल्या काही वर्षात केलेल्या प्रयोगांमुळेच, आमच्या एकूण ऊर्जेपैकी 40 टक्के वाटा बिगर-जीवाश्म इंधन स्त्रोतातून येत आहे. भारताने पॅरिसमध्ये जी घोषणा केली होती, ते उद्दिष्ट आम्ही नऊ वर्षे आधीच पूर्ण केले आहे.
मित्रांनो,
याच प्रयत्नांदरम्यान, आपल्याला हे ही मान्य करावे लागेल, की आपली जीवनशैली देखील हवामानासाठी एक मोठे आव्हान ठरली आहे. ‘वस्तू एकदाच वापरुन फेकून देण्याची’ निष्काळजी संस्कृती आणि चंगळवादी वृत्तीमुळे हवामान बदलाचे संकट अधिकच गंभीर झाले आहे. आजची जी, वस्तू घ्या-वापरा-विल्हेवाट लावा- अशी अर्थसंस्कृती रुजायला लागली आहे, तिला ताबडतोब, चक्राकार अर्थव्यवस्थेकडे वळवणे अतिशय आवश्यक ठरले आहे. कॉप-26 मध्ये मिशन लाईफ यासारख्या ज्या संकल्पनांची चर्चा मी केली होती, त्याच्या मूळाशी देखील हीच भावना होती. जीवन म्हणजे पर्यावरणासाठीची जीवनशैली- म्हणजेच, चिवट आणि शाश्वत जीवनशैलीविषयीची दूरदृष्टी, जी हवमान बदलाच्या संकटासोबतच, भविष्यातील अनिश्चित अशा आव्हानांचा सामना करण्यासही उपयुक्त ठरणार आहे. म्हणूनच, मिशन लाईफ- म्हणजेच जीवनशैली बदलण्याचे हे अभियान जागतिक स्तरावर, एक व्यापक लोकचळवळ बनणे अतिशय आवश्यक आहे. लाईफ सारख्या लोकसहभागांच्या अभियानाची अंमलबजावणी, आपण पी-थ्री- जेव्हा मी पी-थ्री म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ, ‘प्रो प्लॅनेट पीपल’ असा आहे- चा आधार म्हणूनही ही अंमलबजावणी व्हायला हवी.
मित्रांनो,
आज 2022 चा प्रारंभ, जेव्हा आपण दावोस मध्ये या विचारमंथनातून करतो आहोत, त्यावेळी जगाला आणखी काही आव्हांनाप्रती जागृत करणे, ही भारताची जबाबदारी आहे, असे आम्ही समजतो. आज जागतिक साखळीत बदल झाल्यामुळे, एक जागतिक कुटुंब म्हणून, ज्या समस्यांचा आपण सामना करत आहोत, त्या समस्या देखील वाढल्या आहेत. या समस्यांचा सामना करण्यासाठी प्रत्येक जागतिक यंत्रणेने सामूहिक आणि एकाच गतीने कार्य करणे आवश्यक आहे. पुरवठा साखळीत येणारी बाधा, महागाईवाढ आणि हवामान बदल ही अशाच समस्यांची उदाहरणे म्हणता येतील. आणखी एक उदाहरण म्हणजे- क्रिप्टोकरन्सी म्हणजेच, आभासी चलनाचे ! ज्या प्रकारचे तंत्रज्ञान त्यासाठी वापरले जाते, त्यात कोणत्याही एका देशाने घेतलेले निर्णय, या आव्हानावर मात करण्यासाठी पुरेसे ठरणार नाहीत. त्यासाठी आपल्या सर्वांना एकसमान विचार करणे आवश्यक आहे. मात्र आज जागतिक परिस्थिती बघता, असाही प्रश्न निर्माण होतो की या बहुराष्ट्रीय संस्था-संघटना, बदललेली जागतिक परिस्थिती आणि इतर अनेक आव्हानांचा सामना करण्यास तयार आहे का? तेवढे सामर्थ्य त्यांच्यात आहे का? ज्यावेळी या संस्था स्थापन झाल्या होत्या, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आज परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळेच प्रत्येक लोकशाही देशाची ही जबाबदारी आहे की या संस्थांमधील सुधारणांवर भर द्यावा. जेणेकरून, या संस्था, वर्तमान आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम होऊ शकतील. दावोस इथे सुरु असलेल्या चर्चासत्रात या दिशेनेही सकारात्मक संवाद होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
मित्रांनो,
नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आज जगाला नवे मार्ग शोधण्याची गरज आहे, नवे संकल्प करण्याची गरज आहे. आज जगातील प्रत्येक देशांमध्ये सहकार्य वाढण्याची पूर्वीपेक्षा अधिक गरज निर्माण झाली आहे.
आणि हाच जगाच्या कल्याणाचा मार्ग आहे. मला विश्वास आहे, की दावोसमध्ये सुरु असलेली ही चर्चा या भावनेची व्याप्ती अधिक वाढवेल. पुन्हा एकदा, आपल्या सर्वांना आभासी पद्धतीने भेटण्याची, संवाद साधण्याची संधी मला मिळाली, यासाठी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद !!
***
ST/RA/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1790675)
Visitor Counter : 541
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam