युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
मीराबाई यांनी दिली राष्ट्रीय युद्धस्मारकाला भेट, समर्पण आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या या स्थानाला आवर्जून भेट देण्याचे प्रत्येक भारतीयाला केले आवाहन
Posted On:
17 JAN 2022 3:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जानेवारी 2022
भारताची 'रजतकन्या' साईखोम मीराबाई चानू यांनी आज, नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्धस्मारकाला भेट दिली. भारतीय सैन्यदलांच्या धैर्य, शौर्य आणि समर्पणाच्या सन्मानार्थ हे राष्ट्रीय युद्धस्मारक उभारण्यात आले आहे.

40 एकर क्षेत्रावरील या खुल्या आणि विस्तीर्ण स्मारकाला दिलेल्या भेटीबद्दल मीराबाईने आपल्या भावना व्यक्त केल्या. "मी आजवर सामने आणि स्पर्धांसाठीच दिल्लीत मुक्काम करत आले. परंतु यावेळी माझ्या दौऱ्यात मी या स्मारकासाठी वेळ राखून ठेवला होता. केवळ सैन्यदलांनाच नव्हे तर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असेच हे स्मारक आहे." असे उदगार ऑलिंपिक पदकविजेत्या भारोत्तोलक मीराबाईने काढले.
भारताच्या 1947 पासूनच्या युद्धविषयक इतिहासाची तपशीलवार मांडणी या स्मारकात केलेली आहे. स्मारकातील विस्तीर्ण अवकाशात शौर्यकथा, जीवनकथा आणि संघर्षाच्या कहाण्यांमधून त्या अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध शूरवीरांच्या गाथा सादर केलेल्या आहेत. जणू काही या साऱ्या मांडणीच्या माध्यमातून ते वीर पुनर्जन्म घेऊन आले आहेत- अशा संकल्पनेवर हे युद्धस्मारक निर्माण करण्यात आले आहे.

भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाने लढलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक युद्धांतील पराक्रमाच्या प्रेरक कथांचे दर्शन घडवणाऱ्या दीर्घिकेचे निरीक्षण करून मीराबाई म्हणाली, "चक्रव्यूहाच्या पद्धतीने या वास्तूची रचना केली आहे. आपल्या भारतमातेच्या सुपुत्रांनी प्राणांची बाजी लावून लढलेल्या लढायांमधील प्रसंग दाखवणारे कांस्य भित्तीपट लावलेले आहेत. हे सारे पाहून मी मंत्रमुग्ध झाले."
"येथे आल्यावर मला असे मनापासून वाटले की, प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा तरी या स्मृतिस्थळाला भेट दिली पाहिजे."

भारोत्तोलक मीराबाईने आपल्या राज्यातले हुतात्मा मेजर लैश्राम ज्योतीन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पुरस्काराने म्हणजेच अशोकचक्राने सन्मानित हुतात्मा मेजर लैश्राम ज्योतीन सिंग हे मूळचे मणिपूरचे आहेत.
* * *
N.Chitale/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1790501)