आयुष मंत्रालय

विश्वभरात एक कोटीहून अधिक लोकांनी घातले सूर्यनमस्कार


भारताकडून संपूर्ण जगाला निरोगी राहण्यासाठी मिळाला संदेश

Posted On: 14 JAN 2022 5:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2022

आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयुष मंत्रालयाने आज जीवनशक्तीसाठी सूर्यनमस्कार हा उपक्रम साजरा केला. कोविड महामारीच्या काळात शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी भारतासह जगभरातील 75 लाखांहून अधिक लोकांनी एकत्रितपणे आज सूर्यनमस्कार घातले. केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि आयुषचे राज्यमंत्री डॉ मुंजापारा महेंद्रभाई यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे  या उपक्रमाचा आरंभ केला.  बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण, श्री श्री रविशंकर, सद्गुरू जग्गी वासुदेव आणि जगातील विविध भागांतील अनेक नामवंत व्यक्ती या उपक्रमाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात सामील झाल्या होत्या.

आपल्या उद्‌घाटन भाषणात केंद्रीय मंत्री म्हणाले की, लोकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सूर्यनमस्काराच्या माध्यमातून सूर्याची उपासना केली जाते. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाअंतर्गत आणि मार्गदर्शनाखाली मानवजातीच्या कल्याण आणि आरोग्यासाठी योग आणि सूर्यनमस्काराचा प्रचार केला जात आहे.

या दृकश्राव्य उपक्रमामध्ये, जगभरातील अनेक आघाडीचे योग तज्ञ आणि योगप्रेमी सहभागी झाले होते, त्यांनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक दाखवले आणि सूर्यनमस्काराबद्दल त्यांचे मत मांडले.

2021 विश्वसुंदरी जपानची तामाकी होशी  ही देखील यात दृकश्राव्य माध्यमातून सामील झाली होती. ती म्हणाली की, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने घेतलेला हा उपक्रम या महामारीच्या काळात प्रत्येक माणसासाठी अतिशय लाभदायक ठरत आहे. जपानमध्येही मोठ्या संख्येने लोक सूर्यनमस्कार घालत आहेत आणि अनेकांनी त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत योगाचा समावेश केला आहे.

इटली योग संस्थेचे अध्यक्ष डॉ. अँटोनिएट रॉसी यांनी लोकांना सूर्यनमस्कार करून निरोगी राहण्याचे आवाहन केले. अमेरिकन योग अकादमीचे अध्यक्ष डॉ. इंद्रनील बसू रॉय, सिंगापूर योग संस्थेचे सदस्य आणि इतर अनेकांनी देखील या कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमातून सामील होऊन कोविड नियमांचे पालन करत सूर्यनमस्कार घातले.

मोरारजी देसाई राष्ट्रीय योगसंस्थेचे (MDNIY) संचालक ईश्वर बसवरेड्डी म्हणाले की, सूर्यनमस्कार आपली श्वसन प्रणाली मजबूत करण्यात मोठी भूमिका बजावते, योग प्रक्रियेद्वारे आपण अनेक रोगांपासून मुक्त राहू शकतो. हा कार्यक्रम डीडी नॅशनलवरून प्रसारीत करण्यात आला आणि जगभरातील सहभागींनी आभासी सहभागाने त्यात  उत्साह दाखवला.

 

  

 

 

 

 

M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1789949) Visitor Counter : 196