वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यादरम्यान मुक्त व्यापार करारासंबंधी वाटाघाटी सुरु


वर्ष 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्यासाठी प्रस्तावित मुक्त व्यापार करार उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा

Posted On: 13 JAN 2022 5:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2022

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे युनायटेड किंगडमचे आंतरराष्ट्रीय व्यापारसंबंधी सचिव माननीय अॅन-मेरी ट्रेव्हलियन यांच्यासह भारत-युनायटेड किंगडम यांच्या दरम्यानच्या मुक्त व्यापार करारासंबंधीच्या वाटाघाटींना सुरुवात केली.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मे 2021 मध्ये निश्चित केलेले दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार वर्ष 2030 पर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी हा मुक्त व्यापार करार उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.

या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारत आणि युनायटेड किंगडम या दोन्ही देशांतील  लोकशाही अत्यंत चैतन्यमय आहेत आणि त्यांना या दोन्ही देशांतील सामायिक इतिहास आणि समृध्द संस्कृतीवर उभारण्यात आलेल्या भागीदारी नातेसंबंधांची पार्श्वभूमी आहे. युनायटेड किंगडम मधील वैविध्यपूर्ण भारतीय समुदाय या दोन्ही देशांदरम्यान जिवंत पुलाचे कार्य करत असून त्यामुळे दोन्ही देशांमधील नातेसंबंधांना गती मिळाली आहे असे ते पुढे म्हणाले.

युनायटेड किंगडम सोबतच्या मुक्त व्यापार करारामुळे या व्यवहारांना एक प्रकारची निश्चितता, सूचकता आणि पारदर्शकता मिळेल अशी आशा आहे आणि त्यातून अधिक खुल्या, सुविधायुक्त तसेच स्पर्धात्मक सेवा प्रणालीची निर्मिती होईल असे गोयल यांनी सांगितले.

ते म्हणाले की, भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील मुक्त व्यापार करार दोन्ही देशांतील मूल्य साखळ्यांचे एकात्मीकरण करण्यात देखील योगदान देईल आणि या मूल्य साखळ्यांची लवचिकता अधिक बळकट करण्याच्या दोन्ही देशांच्या प्रयत्नांना पाठबळ पुरविण्यासाठी मदत करेल. या दोन्ही देशांच्या प्रमुखांनी 2022 सालच्या सुरुवातीला मुक्त व्यापार करारासंबंधीच्या वाटाघाटींना सुरुवात होईल अशी संकल्पना मांडली होती याची आठवण उपस्थितांना करून देत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी या बाबतच्या चर्चा कालबद्ध पद्धतीने संपविण्यात आल्याची आणि आज मुक्त व्यापार करारासंबंधीच्या वाटाघाटींना सुरुवात झाल्याची घोषणा करण्यात आली याबद्दल आनंद व्यक्त केला.

 

 

 

M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1789692) Visitor Counter : 285