संरक्षण मंत्रालय

आधुनिक सर्वेक्षण तंत्रज्ञानाचा वापर करून तीन वर्षांत संरक्षण मंत्रालयाच्या 17.78 लाख एकर भूभागाचे सर्वेक्षण

Posted On: 09 JAN 2022 5:36PM by PIB Mumbai

 

संरक्षण संपदा कार्यालयांच्या नोंदीनुसार, संरक्षण मंत्रालयाकडे सुमारे 17.99 लाख एकर एवढ्या जमिनीचे क्षेत्र आहे. ज्यापैकी अंदाजे 1.61 लाख एकर जमीन 62 अधिसूचित छावणी क्षेत्रांमध्ये आहे. छावणी क्षेत्रांच्या बाहेर सुमारे 16.38 लाख एकर क्षेत्र विविध भागात विखुरलेले आहे. 16.38 लाख एकर जमिनीपैकी, सुमारे 18,000 एकर जमीन एकतर शासनाने भाड्याने घेतलेली आहे किंवा इतर सरकारी विभागांकडे हस्तांतरित केल्यामुळे नोंदीमधून वगळण्याचे प्रस्तावित आहे.

संरक्षण जमिनीचे स्पष्ट सीमांकन आणि सीमा सर्वेक्षण आणि संरक्षण, याची आवश्यकता लक्षात घेऊन संरक्षण मंत्रालयाच्या संपदा महासंचालनालयाने संरक्षण भूमीचे सर्वेक्षण ऑक्टोबर 2018 पासून सुरू केले.

सर्वेक्षणात इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन (ETS) आणि डिफरेंशियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (DGPS) सारख्या आधुनिक सर्वेक्षण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. प्रक्रियेला आणखी गती देण्यासाठी, विश्वासार्ह, मजबूत आणि कालबद्ध परिणामांसाठी ड्रोन प्रतिमा आणि उपग्रह प्रतिमा आधारित सर्वेक्षणाचा लाभ घेण्यात आला.

प्रथमच ड्रोन प्रतिमा आधारित सर्वेक्षण तंत्रज्ञानाचा वापर राजस्थानमधील लाखो एकर संरक्षण भूमीच्या सर्वेक्षणासाठी करण्यात आला. भारतीय महासर्वेक्षकांच्या साहाय्याने काही आठवड्यातच संपूर्ण क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले, ज्यासाठी पूर्वी अनेक वर्ष लागायची.

भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (BARC) सहकार्याने डिजीटल एलिव्हेशन मॉडेल (DEM) चा वापर करून डोंगराळ भागातील संरक्षण भूभागाच्या अधिक चांगल्या चित्रणासाठी 3D मॉडेलिंग तंत्र देखील वापरण्यात आले.

गेल्या 6 महिन्यांत, संरक्षण सचिवांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे आणि नवीनतम सर्वेक्षण तंत्रज्ञानाच्या वापरामुळे, सर्वेक्षणात वेगाने प्रगती झाली.  गेल्या तीन महिन्यात 17.78 लाख एकरांपैकी 8.90 लाख एकर क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले.

देशभर पसरलेल्या सुमारे 18 लाख एकर संरक्षण मंत्रालयाच्या जमिनीच्या सर्वेक्षणाचा हा प्रचंड मोठा उपक्रम, आतापर्यंत मानवी प्रयत्नांच्या बळावर  विसावलेला होता. हे सर्वेक्षण, केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियाला चालना देण्याच्या अनुषंगाने अल्पावधीतच भू सर्वेक्षणासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा उपयोग करून  घेण्याचे एक अद्वितीय उदाहरण आहे. अशा प्रकारचा उपक्रम स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आयोजित करण्यात आल्याची वस्तुस्थिती या उपक्रमाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत समारोहाचा भाग करत आहे.

***

S.Tupe/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1788774) Visitor Counter : 262