उपराष्ट्रपती कार्यालय
देशात कोविड रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, संसर्ग रोखण्यासाठी तत्परतेने कृतिशील होण्यावर उपराष्ट्रपतींनी दिला भर
“महामारीच्या आधीच्या लाटांपासून घेतलेले धडे लक्षात घेऊन काम करावे, कोविड प्रतिबंधक नियमांचे पूर्णवेळ ‘मानवधर्म म्हणून पालन करावे- उपराष्ट्रपतींचे आवाहन
Posted On:
05 JAN 2022 3:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2022
देशात कोविड रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, हा संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी तत्परतेने कृतिशील होण्याची गरज आहे, असे मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. महामारीच्या आधीच्या लाटांमध्ये मिळालेल्या अनुभवांचा वापर करत, आपण कोविडशी लढा द्यायला हवा अशी सूचना त्यांनी केली. “ कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन पूर्णवेळ करणे हा आपला ‘धर्म’आणि कर्तव्य आहे - कायम मास्कचा वापर, शारीरिक अंतराचे पालन आणि लसीकरण करुन आपण स्वतःला आणि समाजालाही सुरक्षित ठेवू शकतो” असे नायडू म्हणाले.
15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे महत्त्व सांगतांना नायडू यांनी पालकांना आग्रही आवाहन केले, की त्यांनी आपल्या पात्र पाल्यांचे लसीकरण लवकरात लवकर करुन घ्यावे. लोककल्याणासाठी कार्यरत व्यक्ती, सामाजिक संस्था, वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक आणि सरकारी यंत्रणांनी, शक्य तेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून लसीकरणाविषयीची अनास्था दूर करावी, आणि त्यांना लसीकरणासाठी उद्युक्त करावे, असे आवाहनही उपराष्ट्रपतींनी केले. जास्तीतजास्त लसीकरणामुळे भारताचा कोविडविरुद्धचा लढा अधिक मजबूत होईल, असेही ते म्हणाले.
भारतीय वंशाच्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या अमेरिकन संघटनेने आयोजित केलेल्या 15 व्या जागतिक परिषदेच्या उद्घाटनपर व्हिडिओ संदेशात उपराष्ट्रपती नायडू यांनी, भारतीय वंशाच्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या कामगिरीचे कौतूक केले. “तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने, जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आपला ठसा उमटवला आहे.” असे सांगत, भारताच्या वसुधैव कुटुंबकम या मूल्याचे तुम्ही सर्वजण मूर्तिमंत प्रतीक आहात, असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले.
भारतात अलीकडेच मंजूरी मिळालेल्या- कॉर्बेवॅक्स आणि कोव्होवॅक्स या या लसींच्या निर्मितीत अमेरिकन संघटनांसोबत भारतीय कंपन्यांचाही सहभाग होता, याचा उल्लेख करत उपराष्ट्रपती म्हणाले की, या अनुभवातून आपल्याला दिसते की आरोग्य क्षेत्रात भारत-अमेरिका यांच्यातील सहकार्यातून केवळ याच दोन देशांना नाही, तर संपूर्ण जगालाच लाभ मिळू शकतो.”
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1787664)
Visitor Counter : 167