पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेलं भाषण

Posted On: 25 DEC 2021 11:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2021

 

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या सर्वांना ख्रिसमस च्या शुभेच्छा ! आपण या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात आहोत. 2022 लवकरच येणार आहे. आपण सगळे 2022 च्या स्वागताच्या तयारीत गुंतले असाल. मात्र उत्साह आणि आनंदाच्या या प्रसंगीही आपल्याला सजग राहायचे आहे, जागृत राहायचे आहे. 

आज जगातल्या अनेक देशात कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तीत ओमायक्रॉन स्वरूपामुळे संक्रमण वाढते आहे.भारतातही बऱ्याच लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं आढळलं आहे. मी आपल्या सर्वांना आग्रह करेन की घाबरु नका, मात्र सावधान रहा, सतर्क रहा. मास्कचा पुरेपूर वापर करा आणि हात थोड्या थोड्या वेळाने धूत रहा, या सगळ्या गोष्टी आपल्याला विसरायच्या नाहीत. 

आज जेव्हा हा विषाणू उत्क्रांत होत आहे, तेव्हा आपल्यातही प्रत्येक आव्हानाचा सामना करण्याची ताकद आणि आत्मविश्वास देखील त्याच पटीने वाढतो आहे. आपली नवोन्मेषी शक्ती देखील वाढते आहे. आज देशात 18 लाख अलगीकरण खाटा आहेत. पाच लाख ऑक्सिजनयुक्त खाटा आहेत. एक लाख 40 हजार आयसीयू खाटा आहेत. आयसीयू आणि बिगर आयसीयू खाटा एकत्र केल्या तर 90 हजार खाटा , विशेषतः लहान मुलांसाठी देखील आहेत. आज देशात तीन हजार पेक्षा जास्त पीएसए ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत. चार लाख ऑक्सिजन सिलेंडर्स देशभरात देण्यात आले आहेत. राज्यांना आवश्यक औषधांचा राखीव साठा तयार करण्यात मदत केली जात आहे. त्यांना आवश्यक तेवढ्या चाचणी किट्स देखील उपलब्ध करुन दिले जात आहेत. 

मित्रांनो, 

कोरोना जागतिक महामारीविरुद्धच्या लढाईतला आपला आजवरचा अनुभव हेच सांगतो की वैयक्तिक पातळीवर सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन, कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपले एक महत्वाचे शस्त्र आहे. आणि दुसरे शस्त्र आहे लसीकरण. आपल्या देशाने देखील या आजाराचे गांभीर्य ओळखत खूप आधीच लसीकरणावर मिशन मोडवर काम करणं सुरु केलं होतं. लसींवर संशोधन करण्यासोबतच, त्यांना मंजुरी देण्याची प्रक्रिया, पुरवठा साखळी, वितरण,प्रशिक्षण, माहिती तंत्रज्ञान साहाय्य व्यवस्था, प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था याबर आपण सातत्याने काम केले. 

या सगळ्या सज्जतेचा परिणाम म्हणूनच भारताने यावर्षी 16 जानेवारीपासून आपल्या नागरिकांना लस देणे सुरु केले होते. हे देशातील सर्व नागरिकांचे सामूहिक प्रयत्न आणि सामूहिक इच्छाशक्तीचेच फळ आहे, की आज भारत 141 कोटी लसींच्या मात्रा देण्याचे अभूतपूर्व आणि अत्यंत कठीण उद्दिष्ट साध्य करु शकला आहे. 

आज भारताची प्रौढ लोकसंख्येपैकी 61 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना लसींच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, प्रौढ लोसंख्येतील सुमारे 90 टक्के लोकांना लसींची एक मात्रा देण्यात आली आहे. आज प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान वाटेल की आपण जगातील सर्वात मोठे, सर्वात व्यापक आणि अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत देखील आपण इतके सुरक्षित लसीकरण अभियान चालवले. 

अनेक राज्ये आणि विशेषतः पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची राज्ये, जसे गोवा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश सारख्या राज्यांनी शंभर टक्के पहिल्या मात्रेचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट साध्य केलं आहे. आज देशातील दूरवरच्या, दुर्गम गावातून जेव्हा शंभर टक्के लसीकरण झाल्याच्या बातम्या येतात, तेव्हा मनाला अतिशय समाधान मिळते. 

हा पुरावा आहे, आपली आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत झाल्याचा, आपल्या सांघिक शक्तीचा, आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे समर्पण आणि कटीबद्धतेचा! आणि देशाच्या सर्वसामान्य लोकांच्या शिस्तपालन आणि विज्ञानावरील विश्वासाचा. आपल्या देशात लवकरच नेझल म्हणजे नाकावाटे दिली जाणारी लस आणि जगातील पहिली डीएनए लस देखील सुरु होणार आहे. 

मित्रांनो, 

कोरोनाविरुद्ध भारताचा लढा सुरुवातीपासूनच वैज्ञानिक सिद्धांत, वैज्ञानिक सल्लामसलत आणि वैज्ञानिक पद्धतींवर आधारलेला आहे. गेल्या 11 महिन्यांपासून देशात लसीकरण अभियान सुरु आहे. देशबांधवांना त्याचे फायदेही जाणवत आहेत. त्यांचे दैनंदिन आयुष्य सामान्य होत चालले आहे. आर्थिक घडामोडी देखील जगातील इतर अनेक देशांच्या तुलनेत उत्साहवर्धक आहेत. 

मित्रांनो, 

आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की कोरोना अद्याप गेलेला नाही. अशा परिस्थितीत सतर्कता खूप आवश्यक आहे. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी, देशबांधवांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही सातत्याने काम केले आहे. जेव्हा लसीकरण सुरु झाले तेव्हा देखील वैज्ञानिक सल्ल्याच्या आधारे आम्ही हे ठरवले होते की पहिली मात्रा कोणाला द्यायला हवी, पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेत अंतर किती असावे, निरोगी लोकांना लस कधी द्यावी, ज्यांना कोरोन होऊन गेला आहे, त्यांना केंव्हा लस द्यावी, आणि जे सहव्याधींनी ग्रस्त आहेत, त्यांना केंव्हा लस द्यावी, असे निर्णय सतत घेतले गेले आणि परिस्थिती आटोक्यात ठेवण्यात यांची खूप मदत झाली. भारताने, इथल्या स्थिती - परिस्थितीनुसार, भारताच्या वैज्ञानिकांच्या सल्ल्यानेच आपले निर्णय घेतले आहेत. सध्या, ओमायक्रॉनची जोरात चर्चा सुरु आहे. जगाचे याचे अनुभव देखील वेगवेगळे आहेत, अंदाज देखील वेगवेगळे आहेत. भारतीय वैज्ञानिक देखील यावर बारीक लक्ष ठेऊन आहेत, यावर काम करत आहेत. आपल्या लसीकरणाला आज जेव्हा 11 महिने पूर्ण झाले आहेत, तेव्हा वैज्ञानिक सर्व गोष्टींचा अभ्यास करत आहेत आणि जगभरचे अनुभव बघता आज काही निर्णय घेतले आहेत. आज अटलजींचा जन्मदिन आहे. ख्रिसमसचा सण आहे तेव्हा मला वाटलं की हा निर्णय आपल्या सर्वांना सांगितला पाहिजे. 

मित्रांनो, 

15 वर्षांपासून ते 18 वर्षे वयाची जितकी मुलं आहेत, आता त्यांच्यासाठी लसीकरण सुरु होईल. 2022 मध्ये 3 जानेवारीला, सोमवारपासून, याची सुरवात केली जाईल. हा निर्णय, कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या देशाच्या लढाईला बळ तर देईलच, शाळा - महाविद्यालयांत जाणाऱ्या आपल्या मुलांची, आणि त्यांच्या माता - पित्यांची चिंता देखील कमी करेल. 

मित्रांनो, 

आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, की जे कोरोना योद्धे आहेत, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आहेत, यांचं या लढाईत, देश सुरक्षित ठेवण्यात, मोलाचं योगदान आहे. ते आज देखील कोरोना रुग्णांची सेवा करण्यात आपला बहुतांश वेळ देत आहेत. म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने निर्णय घेतला आहे की, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लसीची ‘खबरदारी मात्रा’ देखील सुरु केली जाईल. याची सुरवात 2022 मध्ये, 10 जानेवारी, सोमवारपासून केली जाईल. 

मित्रांनो, 

कोरोन लसीकरणाचा आजवरचा अनुभाव असा आहे, की जे वयस्कर लोक आहेत आणि ज्यांना आधीपासूनच कुठला न कुठला गंभीर रोग आहे त्यांनी खबरदारी घेणं योग्य आहे. हे लक्षात घेऊन, 60 वर्षांवरील वयाच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना, त्यांच्या डॉक्टरच्या सल्ल्याने लसीची खबरदारीची मात्रा घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल. हे देखील 10 जानेवारी पासून सुरु होईल. 

मित्रांनो, 

माझा आग्रह आहे, अफवा, गैरसमज आणि भीती पसरविण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत, त्या पासून बचाव केला पाहिजे आपण सर्व देशवासीयांनी मिळून जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम चालवली आहे. येत्या काळात, आपल्याला याला गती द्यावी लागेल आणि विस्तार करावा लागेल. आपल्या सर्वांचे प्रयत्नच कोरोना विरुद्धच्या लढाईत देशाला मजबूत करतील. 

आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद!

 

* * *

G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1785538) Visitor Counter : 152