शिक्षण मंत्रालय

पंतप्रधान- युवा मार्गदर्शक योजनेसाठी नॅशनल बुक ट्रस्टकडून 75 निवडक लेखकांची नावे जाहीर

Posted On: 25 DEC 2021 8:31PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या अखत्यारीतील भारतीय नॅशनल बुक ट्रस्टने आज भारतातील राष्ट्रीय चळवळया विषयावर आयोजित अखिल भारतीय स्पर्धेचे निकाल जाहीर केले. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सध्या साजऱ्या होत असलेल्या आझादीका अमृत महोत्सवकार्यक्रमांचा भाग म्हणून पंतप्रधान युवा मार्गदर्शक योजनेअंतर्गत ही स्पर्धा घेण्यात आली होती. या योजनेच्या नियमांनुसार, 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुण लेखकांसाठी शिष्यवृत्तीवजा सल्लागार सुविधा देणाऱ्या या स्पर्धेतून 75 लेखकांची निवड होणार होती.

अखिल भारतीय पातळीवरील ही स्पर्धा 1 जून ते 31 ऑगस्ट 2021 या कालावधीत मायगव्ह आणि भारतीय नॅशनल बुक ट्रस्टच्या मंचांवरून आयोजित करण्यात आली. संपूर्ण देशभरातून तसेच काही परदेशी भारतीय समुदायांतून 22 अधिकृत भाषा तसेच इंग्रजी भाषेतून या स्पर्धेसाठी सुमारे 16,000 प्रवेशिका आल्या होत्या. तज्ञांच्या विविध पथकांनी सर्व प्रस्तावित पुस्तकांचे वाचन केले तसेच ही पुस्तके छाननीच्या तीन पातळ्यांमध्ये तपासण्यात आली.

31 जानेवारी 2021ला प्रसारित मन की बातकार्यक्रमादरम्यान पंतप्रधान म्हणाले होते, मी आपल्या तरुण मित्रांना, आपले स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्याशी संबंधित घटना आणि स्वातंत्र्य चळवळीदरम्यान त्यांच्या भागात घडलेल्या धैर्याच्या कहाण्या याबद्दल लिहिते होण्याचे आवाहन करतो. आणि त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे पंतप्रधान-युवा मार्गदर्शक योजना सुरु करण्यात आली आणि भारतीय नॅशनल बुक ट्रस्ट या संस्थेला या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली.

निवड झालेल्या 75 लेखकांपैकी 38 पुरुष लेखक आहेत तर 37 लेखिका आहेत. तसेच, यापैकी दोघे जण 15 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत तर 16 लेखक 15 ते 20 वर्षे या वयोगटातील आहेत, 32 जण 21 ते 25 वयोगटातील आणि 25 जण 26 ते 30 या वयोगटातील आहेत.

निवडण्यात आलेल्या लेखकांना सहा महिने मार्गदर्शक सुविधा मिळेल ज्यामध्ये त्यांना प्रसिध्द लेखक तसेच नॅशनल बुक ट्रस्टच्या संपादकांच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन आणि संपादनविषयक मदत केली जाईल. आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचा भाग म्हणून या तरुण लेखकांनी दिलेल्या पुस्तकांच्या प्रस्तावातील पुस्तकांचे नॅशनल बुक ट्रस्टतर्फे प्रकाशित होणाऱ्या मोठ्या पुस्तकामध्ये विकसन करण्यासाठी हे मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रकाशित झालेली पुस्तके कालांतराने इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करण्यात येतील.

मार्गदर्शन कालावधीत, निवड झालेल्या लेखकांना सहा महिन्यांसाठी  दर महिन्याला 50,000 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल. त्यानंतर, गाजणाऱ्या पुस्तकांच्या लेखकांना 10% मानधन दिले जाईल.

***

S.Patil/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1785189) Visitor Counter : 236