ऊर्जा मंत्रालय
उर्जा क्षेत्र व नवीकरणीय उर्जा प्रकल्पांना अर्थपुरवठा करण्यासाठी के एफ डब्ल्यू डेव्हलपमेंट बँकेशी ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाचा करार
प्रविष्टि तिथि:
23 DEC 2021 8:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2021

ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ (REC) लिमिटेड आणि के एफ डब्ल्यू डेव्हलपमेंट बँक यांच्यादरम्यान विकासासाठी अधिकृत मदत (ODA) या स्वरुपातील 169.5 दशलक्ष डॉलर्सच्या मुदतीच्या कर्जाचा भारत- जर्मन द्विपक्षीय भागीदारी करार झाला. या करारासाठी भारत सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने मंजुरी दिली. या कर्जाची रक्कम नाविन्यपूर्ण सौर पीव्ही तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांची भारतात स्पर्धात्मक व्याजदरात उभारणी करण्यासाठीच्या निधीचा भाग म्हणून देण्यात येईल. उर्जाधारित क्षेत्रांतील प्रकल्पांच्या निधीसाठी ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ लिमिटेड व के एफ डब्ल्यू मधील हा पाचवा कर्जसंबधित करार आहे. त्याच प्रमाणे ‘नवीकरणीय उर्जा प्रकल्पांसाठी निधी उभारणीसाठी कर्ज’ या स्वरूपातील तिसरा करार आहे.
ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ आपल्या धोरणांना बाजारपेठेनुसार नवीन आकार देत असून, नवीकरणीय उर्जा क्षेत्रात खाजगी व सार्वजनिक या दोन्ही प्रकारातील साध्य होऊ शकणाऱ्या व परिणामकारक गुंतवणुकीला दिशा देण्यासाठी आर्थिक उपाययोजना व यंत्रणा विकसित करत आहे. यासाठी महामंडळाने (REC) त्यांच्याकडून निधी पुरवठा करण्यात येणाऱ्या इतर क्षेत्रांच्या तुलनेत नवीकरणीय उर्जा क्षेत्राला कमी व्याजदरात निधी देऊ केला आहे.
Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1784658)
आगंतुक पटल : 275