ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बॅटरी साठवणीसाठीच्या पीएलआय योजनेसंदर्भात केंद्रीय उर्जा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आंतरमंत्रालयीन बैठक

Posted On: 09 DEC 2021 11:14AM by PIB Mumbai

आधुनिक रसायन सेल बॅटरी साठवणीसाठीच्या पीएलआय अर्थात उत्पादनाशी निगडीत मदत अनुदान योजना तसेच परदेशातील लिथियम खाणी संपादन करण्यासाठीची धोरणे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय उर्जा आणि नवीन तसेच नूतनीकरणीय उर्जा मंत्री आर.के.सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल (9 डिसेंबर 2021 रोजी) संध्याकाळी आंतरमंत्रालयीन बैठक घेण्यात आली. केंद्रीय खाण मंत्रालय, कोळसा मंत्रालय, अवजड उद्योग मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि नीती आयोगातील अधिकारी तसेच केंद्रीय उर्जा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने पीएलआय योजनेसाठी लावलेल्या बोलीबाबतची सद्य परिस्थिती केंद्रीय मंत्र्यांनी जाणून घेतली आणि पीएलआय निविदा प्रक्रियेला अधिक वेग देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, त्यांनी जगामधील लिथियम साठ्यांच्या उपलब्धतेबाबत चर्चा देखील केली. भारत जिथे लिथियम खाणींचा शोध घेऊ शकेल अशा संभाव्य ठिकाणांचा केंद्रीय मंत्र्यांनी आढावा घेतला. जगातील विविध देशांमध्ये खाण संपादनाची प्रक्रिया आणि यंत्रणा वेगवेगळी असते आणि आपण त्यानुसार तयारी करायला हवी असे ते पुढे म्हणाले.

उर्जेच्या गरजेच्या बाबतीत भारत हा मोठा देश आहे आणि म्हणून आपली बॅटरी साठवणुकीची गरज देखील तितकीच प्रचंड आहे असे ते म्हणाले. आपल्या देशात 500 गिगावॉटपर्यंत  नूतनीकरणीय उर्जा निर्मिती क्षमतेला पाठबळ पुरविण्यासाठी आपल्याला 2030 पर्यंत अंदाजे  120 गिगावॉट तास पुरेल इतक्या बॅटरी साठवणुकीची गरज आहे याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. आपल्या देशासमोरील नूतनीकरणीय उर्जेची उद्दिष्ट्ये लक्षात घेऊन भविष्यातील याबाबतच्या शक्यता आणि दीर्घकालीन नियोजन याबद्दल देखील त्यांनी उपस्थितांसोबत अधिक चर्चा केली.

***

MC/Sanjana/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1779626) Visitor Counter : 250