पंतप्रधान कार्यालय

जवाड चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक


लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे पंतप्रधानांचे अधिकाऱ्यांना निर्देश

सर्व अत्यावश्यक सेवांची देखभाल आणि बिघाड झाल्यास त्या  त्वरित पूर्ववत होतील हे सुनिश्चित करा: पंतप्रधान

चक्रीवादळाच्या प्रभावाचा सक्रियपणे सामना करण्यासाठी सर्व संबंधित मंत्रालये आणि संस्था एकत्रितपणे काम करत आहेत

एनडीआरएफ ने बोटी, वृक्षतोड करणारे, दूरसंचार उपकरणे इत्यादींनी परिपूर्ण असलेले 29 चमू सज्ज ठेवले आहेत. तर 33 चमूंना गरजेनुसार तयार ठेवले आहे.

भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने मदत, शोध आणि बचाव कार्यासाठी जहाजे आणि हेलिकॉप्टर तैनात केले आहेत.

लष्कराचे हवाई दल आणि अभियंता कृती दल विभाग गरज पडल्यास तैनातीसाठी सज्ज आहेत.

पूर्व किनारपट्टीवर आपत्ती निवारण पथके आणि वैद्यकीय पथके गरजेनुसार सज्ज

Posted On: 02 DEC 2021 7:00PM by PIB Mumbai

 

जवाड चक्रीवादळाच्या संभाव्य निर्मितीमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्ये आणि केंद्रीय मंत्रालये आणि संबंधित यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक झाली.

लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आणि वीज, दूरसंचार, आरोग्य, पिण्याचे पाणी इत्यादी सर्व अत्यावश्यक सेवांची देखभाल सुनिश्चित करण्यासाठी आणि कोणतेही व्यत्यय आल्यास त्या त्वरित पूर्ववत केल्या जातील याची खात्री करण्यासाठी पंतप्रधानांनी अधिकार्‍यांना प्रत्येक संभाव्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. अत्यावश्यक औषधे आणि पुरवठा यांचा पुरेसा साठा सुनिश्चित करण्याचे आणि विना अडथळा हालचालींचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नियंत्रण कक्षाचे कामकाज अहोरात्र सुरू ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रदेश चक्रीवादळ जवाड मध्ये परिवर्तित होण्याची अपेक्षा असून शनिवार 4 डिसेंबर 2021 च्या सकाळच्या सुमारास उत्तर आंध्र प्रदेश - ओदिशाच्या किनारपट्टीवर 100 किमी प्रति तास वेगाने धडकण्याची शक्यता आहे. यामुळे आंध्र प्रदेश, ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग संबंधित सर्व राज्यांना ताज्या अंदाजासह नियमित इशारा जारी करत आहे.

कॅबिनेट सचिवांनी सर्व किनारी राज्ये आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये/संस्थांच्या मुख्य सचिवांसह परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेतला आहे.

गृह मंत्रालय 24X7 परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश आणि संबंधित केंद्रीय संस्थांच्या संपर्कात आहे. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा पहिला हप्ता आधीच जारी केला आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने राज्यांमध्ये बोटी, वृक्षतोड करणारे, दूरसंचार उपकरणे इत्यादींनी सुसज्ज असलेले 29 चमू सज्ज ठेवले आहेत, तर 33 चमूंना गरजेनुसार तयार ठेवले आहे.

भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने मदत, शोध आणि बचाव कार्यासाठी जहाजे आणि हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. नौका आणि बचाव उपकरणांसह लष्कराचे हवाई दल आणि अभियंता कृती दल विभाग गरज पडल्यास तैनातीसाठी सज्ज आहेत. पाळत ठेवणारी विमाने आणि हेलिकॉप्टर किनारपट्टीवर आळीपाळीने पाळत ठेवत आहेत. पूर्व किनारपट्टीवर आपत्ती निवारण पथके आणि वैद्यकीय पथके गरजेनुसार सज्ज आहेत.

उर्जा मंत्रालयाने आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित केली आहे आणि खंडित वीजप्रवाह पूर्ववत करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर, डीजी सेट आणि उपकरणे इ. तयार ठेवले आहेत. दळणवळण मंत्रालय सर्व दूरसंचार टॉवर्स आणि एक्सचेंजेसवर सतत लक्ष ठेवून आहे आणि दूरसंचार नेटवर्क पुनर्संचयित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बाधित भागात आरोग्य क्षेत्राची तयारी आणि कोविडला प्रतिसाद देण्यासाठी प्रभावित होण्याची शक्यता असलेल्या राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने सर्व नौवहन जहाजे सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत आणि आपत्कालीन जहाजे तैनात केली आहेत. राज्यांना किनार्‍याजवळील केमिकल आणि पेट्रोकेमिकल युनिट्ससारख्या औद्योगिक आस्थापनांना सतर्क करण्यास सांगितले आहे.

असुरक्षित ठिकाणांहून लोकांना बाहेर काढण्यासाठी राज्य संस्थांच्या सुरू असलेल्या तयारीमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल मदत करत आहे आणि चक्रीवादळाच्या परिस्थितीला कसे तोंड द्यावे याबद्दल निरंतर समुदाय जागरूकता मोहीम राबवत आहे.

या बैठकीला पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, गृह सचिव, एनडीआरएफचे महासंचालक आणि आयएमडीचे महासंचालक उपस्थित होते.

***

M.Chopade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1777380) Visitor Counter : 305